मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या सुरू असलेल्या घडामोडींना आणखी वेग देणारी एक महत्त्वाची राजकीय भेट आज पार पडली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) चे नेते जयंत पाटील यांनी उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे यांची त्यांच्या शासकीय निवासस्थान 'नंदनवन' येथे 16 मार्च रोजी रात्री उशिरा भेट घेतली. या बैठकीला पवारांच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जितेंद्र आव्हाडही उपस्थित असल्याची माहिती समोर आली आहे.
ADVERTISEMENT
या भेटीमुळे राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. विशेष म्हणजे, अवघ्या दोन दिवसांपूर्वीच जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यानंतर लगेचच एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेली बैठक अनेक प्रश्न निर्माण करणारी ठरली आहे.
45 मिनिटे बंद दाराआड बैठक
माहितीनुसार, जयंत पाटील आणि एकनाथ शिंदे यांच्यात जवळपास 45 मिनिटे बंद दाराआड चर्चा झाली. या चर्चेदरम्यान नेमक्या कोणत्या विषयांवर चर्चा झाली, याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र बैठकीनंतर जयंत पाटील यांनी मर्यादित प्रतिक्रिया दिली.
हे ही वाचा>> सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला मनसेचा पाठिंबा; भाजपवर राज ठाकरेंची सडकून टीका
जयंत पाटील यांची अधिकृत प्रतिक्रिया
"नगर विकास खात्यातील आणि माझ्या काही वैयक्तिक कामांसाठी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. नगराध्यक्षांच्या अपात्रतेसंदर्भात अपील केल्याचंही त्यांच्या कानावर घातलं."
जयंत पाटील यांनी एवढीच प्रतिक्रिया दिल्याने बैठकीमागील राजकीय अर्थ लावण्याचे प्रयत्न अधिकच वाढले आहेत.
राष्ट्रवादीच्या हालचालींकडे सर्वांचे लक्ष
गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) संदर्भात विविध राजकीय चर्चा सुरू आहेत. पक्ष भविष्यात कोणती राजकीय भूमिका घेणार, महाविकास आघाडीत कायम राहणार की वेगळी रणनीती आखणार, याबाबत सातत्याने तर्क लावले जात आहेत.
हे ही वाचा>> शाहांनी असा कोणता फॉर्म्युला आणला की विरोधक डीलिमिटेशनला तयार होतायत?
अशा परिस्थितीत जयंत पाटील यांनी प्रथम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घेतलेली भेट राजकीय दृष्ट्या महत्त्वाची मानली जात आहे.
शरद पवार यांच्या हालचालींमुळेही चर्चांना बळ
काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही विधानभवनात एकनाथ शिंदे यांच्या दालनात जाऊन त्यांची भेट घेतली होती. त्या भेटीनंतरही विविध राजकीय चर्चांना उधाण आले होते.
आता त्याच मालिकेत जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांची शिंदेंसोबत झालेली बैठक पाहिली जात आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची पुढील राजकीय दिशा काय असेल, याबाबत उत्सुकता अधिक वाढली आहे.
एनडीए प्रवेशाच्या चर्चांना पुन्हा हवा?
राजकीय विश्लेषकांच्या मते, या सलग घडणाऱ्या भेटींमुळे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि महायुती यांच्यातील संबंधांबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. तथापि, सध्या पक्षाकडून एनडीएमध्ये प्रवेशाबाबत कोणतीही अधिकृत घोषणा किंवा पुष्टी करण्यात आलेली नाही. त्यामुळे अशा सर्व चर्चा या केवळ राजकीय तर्क-वितर्कांच्या पातळीवर आहेत.
आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका काय राहते आणि या बैठकींचा पुढील राजकीय घडामोडींवर काय परिणाम होतो, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
ADVERTISEMENT












