मुंबई: मुंबई-पुणे मिसिंग लिंक प्रकल्पाजवळ दरड कोसळल्याने राज्यातील फडणवीस सरकारवर विरोधकांनी जोरदार हल्लाबोल केला होता. त्यावरून झालेल्या वादावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (10 जुलै) विधानसभेत सविस्तर भूमिका मांडली. प्रकल्पाबाबत खोट्या अफवा पसरवून महाराष्ट्राची बदनामी करण्यात आल्याचा आरोप करत त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर नाव न घेता जोरदार निशाणा साधला. याचवेळी यापूर्वी केलेल्या 'भाडे के टट्टू' या वक्तव्याबाबत स्पष्टीकरण देत ते मागे घेत असल्याचे सांगितले. मात्र, त्याऐवजी 'भाटक गदर्भ' हा शब्दप्रयोग करत त्यांनी विरोधकांवर पुन्हा टीका केली.
ADVERTISEMENT
मिसिंग लिंक प्रकल्पावरून फडणवीसांचा हल्लाबोल
मुख्यमंत्री म्हणाले की, मिसिंग लिंक प्रकल्पातील केबल-स्टे ब्रिज आणि अत्याधुनिक बोगद्यांना कोणताही तडा गेलेला नाही किंवा कोणतेही संरचनात्मक नुकसान झालेले नाही. असे असतानाही "सहा हजार कोटी रुपये पाण्यात गेले" अशा प्रकारच्या बातम्या आणि अफवा पसरवण्यात आल्या.
हे ही वाचा>> "मुख्यमंत्री आहेस ना तू..", फडणवीसांच्या विधानसभेतील भाषणावरुन राज ठाकरे संतापले
फडणवीस म्हणाले, "हा केवळ माझा अपमान नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान आहे. राज्यातील महत्त्वाच्या पायाभूत प्रकल्पांबाबत खोटी माहिती पसरवून जनतेची दिशाभूल केली जात आहे."
'भाडे के टट्टू'ऐवजी आता 'भाटक गदर्भ'
आपल्या वादग्रस्त वक्तव्याचा उल्लेख करत मुख्यमंत्री म्हणाले, "मी हिंदीमध्ये 'भाडे के टट्टू' असे बोललो होतो. त्यावर काहींनी आक्षेप घेतला आणि मुख्यमंत्र्यांनी अधिक सुसंस्कृत भाषा वापरायला हवी होती, असे सांगितले. त्यामुळे मी ते शब्द मागे घेतो. आता त्याऐवजी 'भाटक गदर्भ' असे म्हणतो. किंवा मराठीत सुपारीबाज.. म्हणतो"
यावेळी त्यांनी उपरोधिक शैलीत पुढे म्हटले, "मी कोणाचे नाव घेतले नव्हते. मी फक्त टोपी फेकली होती; पण ती अनेकांच्या डोक्यावर जाऊन पडली. त्यामुळे अनेकांना ती लागली."
राज ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला
मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज ठाकरे यांचे नाव न घेता आणखी एक उपरोधिक टिप्पणी केली.
"मी एक वाक्य हिंदीत बोललो कारण ज्यांना ते समजायला हवे होते त्यांच्यासाठी ते बोललो. पण दुसऱ्यांनाच मिरची लागली. आमचे काही मिमिक्री आर्टिस्ट मला हिंदीत का बोललात, असे विचारू लागले. ते आमचे मित्र आहेत. त्यांनी जर राजकारणाऐवजी मिमिक्रीच्या क्षेत्रात करिअर केले असते, तर महाराष्ट्रातील एकाही स्टँड-अप कॉमेडियनला बाजारपेठ उरली नसती," असे ते म्हणाले.
कायदा-सुव्यवस्थेवर विरोधकांना उत्तर
कायदा आणि सुव्यवस्थेवरील चर्चेला उत्तर देताना फडणवीस यांनी विरोधकांकडून महाराष्ट्राबाबत चुकीची आकडेवारी मांडली जात असल्याचा आरोप केला.
हे ही वाचा>> पवार स्वत: शिंदेंच्या दालनात गेले.. याचा अर्थ दिसतो तेवढा सरळ-सोप्पा नाही! भेटीमागची भन्नाट Inside Story
त्यांच्या मते, गुन्हेगारीचा दर हा प्रति एक लाख लोकसंख्येमागील गुन्ह्यांच्या प्रमाणावर मोजला जातो. केवळ एकूण गुन्ह्यांच्या संख्येच्या आधारे राज्यांची तुलना करणे चुकीचे आहे.
"अधिकृत आकडेवारीनुसार महाराष्ट्र गुन्हेगारीत देशात सातव्या क्रमांकावर आहे. महिलांविरुद्धच्या गुन्ह्यांमध्ये राज्य नवव्या क्रमांकावर असून, बालकांविरुद्धच्या गुन्ह्यांमध्ये सातव्या क्रमांकावर आहे. त्यामुळे महाराष्ट्राला देशात गुन्हेगारीत पहिल्या क्रमांकावर असल्याचे चित्र उभे करणे चुकीचे आहे," असे मुख्यमंत्री म्हणाले.
'अफवा पसरवू नका, तथ्यांवर बोला'
भाषणाच्या शेवटी फडणवीस यांनी विरोधकांना उद्देशून, "महाराष्ट्राच्या विकास प्रकल्पांबाबत खोट्या बातम्या पसरवू नका. तथ्यांच्या आधारे चर्चा करा. अफवा पसरवून राज्याची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करू नका," असे आवाहन केले.
राज ठाकरेंनी नेमकी काय केली होती टीका?
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रेल्वे कामगार सेनेचा वर्धापन दिनाच्या निमित्ताने केलेल्या भाषणात मुख्यमंत्र्यांचा चांगलाच समाचार घेतला होता.
"मला दुसरं एक कळालं नाही..मुख्यमंत्र्यांचं विधानसभेतील भाषण... मिसिंग लिंक हे उत्तम दर्जाचं कंस्ट्रक्शन आहे वगैरे वगैरे... आणि याचं जर समजा कोणी राजकारण करत असेल आम्ही बघून घेऊ त्यांना... मुख्यमंत्री आहेस ना तू?? बघून घेऊ...? बरं झालं ते झालं... पुढे वाक्य संपल्या संपल्या हिंदीतून बोलायला सुरु केलं. कोणासाठी हिंदी बोललात? समोर आमदार मराठी होते. महाराष्ट्राची विधानसभा आहे... महाराष्ट्राच्या विधानसभेत आमचा मुख्यमंत्री हिंदीत बोलतो कशासाठी? कोणाला सांगायचं होतं? कदाचित आपल्याच पक्षातील वरच्या लोकांना सांगायचं असेल बघून घेईल...त्यांनाही माहिती आहे..व्हिडीओ वगैरे कुठून येत आहेत. हे सगळं राजकारण काय सुरु आहे? हे मी माझ्या पत्रकार परिषदेतही बोललो होतो. जे काय त्यांच्या पक्षामध्ये घमासान सुरु आहे ना? ते पाहात राहा... " अशा शब्दात राज ठाकरेंनी फडणवीसांवर प्रहार केला होता. ज्याला आता फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
ADVERTISEMENT












