डोंबिवली: शास्त्रीनगर रुग्णालयातील महिला डॉक्टर आणि नर्सिंग कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेले शिंदे गटाचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाने त्यांना 50 हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. न्यायालयाने सुनावणीदरम्यान म्हात्रे यांची आरोग्यस्थिती तसेच प्रकरणातील इतर बाबींचा विचार करून हा निर्णय दिला.
ADVERTISEMENT
सरकारी पक्षाचा जामिनाला विरोध
सुनावणीदरम्यान सरकारी वकिलांनी जामीन अर्जाला कडाडून विरोध केला. आरोपीला जामीन दिल्यास तो या प्रकरणातील साक्षीदारांवर दबाव आणू शकतो, तसेच तपासावर परिणाम होण्याची शक्यता असल्याचा युक्तिवाद सरकारी पक्षाने न्यायालयात केला.
मात्र, बचाव पक्षाने या सर्व मुद्द्यांना प्रत्युत्तर देत आरोपी तपासात सहकार्य करत असल्याचा दावा केला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने रमेश म्हात्रे यांचा जामीन अर्ज मंजूर केला.
हे ही वाचा>> ‘तो रवी उगवला नाही’ विरुद्ध ‘सूर्याकडे थुंकू नका.. ', डॉक्टर मारहाण प्रकरणावरून डोंबिवलीत नवा राजकीय राडा
इतर आरोपीही दाखल करणार जामीन अर्ज
या प्रकरणातील इतर तीन आरोपींचे जामीन अर्जही कल्याण न्यायालयात दाखल करण्यात येणार आहेत. त्यामुळे आता न्यायालय त्यांच्याबाबत काय निर्णय देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नेमकं प्रकरण काय?
डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात काही दिवसांपूर्वी उपचारादरम्यान झालेल्या वादातून शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रेंनी डॉक्टर आणि नर्सिंग कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याचा आरोप आहे. या घटनेत महिला डॉक्टरला धक्काबुक्की करण्यात आली, तसेच रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनाही मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आला.
हे ही वाचा>> मोठी बातमी: ठाकरे, पवार थेट डोंबिवलीत.. शिंदेंचे नगरसेवक रमेश म्हात्रेंना अटक
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. डॉक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला.
राज्यभर डॉक्टरांचे आंदोलन
घटनेनंतर महाराष्ट्रातील विविध डॉक्टर संघटनांनी निषेध व्यक्त करत आंदोलन सुरू केले. सरकारी आणि खासगी रुग्णालयांतील डॉक्टरांनी आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. रुग्णालयांमधील डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.
पोलिसांची कारवाई
या प्रकरणात पोलिसांनी नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्यासह इतर आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली होती. त्यानंतर न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी आणि नंतर न्यायालयीन कोठडी सुनावली होती. आता रमेश म्हात्रे यांना जामीन मिळाला आहे.
रमेश म्हात्रे यांना जामीन मिळाला असला तरी त्यांच्यावरील गुन्ह्याचा तपास अद्याप सुरू आहे. तपास पूर्ण झाल्यानंतर पोलिसांकडून न्यायालयात दोषारोपपत्र (Chargesheet) दाखल केले जाणार आहे. तसेच इतर आरोपींच्या जामीन अर्जांवर होणाऱ्या सुनावणीकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.
डॉक्टरांवरील हल्ल्यांच्या घटनांबाबत राज्य सरकार आणि वैद्यकीय संघटनांची भूमिका काय राहणार, तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी आणखी कोणती पावले उचलली जाणार, याकडेही संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
ADVERTISEMENT












