nitesh rane letter to sanjay raut : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून नागपुरात आयोजित करण्यात आलेल्या 'रामरक्षा' उपक्रमासाठी उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले. लाखो रामभक्तांच्या संघर्षातून अयोध्येत श्रीराम मंदिर उभे राहिले असल्याचे सांगतानाच, याच मंदिरात चोरी, लुटमार, फसवणूक यांसारखे प्रकार घडत असून शेकडो कोटींचा अपहार झाल्याचा आरोप त्यांनी केला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही अयोध्येतील चोरीबाबत शोक व्यक्त केल्याचा उल्लेख करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने जनजागृतीसाठी 'रामरक्षा' उपक्रम सुरू केल्याचे त्यांनी पत्रात म्हटले.
ADVERTISEMENT
संजय राऊत यांनी पत्रात 18 जुलै 2026 रोजी सायंकाळी 4.30 वाजता नागपूरच्या रामनगर येथील राम मंदिरात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत 'रामरक्षा' उपक्रम होणार असल्याची माहिती दिली. हा कार्यक्रम नागपुरात होत असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आवर्जून उपस्थित राहून रामभक्तांना शुभेच्छा द्याव्यात, अशी आग्रहाची विनंतीही त्यांनी पत्रातून केली. 'रामरक्षा' म्हणजे रामाची सुरक्षा हे समजून घ्यावे, असेही त्यांनी पत्रात नमूद केले. आपल्या पत्रात राऊत यांनी फडणवीस हे प्रखर रामभक्त आणि कडवट हिंदुत्ववादी असल्याचे नमूद करत अयोध्येतील रामजन्मभूमी आंदोलनात त्यांच्या सहभागाचा उल्लेख केला.
नितेश राणे यांचं संजय राऊतांना प्रत्युत्तर
या पत्रानंतर भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी संजय राऊत यांना प्रत्युत्तर देत तीव्र शब्दांत टीका केली. देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिताना आपण प्रभू श्रीरामाच्या सुरक्षेपर्यंत जाऊन पोहोचलात, अशी टीका त्यांनी केली. प्रभू श्रीराम सर्वांची सुरक्षा करतात, त्यांची सुरक्षा आपण केव्हापासून करायला लागलात, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. रामरक्षा पाठ असणे तर दूरच, पुस्तकात पाहूनही रामरक्षेची दोन पाने आपला नेता धड वाचू शकत नाही आणि ते देवेंद्र फडणवीस यांना सल्ले देत आहेत, असे म्हणत त्यांनी राऊत यांच्यावर निशाणा साधला.
नितेश राणे यांनी आपल्या पत्रात रामाच्या नावाने राजकारण बंद करण्याचा सल्लाही दिला. अयोध्येच्या श्रीरामजन्मभूमी आंदोलनात ना संजय राऊत यांचा, ना उद्धव ठाकरे यांचा सहभाग होता, असा दावा त्यांनी केला. काँग्रेसविरोधात आंदोलन करत लाठी आणि गोळ्या झेलणाऱ्या कार्यकर्त्यांपैकी देवेंद्र फडणवीस हे एक असून त्यांनी तिन्ही कारसेवांमध्ये सहभाग घेतल्याचेही राणे यांनी नमूद केले. रामाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या नेत्यांच्या मांडीवर बसून रामाविषयी पुळका दाखवू नका आणि किमान रामाच्या नावाने राजकारण करू नका, असा टोला लगावत नागपुरात जात असाल तर संघभूमीवर नाक रगडून आतापर्यंत झालेल्या पापांची माफी मागा, असेही त्यांनी आपल्या पत्रात म्हटले.
ADVERTISEMENT












