'हाण की बडीव' सभागृहात आदित्य ठाकरे, भास्कर जाधव भडकले, संपूर्ण ड्रामा

मुंबई तक

10 Jul 2026 (अपडेटेड: 10 Jul 2026, 08:55 AM)

bhaskar jadhav aaditya thackeray : मुसळधार पावसामुळे घडत असलेल्या घटनांबाबत आमदार भास्कर जाधव विधानसभेत बोलत होते. त्यांनी मंत्री उपस्थित नसल्याच्या मुद्यावरुन नाराजी व्यक्त केली. त्यानंतर भाजप आमदार अतुल भातखळकर त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी उठले. त्यामुळे आमदार आदित्य ठाकरे आणि भास्कर जाधव यांनी आक्रमक होऊन त्यांना प्रत्युत्तर दिले.

bhaskar jadhav aaditya thackeray

bhaskar jadhav aaditya thackeray

Google CTA

बातम्या हायलाइट

point

'हाण की बडीव' सभागृहात आदित्य ठाकरे, भास्कर जाधव भडकले, संपूर्ण ड्रामा

point

मुसळधार पावसामुळे घडत असलेल्या घटनांबाबत ठाकरे गट आक्रमक

bhaskar jadhav aaditya thackeray vidhansabha  : विधानसभेत राज्यावरील संकटासंदर्भात सुरू असलेल्या चर्चेदरम्यान ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी सरकारच्या भूमिकेवर जोरदार टीका केली. राज्यावर एवढे मोठे संकट आलेले असताना मदत व पुनर्वसन खात्याचे कॅबिनेट मंत्री सभागृहात उपस्थित नसल्याचा मुद्दा उपस्थित करत त्यांनी नाराजी व्यक्त केली. अशा महत्त्वाच्या विषयावर संबंधित कॅबिनेट मंत्री किंवा मुख्यमंत्री यांनी उत्तर देणे अपेक्षित असल्याचे सांगत, एखाद्या राज्यमंत्र्याकडून उत्तर दिले जाणार असेल तर अशा चर्चेचा काय उपयोग, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. सरकार या विषयाकडे गंभीरतेने पाहत नसल्याचा आरोप करत, अशा प्रकारे चर्चा उरकण्याचा प्रयत्न होत असल्याची टीकाही त्यांनी केली.

हे वाचलं का?

राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांचे उत्तर 

यावेळी सरकारच्या बाजूने उत्तर देताना संबंधित खात्याचे राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी आपण सरकारच्या वतीने उत्तर देणार असल्याचे स्पष्ट केले. मदत व पुनर्वसन खात्याचे मंत्री घटनास्थळी असून सरकारच्या वतीने उत्तर देण्याची जबाबदारी आपण पार पाडत असल्याचे त्यांनी सांगितले. कोणत्या मंत्र्यांनी उत्तर द्यावे, असा आग्रह विरोधकांनी धरू नये, असेही आशिष जयस्वाल म्हणाले.. मात्र भास्कर जाधव यांनी त्यावर समाधान व्यक्त केले नाही. महाराष्ट्रावर एवढे मोठे संकट आले असताना सरकार बेजबाबदार, निर्दयी आणि बहुमताच्या जोरावर वागत असल्याचा आरोप त्यांनी केला. अशा परिस्थितीत केवळ भाषणे करून विषय संपवला जात असल्याची टीकाही त्यांनी सभागृहात केली.

आमदार अतुल भातखळकर मध्येच बोलण्यासाठी उभे राहिले 

दरम्यान, भाजपचे आमदार अतुल भातखळकर हे मध्येच बोलण्यासाठी उभे राहिल्यानंतर वातावरण आणखी तापले. त्यांनी भास्कर जाधव यांच्यावर टीका करत, ज्यांना विरोधी पक्षनेते होण्याची आस लागली आहे त्यांनाच मदत व पुनर्वसन मंत्री कोण आहेत हे माहिती नसल्याचा टोला लगावला. सरकार संवेदनशीलपणे उत्तर देत असताना सरकारला बेताल म्हणणे योग्य नसल्याचेही त्यांनी म्हटले. त्यानंतर सभागृहात दोन्ही बाजूंनी जोरदार शाब्दिक चकमक झाली. अध्यक्षांनी वारंवार हस्तक्षेप करून सदस्यांना शांत राहण्याचे आणि मूळ विषयावर बोलण्याचे आवाहन केले.

अतुल भातखळकर यांच्या वक्तव्यानंतर शिवसेना (ठाकरे गट) आमदार आदित्य ठाकरे यांनीही आक्रमक भूमिका घेत त्यांना प्रत्युत्तर दिले. त्यानंतर भास्कर जाधव यांनीही भातखळकर यांच्यावर जोरदार टीका करत त्यांच्या बोलण्याच्या शैलीवर आक्षेप घेतला. प्रत्येक वेळी अहंकारी पद्धतीने वागण्याचा आरोप करत, तुम्हाला बोलण्याचा अधिकार कोणी दिला, असा सवाल त्यांनी केला. तसेच राज ठाकरे यांच्या मुलाखतीचा उल्लेख करत भातखळकर यांच्यावरही टीका केली. अध्यक्षांनी वारंवार हस्तक्षेप करून चर्चा मूळ विषयावर आणण्याचा प्रयत्न केला. अखेरीस भास्कर जाधव यांनी संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष या चर्चेकडे लागले असून सभागृहातून जनतेला दिलासा देणारे उत्तर मिळणे अपेक्षित असल्याचे सांगत आपले म्हणणे पुढे सुरू ठेवले.