सुनेत्रा पवारांसमोर अडचण, एक नोटीस आणि NCPचं राष्ट्रीय अध्यक्षपद जाणार?

मुंबई तक

14 Jul 2026 (अपडेटेड: 14 Jul 2026, 09:08 AM)

sunetra pawar : सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीवर पक्षातीलच ज्येष्ठ नेते सच्चिदानंद सिंह यांनी नोटीस पाठवत आक्षेप घेतला आहे. राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक रद्द करून नव्याने घेण्याची मागणी या नोटिसमध्ये करण्यात आली आहे.

sunetra pawar

sunetra pawar

Google CTA

बातम्या हायलाइट

point

सुनेत्रा पवारांसमोर अडचण

point

एक नोटीस आणि NCPचं राष्ट्रीय अध्यक्षपद जाणार?

sunetra pawar : माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर त्यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली. मात्र, आता त्यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीवरच पक्षातील ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. 9 जुलै रोजी त्यांनी वकिलामार्फत नोटीस बजावत राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक पुन्हा घेण्याची मागणी केली आहे. ही नोटीस सुनेत्रा पवार यांना पक्षाच्या अध्यक्ष या नात्याने, प्रफुल्ल पटेल यांना कार्यकारी अध्यक्ष म्हणून आणि ब्रिजमोहन श्रीवास्तव यांना पक्षाचे सचिव म्हणून पाठवण्यात आली आहे.

हे वाचलं का?

हेही वाचा : Personal Finance: इथेनॉलची मागणी वाढणार, आता ‘त्या’ कंपन्यांचे शेअर्स खरेदी करावे का?

राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक अवैध असल्याचा दावा

या नोटीसमध्ये 26 फेब्रुवारी 2026 रोजी झालेली राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक अवैध असल्याचा दावा करण्यात आला आहे. ती निवडणूक रद्द करून स्वतंत्र आणि निपक्षपाती निवडणूक अधिकाऱ्याच्या देखरेखीखाली नव्याने निवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच, नव्याने निवडणूक होईपर्यंत राष्ट्रीय अध्यक्ष आणि सुधारित पदाधिकाऱ्यांची यादी रद्द समजावी, असेही नोटिसीत नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीवर पक्षांतर्गत वाद निर्माण झाल्याचे चित्र आहे.

हेही वाचा : Exclusive: ...तर थेट जन्मठेप! तुकाराम मुंढेंचा मोठा इशारा, दूधात भेसळ करायचा विचार विसरून जा!

सच्चिदानंद सिंह आहेत तरी कोण? 

सच्चिदानंद सिंह हे राष्ट्रवादी काँग्रेसचे झारखंड प्रदेशाध्यक्ष असून ते गेल्या 15 वर्षांपासून पक्षाशी जोडलेले आहेत. अजित पवार राष्ट्रीय अध्यक्ष असताना डिसेंबर 2023 मध्ये कर्जत येथे त्यांची राष्ट्रीय सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, 26 फेब्रुवारी 2026 रोजी जाहीर झालेल्या नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीत त्यांचा समावेश करण्यात आला नाही. त्यानंतर त्यांनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीविरोधात थेट भूमिका घेतली आहे. आपल्या नोटिसीत त्यांनी निवड प्रक्रियेतील अनेक मुद्द्यांवर आक्षेप नोंदवत ती घटनाबाह्य असल्याचा दावा केला आहे.

नोटिसीनुसार, 28 जानेवारी रोजी अजित पवार यांच्या निधनानंतर 17 फेब्रुवारी 2026 रोजी पक्षाने निवडणूक आयोगाकडे सुधारित घटना सादर केली होती. त्यामध्ये नव्या राष्ट्रीय अध्यक्षांची निवड होईपर्यंत प्रफुल्ल पटेल यांच्याकडे राष्ट्रीय अध्यक्षांचे अधिकार असतील, असे नमूद करण्यात आले होते. त्यामुळे सुधारित घटनेनुसार राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक बोलावण्याचा अधिकार प्रफुल्ल पटेल यांच्याकडे होता, मग ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनी कोणत्या अधिकाराने 26 फेब्रुवारीची बैठक बोलावली, असा प्रश्न सिंह यांनी उपस्थित केला आहे. तसेच, 18 फेब्रुवारी रोजी निवडणूक आयोगाला पाठवण्यात आलेल्या पत्रासाठी तत्कालीन राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्यांची परवानगी घेण्यात आली नव्हती, असाही आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीच्या वैधतेवर गंभीर प्रश्न निर्माण झाल्याचा दावा नोटिसीत करण्यात आला असून, आता या नोटिसीवर सुनेत्रा पवार किंवा राष्ट्रवादी काँग्रेसकडून काय उत्तर दिले जाते, याकडे लक्ष लागले आहे.