मुंबई: मागील काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात एक चर्चा सातत्याने रंगली आहे. ती म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना केंद्रात मोठी जबाबदारी दिली जाणार. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा सुरू झाल्यानंतर हा मुद्दा सातत्याने पुढे येत आहे. भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय राजकारणात देवेंद्र फडणवीस हे प्रभावी आणि विश्वासार्ह चेहरा मानले जात असल्याने त्यांना दिल्लीत बोलावण्याच्या शक्यतेबाबत वेळोवेळी चर्चा होते.
ADVERTISEMENT
पण या चर्चेकडे केवळ अफवा किंवा राजकीय गॉसिप म्हणून पाहता येणार नाही. कारण त्यामागे महाराष्ट्रातील भाजपची संघटनात्मक रचना, निवडणूक व्यवस्थापन, दिल्लीतील नेतृत्वाचा विश्वास आणि राज्यातील सत्तेचं गणित अशा अनेक महत्त्वाच्या बाबी जोडल्या आहेत. यामुळेच मोदींचे 'Blue Eyed Boy'असलेल्या फडणवीसांना दिल्लीत नेणं इतकं सोपं नाही!
देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र भाजपचा सर्वात मोठा चेहरा
गेल्या दहा-बारा वर्षांत महाराष्ट्र भाजपमध्ये अनेक नेते पुढे आले. मात्र राज्यव्यापी स्वीकार, निवडणूक व्यवस्थापन आणि संघटनात्मक पकड या तिन्ही बाबतीत फडणवीसांनी स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे.
हे ही वाचा>> पवार स्वत: शिंदेंच्या दालनात गेले.. याचा अर्थ दिसतो तेवढा सरळ-सोप्पा नाही! भेटीमागची भन्नाट Inside Story
2014 मध्ये प्रथमच महाराष्ट्रात भाजपचा सर्वात मोठा पक्ष म्हणून उदय झाला होता. त्यानंतर 2019 च्या विधानसभा निवडणुकीतही भाजपने शंभरच्या पुढे जागा जिंकल्या. सत्ता समीकरणं बदलली असली तरी पक्षाच्या मताधिक्यात फारशी घट झाली नव्हती. 2022 मध्ये झालेल्या सत्तांतरानंतरही महाराष्ट्रातील भाजपची संघटनात्मक ताकद कायम राहिली. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्येही भाजपने ऐतिहासिक यश मिळवलं.
राजकीय विश्लेषकांच्या मते, या सातत्यामागे केवळ पक्षाची विचारधारा नाही तर फडणवीस यांचं निवडणूक व्यवस्थापन, बूथ पातळीवरील नियोजन, उमेदवार निवड आणि कार्यकर्त्यांशी सातत्याने असलेला संपर्क हेही मोठे घटक आहेत.
मागील तिन्ही विधानसभा निवडणुकांमध्ये देवेंद्र फडणवीस हे प्रचाराचे प्रमुख चेहरा, निवडणूक रणनीतीकार आणि संघटन समन्वयक म्हणून सक्रिय होते. त्यामुळे महाराष्ट्र भाजपची आजची रचना मोठ्या प्रमाणावर त्यांच्या नेतृत्वाभोवती उभी असल्याचं अनेक राजकीय निरीक्षकांचं मत आहे.
फडणवीस म्हणजे मोदींचे 'Blue Eyed Boy'
भाजपत कोणत्याही मोठ्या राज्यातील नेतृत्वाचं भवितव्य हे केंद्रीय नेतृत्वाच्या विश्वासावर अवलंबून असतं. फडणवीसांना अनेक वर्षांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विश्वासू नेते मानलं जातं. त्यामुळेच राज्यातील प्रत्येक निर्णायक टप्प्यावर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने आणि विशेषत: पंतप्रधान मोदींनी फडणवीसांवर महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपवल्या आहेत. त्यामुळेच राजकीय वर्तुळात फडणवीसांना मोदींचे 'Blue Eyed Boy' म्हणून ओळखलं जातं.
फडणवीस दिल्लीत तर महाराष्ट्राचं नेतृत्व कोणाकडे?
मात्र, आता फडणवीस दिल्लीत गेले तर महाराष्ट्रात नेतृत्व कोण करणार? याच प्रश्नावर सर्वाधिक चर्चा होत आहे. महाराष्ट्र भाजपमध्ये अनेक वरिष्ठ नेते असले तरी संपूर्ण राज्यभर स्वीकारार्ह नेतृत्व, निवडणूक व्यवस्थापनाची क्षमता, प्रशासनाचा अनुभव आणि दिल्लीशी थेट संवाद या चारही बाबी फडणवीसांकडे असणं ही त्यांच्यासाठी अत्यंत जमेची बाब आहे.
हे ही वाचा>> महाराष्ट्राच्या राजकारणाचा नवा अंक सुरू? पहिल्यांदाच शरद पवारांवर संजय राऊत नाराज!
याशिवाय फडणवीस दिल्लीत गेल्यास त्यांच्या जागी कोण मुख्यमंत्री होऊ शकतो, हा प्रश्न जितका महत्त्वाचा आहे, तितकाच महत्त्वाचा प्रश्न म्हणजे पक्षाचं नेतृत्व कोण करणार हा देखील कळीचा मुद्दाए. कारण मुख्यमंत्री बदलणं आणि पक्षाचं नेतृत्व बदलणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत.
भाजपसाठी महाराष्ट्र हे लोकसभा आणि विधानसभा या दोन्ही दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं राज्य आहे. 2029 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील संघटन कमकुवत होणं हे पक्षाला परवडणारं नाही. याच कारणामुळे काही राजकीय विश्लेषकांचं मत आहे की, सध्याच्या परिस्थितीत फडणवीसांना दिल्लीत नेण्यापेक्षा महाराष्ट्रातच ठेवणं हे भाजपसाठी अधिक फायदेशीर ठरू शकतं.
महाराष्ट्रात महायुतीचं सरकार आहे. शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि भाजप यांच्यातील समन्वय टिकवून ठेवणं ही देखील मोठी जबाबदारी आहे. या आघाडीत देवेंद्र फडणवीस समन्वयकाची भूमिकाही बजावत असल्याचं अनेकदा दिसून आलं आहे. त्यामुळे नेतृत्वात अचानक बदल झाल्यास त्याचा परिणाम महायुतीच्या अंतर्गत राजकारणावरही होऊ शकतो.
दिल्लीसाठी सक्षम नेता की महाराष्ट्रासाठी अपरिहार्य चेहरा?
देवेंद्र फडणवीस यांचं राष्ट्रीय राजकारणातील महत्त्व नाकारता येणार नाही. एक पारदर्शक आणि कर्तव्यदक्ष प्रशासक अशी त्यांची राजकीय वर्तुळात ओळख आहे. त्यामुळेच ते केंद्रातही प्रभावी भूमिका बजावू शकतात. मात्र दुसरीकडे महाराष्ट्रातील भाजपची आजची रचना, निवडणुकीतील सातत्यपूर्ण कामगिरी आणि राज्यातील नेतृत्वाचं केंद्रीकरण पाहता त्यांना राज्यातून हलवण्याचा निर्णय हा तूर्तास तरी राजकीय दृष्ट्या व्यावहारिक नसल्याचं दिसत आहे. मात्र, असं असलं तरी मोदी-शाह हे कायमच राजकारणात अनपेक्षित आणि आश्चर्याचे धक्के देणारे निर्णय घेत आले आहेत. हे ही विसरता कामा नये!
ADVERTISEMENT












