Mahapalika Elections 2026 ,मुंबई : मुंबईसह राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुका नुकताच पार पडल्या. मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड यांसारख्या महत्त्वाच्या महानगरपालिकामध्ये भाजप आणि महायुतीने सत्ता मिळवली आहे. चंद्रपूर , लातूर आणि या महानगरपालिकांमध्ये काँग्रेसला सत्ता मिळाली आहे. शिवाय परभणी आणि भिवंडी निजामपूर महानगरपालिकेत काँग्रेस मित्रपक्षांसोबत सत्तेत सहभागी होणार आहे. विरार महानगरपालिकेत बहुजन विकास आघाडीने सत्ता मिळावली आहे. मात्र, इतर ठिकाणी महायुतीचे आणि महायुतीतील घटक पक्षांचे वर्चस्व पाहायला मिळालंय. दरम्यान, या महापालिका निवडणुका पार पडल्या मात्र, यांचे महापौर कधी ठरणार? याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
ADVERTISEMENT
महापौरपदासाठी आरक्षण सोडत कधी ?
मुंबईसह राज्यातील एकूण 29 महानगरपालिकांमधील महापौर पदासाठी आरक्षण निश्चित करण्यासाठीची सोडत कधी होणार, याकडे राजकीय वर्तुळासह सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर राज्य शासनाने याबाबतची अधिकृत तारीख जाहीर केली असून गुरुवार, 22 जानेवारी 2026रोजी महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत काढण्यात येणार आहे.
नगर विकास विभागाने यासंदर्भात अधिकृत पत्रक जारी केले आहे. या पत्रानुसार, राज्यातील 29 महानगरपालिकांमधील महापौर पदाचे आरक्षण निश्चित करण्यासाठी ही सोडत आयोजित करण्यात येणार आहे. शासनाच्या निर्णयानुसार, ही सोडत मा. राज्यमंत्री (नगर विकास) यांच्या अध्यक्षतेखाली काढण्यात येणार आहे. सोडतीचा कार्यक्रम मंत्रालय, मुंबई येथील 6 व्या मजल्यावरील परिषद सभागृहात सकाळी 11 वाजता सुरू होणार आहे. या कार्यक्रमासाठी संबंधित विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार असून संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने पार पाडली जाणार असल्याचे शासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणात अत्यंत महत्त्वाची मानली जाते. कोणत्या महानगरपालिकेत महापौर पद सर्वसाधारण, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय किंवा महिला प्रवर्गासाठी आरक्षित राहणार, हे या सोडतीतून स्पष्ट होणार आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांची या सोडतीकडे विशेष नजर आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











