गणेश जाधव, Dharashiv Nagarpalika Election : धाराशिव नगरपरिषद निवडणुकीच्या मतमोजणीदरम्यान आज मतमोजणी केंद्रात काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. पोस्टल मतांच्या मोजणीवेळी काही मतपत्रिका बाद ठरवण्यात आल्याने उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींनी तीव्र आक्षेप घेतला. या निर्णयावरून मतमोजणी केंद्रात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
ADVERTISEMENT
मिळालेल्या माहितीनुसार, पोस्टल मतांची छाननी सुरू असताना काही मतपत्रिका नियमबाह्य ठरवत बाद करण्यात आल्या. मात्र, संबंधित मतपत्रिकांबाबत निर्णय घेताना नियमांचे पालन झाले नसल्याचा आरोप उमेदवारांच्या वतीने करण्यात आला. निवडणूक नियमांनुसार पोस्टल मतांवर आक्षेप घेतला गेल्यास, ईव्हीएम मशीन उमेदवार किंवा त्यांच्या अधिकृत प्रतिनिधींच्या उपस्थितीत बाहेर काढून संपूर्ण प्रक्रिया पार पाडणे आवश्यक असते. मात्र, ईव्हीएम मशीन प्रत्यक्ष बाहेर आणण्याआधीच काही फॉर्मवर सह्या घेण्यात आल्याचा दावा करण्यात आला. यामुळे उपस्थित उमेदवार आणि प्रतिनिधींमध्ये संतापाची लाट उसळली.
हेही वाचा : भाजप 140 ते 152 जागा जिंकणार, महाराष्ट्रातील इतर एकही पक्ष 50 चा आकडा गाठणार नाही, Exit Poll ची आकडेवारी
या प्रकारामुळे मतमोजणी केंद्रात जोरदार गोंधळ झाला. काही काळ मतमोजणीची प्रक्रिया थांबवावी लागली. उमेदवारांच्या प्रतिनिधींनी निवडणूक अधिकाऱ्यांशी जोरदार चर्चा केली, तर काहींनी प्रशासनाच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला. “नियम डावलून निर्णय घेतले जात आहेत,” असा आरोप करत पारदर्शकतेची मागणी करण्यात आली.
दरम्यान, नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांशी संबंधित आणखी एक मुद्दा यावेळी समोर आला. नगराध्यक्षपदासाठी उभ्या असलेल्या उमेदवारांना विविध प्रभागांमध्ये सर्वेक्षण करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी काही उमेदवारांकडून करण्यात आली. या मागणीवरूनही मतमोजणी केंद्रात काही काळ तणाव निर्माण झाला. प्रशासनाने ही मागणी नियमांच्या चौकटीत तपासून पाहण्याचे आश्वासन दिले, मात्र तत्काळ परवानगी देण्यास नकार दिल्याने चर्चेला उधाण आले.
परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता लक्षात घेता प्रशासनाने तत्काळ हस्तक्षेप केला. अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आणि उपस्थितांना शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले. निवडणूक अधिकाऱ्यांनी सर्व प्रक्रिया निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसारच राबवली जात असल्याचे स्पष्ट केले. कोणताही अन्याय होणार नाही, तसेच प्रत्येक आक्षेपाची नियमांनुसार दखल घेतली जाईल, असेही प्रशासनाकडून सांगण्यात आले.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











