Sangli Politics, स्वाती चिखलीकर : राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) नेते जयंत पाटील यांचा बालेकिल्ला असलेल्या वाळवा तालुक्यातील बावची गावात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचा लोकार्पण सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला जयंत पाटील, काँग्रेस नेते सतेज पाटील, विधान परिषद आमदार हर्षदा देशमुख, आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत यांच्यासह विविध राजकीय नेते उपस्थित होते. आधीच जयंत पाटील आणि गोपीचंद पडळकर यांच्यातील राजकीय संघर्ष सर्वश्रुत असल्याने, हे दोन्ही कट्टर विरोधक एकाच व्यासपीठावर येणार असल्याने संपूर्ण राजकीय वर्तुळाचे या कार्यक्रमाकडे विशेष लक्ष लागले होते.
ADVERTISEMENT
'आपण सुसंस्कृतपणा दाखवला पाहिजे'
कार्यक्रमात आमदार गोपीचंद पडळकर यांची एन्ट्री होताच जयंत पाटील आणि पडळकर समर्थकांकडून जोरदार घोषणाबाजी सुरू झाल्याने वातावरण चांगलेच तापले. त्यावेळी जयंत पाटील यांनी स्वतः हातात माईक घेत, "आमदार पडळकर आपल्या मतदारसंघात आले आहेत, आपण सुसंस्कृतपणा दाखवला पाहिजे," असे म्हणत सर्व कार्यकर्त्यांना शांततेचे आवाहन केले. एवढेच नव्हे तर त्यांनी पडळकरांचा स्टेजवर सत्कारही करायला लावला, ज्यामुळे राजकीय सलोख्याचे एक वेगळे चित्र पाहायला मिळाले.
हे ही वाचा : "मतं चोरणाऱ्यांनो, शेतकरी काहीच विसरत नाहीत.." 'गोकुळ'वरुन राहुल गांधी आक्रमक, सहकार कायद्यातील दुरुस्तीबद्दल काय म्हणाले?
'घरात घुसून कार्यक्रम'
मात्र, प्रत्यक्ष भाषणाला सुरुवात झाल्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक रंगली. आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुण्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी शायिस्तेखानाची बोटे वाड्यात घुसून छाटली असा इतिहास सांगत, नुकत्याच झालेल्या जिल्हा मध्यवर्ती बँक (DCC) निवडणुकीचा संदर्भ देत "घरात घुसून कार्यक्रम करायचा असतो," असा डिवचणारा टोला जयंत पाटलांना लगावला. याशिवाय, अफजलखानाचा कोथळा महाराजांनी पन्हाळा गडावर काढला, असा चुकीचा संदर्भही त्यांनी आपल्या भाषणात दिला.
हे ही वाचा : तुळजापूर हादरले! 18 वर्षीय विद्यार्थ्याची निर्घृण हत्या, माजी नगराध्यक्षासह दोघांना अटक
'भाषण पाठ केलं की चुका होतात'
पडळकरांच्या या विधानाचा जयंत पाटलांनी चांगलाच समाचार घेतला. पडळकरांना कोपरखळ्या मारत त्यांनी दुरुस्ती केली. अफजलखानाचा कोथळा पन्हाळा नव्हे तर प्रतापगडावर काढला होता, असे सांगत अभ्यास करून येण्याची सूचना त्यांनी पडळकरांना केली. तसेच "भाषण पाठ केलं की अशा चुका होत असतात," असा खडा टोलाही जयंत पाटलांनी हाणला. या जाहीर टोलेबाजीमुळे या लोकार्पण सोहळ्याला चांगलाच राजकीय रंग चढला आणि राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली.
ADVERTISEMENT












