mamata banerjee : पश्चिम बंगालमधील दुर्गापूर येथील एका खासगी वैद्यकीय महाविद्यालयातील एमबीबीएसचं शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनीवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या प्रकरणानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. ममता यांनी विद्यार्थिनींच्या सुरक्षेची जबाबदारी खासगी कॉलेजवर टाकत विचारले – “ती विद्यार्थिनी रात्री 12.30 वाजता कॉलेजच्या परिसरातून बाहेर कशी गेली?” त्यांच्या या वक्तव्यावरून भाजपाने आरोप केला आहे की, मुख्यमंत्री पीडितेलाच दोष देत आहेत.
ADVERTISEMENT
ममता बॅनर्जींकडून “नाईट कल्चर”वर नियंत्रण ठेवण्याचे आवाहन
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ही घटना “धक्कादायक” असल्याचे सांगितले आणि पोलिस सर्व आवश्यक पावले उचलत असल्याचे स्पष्ट केले. मात्र त्यांनी असेही म्हटले की, “ती एका खासगी वैद्यकीय महाविद्यालयात शिकत होती. जबाबदारी कोणाची आहे? ती रात्री 12.30 वाजता बाहेर कशी गेली?” ममतांनी खासगी वैद्यकीय महाविद्यालयांना आपल्या विद्यार्थ्यांची काळजी घेण्याचे आणि “नाईट कल्चर”वर नियंत्रण ठेवण्याचे आवाहन केले. त्यांनी पुढे म्हटले, “त्यांना बाहेर जाण्याची परवानगी नसावी. तो परिसर जंगलासारखा आहे.”
ओडिशाचा दाखला देत विरोधकांवर पलटवार
भाजपाच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना ममता बॅनर्जी यांनी शेजारच्या ओडिशा राज्याचा दाखला दिला. त्यांनी म्हटले, “ओडिशामध्ये समुद्रकिनाऱ्यावर मुलींवर बलात्कार झाले. ओडिशा सरकारने काय कारवाई केली?” ममतांनी स्पष्ट केले की दोषींना कठोर शिक्षा दिली जाईल. “अशा घटना जिथेही घडतात, त्यांची निंदा केली पाहिजे. मणिपूर, उत्तर प्रदेश, बिहार आणि ओडिशा येथेही अनेक प्रकरणे घडली आहेत. आम्ही कठोर कारवाई करू.”
“ममतांनी पीडितेलाच दोष दिला”, भाजपची टीका
भाजपाने ममता बॅनर्जींच्या वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. पक्षाचे प्रवक्ते गौरव भाटिया यांनी एक्स (X) वर लिहिले, “@MamataOfficial – स्वतः महिला असूनही पीडितेवरच दोषारोप करत आहेत. न्याय देण्याऐवजी पीडितेलाच दोषी ठरवले जात आहे.” भाजपाने म्हटले की, “ज्या मुख्यमंत्री स्वतः मुलींना रात्री बाहेर न जाण्याचा सल्ला देतात पण सुरक्षित ठेऊ शकत नाहीत, त्यांना पदावर राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही.”
पीडितेच्या कुटुंबाची प्रतिक्रिया
एमबीबीएसच्या दुसऱ्या वर्षात शिकणारी पीडिता ओडिशातील जलेश्वर येथील रहिवासी आहे. शुक्रवारी रात्री ती एका मित्रासोबत बाहेर गेली असता काही लोकांनी तिला जबरदस्तीने एका निर्जन ठिकाणी नेऊन बलात्कार केला. पीडितेच्या वडिलांनी सांगितले, “माझी मुलगी तीव्र वेदनेत आहे, चालूही शकत नाही. ती पलंगावरच आहे. आता येथे तिच्या सुरक्षेवर आमचा विश्वास उरलेला नाही. आम्ही तिला ओडिशाला परत नेऊ इच्छितो. ती पुढे तिथेच शिक्षण घेईल.” त्यांनी पुढे सांगितले की, ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण मंझी यांनी स्वतः त्यांच्याशी संपर्क साधला असून राज्य सरकार सर्वतोपरी मदत करत आहे. त्यांनी मुलीला ओडिशातील वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश देण्याची मागणी केली आहे.
तीन जण अटकेत, एक चौकशीत
अपू बाउरी ( वय 21), फिरदौस शेख (23) आणि शेख रियाजुद्दीन (31) या तीन आरोपींना या प्रकरणात पोलिसांनी अटक केली आहे. पीडितेसोबत असलेल्या मित्राचीही चौकशी सुरू आहे. पश्चिम बंगाल पोलिसांनी सोशल मीडियावर म्हटले आहे, “ही घटना आम्हालाही तेवढीच वेदना देते जितकी ओडिशाला. दोषींना कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही.”
इतर महत्त्वाच्या बातम्या
परपुरुषासोबतचा अश्लील फोटो बॉयफ्रेंडला दिसताच लॉजवर मोठं कांड, पुण्याच्या वाकडमधील घटनेने खळबळ
ADVERTISEMENT
