‘तो रवी उगवला नाही’ विरुद्ध ‘सूर्याकडे थुंकू नका.. ', डॉक्टर मारहाण प्रकरणावरून डोंबिवलीत नवा राजकीय राडा
डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टर-नर्स मारहाण प्रकरणावरून मनसे, भाजप यांच्यात आरोप-प्रत्यारोपांची ठिणगी पडली आहे.
ADVERTISEMENT

डोंबिवली: डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टर आणि नर्स मारहाण प्रकरण आता राजकीय वादाच्या केंद्रस्थानी पोहोचलं आहे. मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी काल भाजप प्रदेशाध्यक्ष तथा आमदार रवींद्र चव्हाण यांच्यावर टीका करत "तो रवी उगवला नाही" असा टोला लगावला. आज भाजपच्या नगरसेवकांनी या रुग्णालयाची पाहणी करत भाजपचे नेते दीपेश म्हात्रे यांनी "सूर्याकडे बघून थुंकायचं नसतं" असे म्हणत प्रत्युत्तर दिले. तर भाजपचे जिल्हाप्रमुख नंदू परब यांनीही 'रमेश म्हात्रे याची कृती चुकीची मात्र ते आमच्या परिवाराचे सदस्य आहेत आम्ही त्यांना समज देऊ...' असे सांगत हळूच राजू पाटील यांचे नाव न घेता चिमटा काढला.
रमेश म्हात्रेकडून डॉक्टरांना मारहाण अन् डोंबिवलीत नवं राजकारण
शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टर आणि नर्स मारहाण प्रकरणाचे पडसाद आता राजकीय वर्तुळात उमटू लागले आहेत. या प्रकरणात मनसेने उडी घेत या मतदारसंघाचे आमदार व भाजपचा कुठलाही पदाधिकारी या रुग्णालयात गेले नसल्याचा आरोप करत थेट भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण यांच्यावर रवींद्र चव्हाण यांच्यावर जोरदार टीका केली.
हे ही वाचा>> मोदींचे 'Blue Eyed Boy' असलेल्या देवेंद्र फडणवीसांना महाराष्ट्रातून दिल्लीत नेणं इतकं सोपं आहे का?
"मारहाण शिवसेनेच्या नगरसेवकांनी केली, पण भाजपचे आमदार कुठे आहेत? तो रवी उगवला, पण आमचा रवी उगवला नाही," असा सवाल त्यांनी केला. तसेच कमळ लावून कोणाच्या स्मशानात आणि वाढदिवसाला जायचं नसतं लोकांचे काम देखील करायचे असतात असं देखील आरोप करत रवींद्र चव्हाण यांना सल्ला दिला होता. तसेच रुग्णालयातील अपुऱ्या सुविधा, डॉक्टरांची उपस्थिती आणि कर्मचाऱ्यांच्या वर्तनाबाबत येणाऱ्या तक्रारींवरही त्यांनी बोट ठेवले.
राजू पाटील यांच्या टीकेला भाजपचे नेते स्थानिक नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी प्रत्युत्तर देत, "रवी म्हणजे सूर्य आणि सूर्याकडे बघून थुंकायचं नसतं," असा पलटवार केला. डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या पाठीशी भाजप पहिल्या दिवसापासून उभी असल्याचा दावा करत त्यांनी डोंबिवलीसाठी स्वतंत्र सिव्हिल हॉस्पिटल उभारण्याची मागणीही केली.










