डाव आखला मोठा, पण लढायला प्यादेच नाहीत; कधी नव्हे ते काँग्रेस अन् वंचितचे सूर जुळले, पण 16 जागांवर मोठा गेम

Mumbai Mahanagar Palika Election 2026 : यंदा मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस आणि प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडी यांच्यात युती झाली होती. जागावाटपाच्या चर्चेत काँग्रेसने मोठ्या मनाने वंचितला 62 जागा देण्याचा निर्णय घेतला होता. काँग्रेस स्वतः 150 जागांवर निवडणूक लढवणार होती. मात्र, वंचितने 62 पैकी केवळ 46 जागांवरच उमेदवारी अर्ज दाखल केले असून तब्बल 16 जागांवर उमेदवारच मिळू शकले नाहीत.

mumbai Mahanagar Palika Election 2026

mumbai Mahanagar Palika Election 2026

मुंबई तक

31 Dec 2025 (अपडेटेड: 31 Dec 2025, 11:31 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

वंचित बहुजन आघाडीचा अवसानघातकीपणा!

point

शेवटच्या क्षणी काँग्रेसला कळवलं अन्...16 जागांवर मोठा गेम

Mumbai Mahanagar Palika Election 2026 : मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया मंगळवारी (दि.30) संपली आणि त्यानंतर काँग्रेस–वंचित बहुजन आघाडी युतीतील एक मोठा पेच उघडकीस आला. देशाचे लक्ष लागलेल्या मुंबईच्या लढतीत कागदावर मजबूत वाटणारी ही युती प्रत्यक्ष मैदानात मात्र कमकुवत ठरल्याचे चित्र दिसत आहे. कारण, वंचित बहुजन आघाडीने त्यांच्या वाट्याला आलेल्या सर्व जागांवर उमेदवार मिळालेले नाहीत.

हे वाचलं का?

यंदा मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस आणि प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडी यांच्यात युती झाली होती. जागावाटपाच्या चर्चेत काँग्रेसने मोठ्या मनाने वंचितला 62 जागा देण्याचा निर्णय घेतला होता. काँग्रेस स्वतः 150 जागांवर निवडणूक लढवणार होती. मात्र, अर्ज भरण्याची अंतिम मुदत संपल्यानंतर समोर आलेल्या आकडेवारीने काँग्रेस नेतृत्वालाच धक्का दिला. वंचितने 62 पैकी केवळ 46 जागांवरच उमेदवारी अर्ज दाखल केले असून तब्बल 16 जागांवर उमेदवारच मिळू शकले नाहीत.

मुंबईसारख्या मोठ्या महापालिकेत वंचितची संघटनात्मक ताकद मर्यादित असल्याचे अनेकदा सांगितले जात होते. तरीही युती टिकवण्यासाठी आणि मतांचे विभाजन टाळण्यासाठी काँग्रेसने काही भागांत स्वतःची ताकद असतानाही त्या जागा वंचितसाठी सोडल्या. मात्र, या जागांवर प्रत्यक्षात वंचितकडे उमेदवारच नसल्याचे अर्ज प्रक्रियेअंती स्पष्ट झाले. धक्कादायक बाब म्हणजे ही परिस्थिती असूनही अर्ज भरण्याची मुदत संपेपर्यंत काँग्रेसला अधिकृत माहिती देण्यात आली नाही.

हेही वाचा : मीरा-भाईंदर महापालिका निवडणूक 2017 मध्ये भाजपची एकहाती सत्ता, 2025-26 या वर्षात काय होणार?

मुदत संपल्यानंतर ही बाब समोर आल्याने काँग्रेससमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे. या 16 जागांवर काँग्रेसकडे इच्छुक आणि निवडणूक लढवण्यास तयार असलेले उमेदवार होते. मात्र, युतीच्या करारामुळे आणि वेळ निघून गेल्याने त्यांना एबी फॉर्म देणे शक्य राहिले नाही. परिणामी काही ठिकाणी काँग्रेसचे इच्छुक उमेदवार अपक्ष म्हणून रिंगणात उतरले असून आता त्यांनाच अप्रत्यक्ष पाठिंबा देण्याची वेळ पक्षावर आली आहे.

काँग्रेस नेतृत्व सध्या नुकसान कसे कमी करता येईल, यावर मंथन करत आहे. अधिकृत उमेदवार उभे करता येणार नसले तरी शक्य त्या ठिकाणी बंडखोर किंवा अपक्ष उमेदवारांशी समन्वय साधण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी माहिती पक्षातील सूत्रांकडून मिळत आहे. युतीत मिठाचा खडा पडू नये म्हणून शांत भूमिका घेतली जात असली तरी अंतर्गत नाराजी लपून राहिलेली नाही.

दरम्यान, 1999 नंतर प्रथमच काँग्रेस राज्यातील महानगरपालिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर जागा लढवत आहे. मुंबईसह ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड, छत्रपती संभाजीनगर या महापालिकांत काँग्रेसने आक्रमक तयारी केली आहे. काही ठिकाणी वंचितसोबत मर्यादित युती असली तरी अनेक महापालिकांत काँग्रेस स्वबळावर रिंगणात उतरली आहे. मुंबईतील 16 जागांचा हा पेच निवडणूक निकालावर किती परिणाम करतो, हे येत्या काळात स्पष्ट होईल. मात्र, मोठा डाव आखूनही शेवटच्या टप्प्यात प्याद्यांची कमतरता भासल्याने काँग्रेस–वंचित युतीची गणिते बिघडल्याचे चित्र सध्या तरी दिसत आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

कुकरचा स्फोट झाल्याने गंभीररित्या भाजल्या, तरीही राष्ट्रवादीच्या महिला उमेदवाराने व्हिलचेअरवर येत भरला अर्ज

    follow whatsapp