Solapur Politics : सांगोल्याचे दिवंगत नेते आणि 11 वेळेस आमदार झालेल्या गणपतराव देशमुखांच्या घरावर शुक्रवारी (दि.10) दारुच्या बाटल्या फेकण्यात आल्या. हा प्रकार भाजपची रॅली सुरु असताना घडलाय. त्यामुळे भाजपच्या या रॅलीविरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, याबाबत आता गपतराव देशमुख यांच्या पत्नी रतनबाई देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्या सांगोल्यात पत्रकारांशी बोलत होत्या. त्यांनी शुक्रवारी (दि.10) घडलेल्या प्रकाराबाबत सविस्तर भाष्य केलं आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा : Govt Job: 'स्टेट बँक ऑफ इंडिया'मध्ये ऑफिसर पदावर भरती व्हायचंय? आता कोणत्याही परीक्षेशिवाय मिळवा नोकरी...
मी 27 खेड्याची जहागीरदार आहे - रतनबाई देशमुख
रतनबाई देशमुख म्हणाल्या, कधी माझ्या दाराला हात कोणी लावला नाही. मी काय त्यांना भीत नाही. मी एक राजाची लेक आहे. मी 27 खेड्याची जहागीरदार आहे. देशमुखाच्या कुटुंबाच्या नादी लागन सोपं नव्हं. अनेकांचे प्रपंच धुळीला लागलेत.. ही कृती करणाऱ्या व्यक्तीला कडक शासन व्हावं. कोणतं सरकार त्यांना सोडवते ते मी बघणारच आहे. आत्तापर्यंत आमच्या घराला कोणी हात लावला नाही. मी काय त्यांना भीत नाही मी राजाची लेक आहे. मी 27 खेड्याची जहागीरदार आहे, असा इशाराही रतनाबाई देशमुख यांनी दिला आहे.
दरम्यान, शेतकरी कामगार पक्षातील पदाधिकाऱ्यांचा भाजप प्रवेशासाठी निघालेल्या मिरवणुकीमधील माथेफिरू कार्यकर्त्याने कैलासवासी स्वर्गीय गणपतराव देशमुख यांच्या घरावर दारूच्या बाटल्या आणी दगड फेकल्याने सांगोल्यातील वातावरण तापले आहे. याच्या निषेधार्थ संतप्त कार्यकर्त्यांनी आज (दि.10) सांगोला बंदची हाक दिली आहे.
शेतकरी कामगार पक्षाचे दिवंगत माजी आमदार गणपतराव देशमुख आणि सध्याचे आमदार बाबासाहेब देशमुख यांचे कट्टर समर्थक असलेले व शेकापचे नेते बाळासाहेब एरंडे यांचा पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उवस्थितीत भाजपमध्ये प्रवेश झाला. शेकापच्या शेकडो कार्यकर्त्यांसह बाळासाहेब एरंडे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. दरम्यान, भाजप प्रवेशासाठी निघालेल्या मिरवणुकीमधील एका माथेफिरूने कैलासवासी स्वर्गीय गणपतराव देशमुख यांच्या घरावर दारूची बाटली फेकल्याने सांगोल्यातील वातावरण तापले होते. या घटनेनंतर आज संपूर्ण सांगोला बंद असल्याचं पाहायला मिळालं.
पालकमंत्री जयकुमार गोरे काय म्हणाले?
दरम्यान पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी देखील घटनेचा निषेध व्यक्त केला आहे. गोरे म्हणाले भाई गणपतराव देशमुख यांच्या घरावर झालेला हल्ला चुकीचा असून पोलिसांनी तातडीने यात आरोपीस पकडून कारवाई करावी. कोणाच्याही घरावर हल्ला झाला तर तो खपवून घेता जाणार नसून भाई गणपतराव देशमुख आमच्यासाठी पूजनीय आहेत, असंही गोरे यांनी स्पष्ट केलं.
रोहित पवारांची टीका
सोलापूरच्या पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या भाजपच्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमा आधी झालेल्या रॅली मध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनी सांगोल्यातील स्व.गणपतराव देशमुख (आबा) यांच्या घरावर दारूच्या बाटल्या फेकल्या, हे अत्यंत दुर्दैवी आहे . या घटनेचा मी तीव्र शब्दात निषेध करतो. या घरात आबांच्या पत्नी व नातू विद्यमान आमदार बाबासाहेब देशमुख राहतात. सांगोल्याचे देशमुख कुटुंब हे राज्यातील एक आदर्श कुटुंब आहे. अशा भ्याड हल्ल्याने ते दबतील असे कोणाला वाटत असेल तर तो त्यांचा गैरसमज आहे. आम्ही सर्वजण याप्रसंगी देशमुख कुटुंबियाच्या सोबत आहोत.
ओमराजे निंबाळकरही संतापले
धाराशिवचे खासदार ओमराजे निबाळकर याबाबत बोलताना म्हणाले, सत्तेचा माज आणि संस्कृतीचा अपमान…महाराष्ट्राच्या राजकारणात प्रामाणिकपणा, तत्वनिष्ठता आणि आदर्श नेतृत्वाचं प्रतीक म्हणून ज्यांचं नाव घेतलं जातं, त्या स्व. गणपतराव आबा देशमुख यांच्या सांगोला येथील घरावर भाजपच्या रॅलीदरम्यान दारूच्या बाटल्या फेकण्यात आल्या — ही केवळ धक्कादायक नाही, तर महाराष्ट्राच्या संस्कृतीवर झालेली एक अमानुष चाप आहे.
ही तीच भाजपा आहे का जी स्वतःला “संस्कृतीरक्षक” म्हणवते? पण त्यांच्या रॅलीतून बाहेर येतंय दारूची नशा, गुंडगिरीची भाषा आणि सत्तेचा उन्माद! स्व. गणपतराव आबा सारख्या लोकनेत्यांच्या घरावर अशी घाणेरडी कृत्यं करून भाजपा कार्यकर्त्यांनी दाखवून दिलं आहे की सत्ता जेव्हा अहंकाराच्या नशेत चढते, तेव्हा माणुसकीचं भान हरवतं. ज्यांच्या घराचं दार बंद असतानाही आदर्शाचा सुगंध दरवळतो, त्या देशमुख कुटुंबावर झालेला हा प्रकार महाराष्ट्राच्या राजकारणातील अधःपाताचं जिवंत उदाहरण आहे. महाराष्ट्र म्हणजे संयम, आदर आणि संस्कारांची भूमी. पण सध्याचं सरकार हेच संस्कार पायदळी तुडवत आहे — ना शिष्टाचार उरलेत, ना आदर्श. ही केवळ बाटली फेकण्याची घटना नाही, तर महाराष्ट्राच्या विचारसरणीवर फेकलेली घाण आहे. दारूच्या नशेत बुडालेली ही सत्ता लोकांच्या जागृतीसमोर फार काळ टिकणार नाही. कारण महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अपमान करणाऱ्यांना इतिहास कधीच माफ करत नाही, असंही निंबाळकर यांनी सांगितलं.
हेही वाचा : Govt Job: 'स्टेट बँक ऑफ इंडिया'मध्ये ऑफिसर पदावर भरती व्हायचंय? आता कोणत्याही परीक्षेशिवाय मिळवा नोकरी...
ADVERTISEMENT
