Maharashtra Politics : शहापूर तालुक्यातील शनैश्वर आदिवासी विकास महामंडळाच्या आधारभूत भात खरेदी योजनेअंतर्गत झालेल्या प्रचंड गैरव्यवहाराचा तपास गतीमान होत असून, या प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे. अजित पवार गटाचे आमदार दौलत दरोडा यांचा पुतण्या आणि साकडबाव आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे अध्यक्ष हरिश दरोडा याला बुधवारी पोलिसांनी अटक केली. दीर्घकाळ राजकीय संरक्षण मिळाल्याचा आरोप होत असलेल्या या प्रकरणामुळे शहापूरच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
ADVERTISEMENT
मागील दोन ते तीन वर्षांत शनैश्वर आदिवासी विकास महामंडळाच्या भात खरेदी प्रक्रियेत तब्बल 16 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा मोठा खुलासा यापूर्वीच झाला होता. या घोटाळ्यात शेतकऱ्यांच्या नावाचा गैरवापर, खोटी बिलं, आणि प्रत्यक्ष मालापेक्षा जास्त दाखवलेली खरेदी यांसारखे अनेक गंभीर आरोप समोर आले होते. यानंतर, पुन्हा एकदा साकडबाव केंद्रात अतिरिक्त 1 कोटी 60 लाख रुपयांचा नवीन घोटाळा उघड झाला. या दुसऱ्या प्रकरणातही शेतकऱ्यांच्या नावाने बनावट चलन काढणे, भाताची खोटी खरेदी दाखवणे, तसेच बारदानामध्ये मोठी तफावत आढळल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
तपास अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, काही सहकारी संस्थांमार्फत सरकारी योजनेतून मोठ्या प्रमाणावर भात खरेदी दाखवण्यात आली होती. मात्र, प्रत्यक्षात शेतकऱ्यांकडून अत्यल्प प्रमाणात माल घेण्यात आला. उर्वरित खरेदी कागदोपत्री दाखवून मोठी रक्कम हडप करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. शेतकऱ्यांच्या नावाने देण्यात आलेली बनावट चलनं, त्यांच्याकडून न घेतलेला माल, तसेच वजन तक्ते आणि बारदाना यामधील तफावत या सर्वाचा तपशीलवार पंचनामा करण्यात आला आहे.
या प्रकरणी आदिवासी विकास महामंडळाने तक्रार दाखल केल्यानंतर पोलीस तपास सुरू करण्यात आला होता. दरम्यान, चौकशीत आवश्यक कागदपत्रे, बिलं, रेकॉर्ड आणि शेतकऱ्यांचे जबाब यावरून घोटाळा ठोसपणे सिद्ध झाल्यानंतर हरिश दरोडाला अटक करण्यात आली. या पुढे आणखी काही संबंधित पदाधिकारी व एजंट यांच्यावरही कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
राजकीय वर्तुळात मात्र या कारवाईला वेगळेच वळण मिळाले आहे. आमदार दौलत दरोडा यांचे निकटवर्तीय नातेवाईक अडचणीत सापडल्यामुळे शहापूर परिसरात मोठी चर्चा रंगली आहे. विरोधकांनीही या घोटाळ्याबाबत तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली असून, भ्रष्टाचाराला राजकीय छत्रछाया असल्याचा आरोप केला आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
'मला हा गुन्हा मान्य नाही..', राज ठाकरे न्यायाधीशांसमोर काय म्हणाले? ठाण्यातील कोर्टात काय घडलं?
ADVERTISEMENT











