“टिल्ली, टिल्ली लोकं पण बोलायला लागली…” : अजित पवारांनी कोणाला फटकारलं?

मुंबई तक

• 04:56 PM • 01 May 2023

विरोधी पक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी नाव न घेता अप्रत्यक्षपणे भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांना पुन्हा एकदा फटकारलं.

Leader of opposition Ajit Pawar talk on Vajramuth Rally in Mumbai

Leader of opposition Ajit Pawar talk on Vajramuth Rally in Mumbai

follow google news

मुंबई : वाचाळवीरांची संख्या वाढायला लागली आहे. टिल्ली टिल्ली लोक पण बोलायला लागली आहेत, काय बोलतो काय कळत नाही. असं म्हणतं विरोधी पक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी नाव न घेता अप्रत्यक्षपणे भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांना पुन्हा एकदा फटकारलं. ते मुंबई महाविकास आघाडीच्या वज्रमुठ सभेत बोलत होते. यावेळी त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवरही सडकून टीका केली. (Leader of opposition Ajit Pawar talk on Vajramuth Rally in Mumbai)

हे वाचलं का?

काय म्हणाले अजित पवार?

मुंबईचं मराठीपण टिकवण्याचं आणि वाढवण्याचं काम कोणी केलं असेल तर ते हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी केलं. शिवसेनेमुळे मुंबई टिकली. मुंबईत मराठी माणसाचा अभिमान, मराठी माणसाचा स्वाभिमान कायम राहिला. बाळासाहेबांमुळे मराठी माणूस एकजुटीने राहिला, हे वास्तव आपल्याला नाकारता येत नाही. परंतु हेच नेमकं काहीच्या डोळ्यांवर आलं आणि राजकारण घडलं, असं अजित पवार म्हणाले.

एकनाथ शिंदे यांना काय दिला सल्ला?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भाषण करताना भंबेरी उडते. ते द्रौपदी मूर्मू यांना पंतप्रधान म्हणतात, लोकसेवा आयोगाला निवडणूक आयोग म्हणतात. काल-परवा आम्ही मुंबईमध्ये साडे तीनशे ५० किलोमिटर मेट्रो लाईन टाकली असल्याचं म्हणाले. आता साडे तीनशे पन्नास किलोमिटर कसं असतं? आहो, मुख्यमंत्री साहेब, तुम्ही एका राज्याचे मुख्यमंत्री आहात, १४-१५ कोटी जनतेचं प्रतिनिधित्व करत आहात. चुकत असेल किंवा माहिती नसेल तर नोट काढून ती वाचा, त्यावर काहीही बिघडत नाही.

कायदा आणि सुव्यवस्थेवरुन सरकारवर टीका :

अजित पवार यावेळी बोलताना म्हणाले की, कोयता गँग आणि इतर गुन्हेगारांमध्ये मस्तवालपणा आला आहे. त्यावर सरकार काहीही करत नाही. राज्याची कायदा आणि सुव्यवस्था ढासळली आहे. त्यावर शिंदे-फडणवीस सरकार काहीही करत नाही. जनतेने न्याय कोणाकडे मागायचा? सर्वोच्च न्यायालयाने या सरकारला नपुंसक म्हटलं, तरी यांना जनाची नाही तर मनाचीही लाज नाही. चिथावणीखोर वक्तव्यावरुन सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारची खरडपट्टी काढली, पण त्यांना काहीच वाटत नाही.

सरकार निवडणुका घ्यायला घाबरत आहे का?

10 महिने झाले तरी राज्य सरकार महापालिका आणि इतर निवडणुका जाहीर करत नाही. सरकार निवडणुका घेण्यासाठी का घाबरत आहे? भीती कशाची वाटत आहे? का तुम्ही निवडणुका जाहीर करत नाही. निवडणुका जाहीर झाल्यावर लोकं काय करतील याबद्दल शिंदे-फडणवीस सरकारला विश्वास नाही, म्हणून हे निवडणूक घ्यायला घाबरत आहे. हे सरकार दगाफटका करून सत्तेत आलेलं आहे. पण आता राज्यातील जनताच त्यांना धडा शिकवणार, असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला.

“यांना मराठी भाषेची अडचण” :

राज्य सरकारच्या पर्यटन विभागाच्या जाहिरातीवर अजित पवार म्हणाले, पर्यटन विभागाने नवीन जाहिरात प्रसारित केली आहे. त्याची टॅगलाईन “देखो आपला महाराष्ट्र” अशी आहे. या सरकारला मराठी भाषेची सुद्धा अडचण आहे का?. सरळ ‘पाहा आपला महाराष्ट्र’ म्हणा ना. परंतु यांना भाषेशी काही देणंघेणं नाही, अशी टीका अजित पवार यांनी केली.

    follow whatsapp