आदित्य ठाकरे विधानसभेत चवताळून उठले.. पण तिथं आधी आणि नंतर घडलं तरी काय?, सगळंच प्रचंड इंटरेस्टिंग!

मुंबई तक

• 08:38 PM • 09 Jul 2026

Aditya Thackeray vs Atul Bhatkhalkar: महाराष्ट्र विधानसभेत चर्चेदरम्यान आदित्य ठाकरे, भास्कर जाधव आणि अतुल भातखळकर यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक उडाली. यावेळी आदित्य ठाकरे प्रचंड संतापल्याचं पाहायला मिळाले.

aditya thackeray flared up in legislative assembly but what exactly happened before and after that its all absolutely fascinating

aditya thackeray flared up in legislative assembly but what exactly happened before and after that its all absolutely fascinating

Google CTA

मुंबई: राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात गुरुवारी (9 जुलै) महाराष्ट्र विधानसभेत अल्पकालीन चर्चेदरम्यान मोठा राजकीय गोंधळ पाहायला मिळाला. शिवसेना UBT पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांनी सरकारकडे मुसळधार पाऊस, दरडी कोसळण्याच्या घटना आणि नैसर्गिक आपत्तीवर काही प्रश्न उपस्थित केले होते. ज्याचे पुढेत वादात रुपांतर झाले. यावेळी भाजपचे आमदार अतुल भातखळकर आणि शिवसेना (UBT) नेते आदित्य ठाकरे यांच्यातील तीव्र शाब्दिक चकमकही पाहायला मिळाली.

हे वाचलं का?

सभागृहात 'तुम्ही बसा खाली', 'राम मंदिर लुटणारे', 'चंदा चोरांनी बोलू नये' अशा आरोप-प्रत्यारोपांमुळे वातावरण काही काळ तणावपूर्ण बनले. अखेर तालिका अध्यक्ष समाधान आवताडे यांनी हस्तक्षेप करत सदस्यांना शांत राहण्याचे आवाहन केले.

भास्कर जाधवांनी उपस्थित केला संवेदनशील मुद्दा

अल्पकालीन चर्चेदरम्यान भास्कर जाधव यांनी राज्यातील मुसळधार पाऊस, दरडी कोसळण्याच्या घटना, पूरस्थिती आणि नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनावर सरकारला धारेवर धरले. या विषयावर उत्तर महसूल मंत्री किंवा मदत व पुनर्वसन विभागाच्या कॅबिनेट मंत्र्यांनीच द्यावे, अशी त्यांनी मागणी केली होती. मात्र त्यावेळी संबंधित कॅबिनेट मंत्री सभागृहात उपस्थित नव्हते.

हे ही वाचा>> "मुख्यमंत्री आहेस ना तू..", फडणवीसांच्या विधानसभेतील भाषणावरुन राज ठाकरे संतापले

राज्यमंत्र्यांच्या उत्तरालाही भास्कर जाधवांचा आक्षेप

पुनर्वसन विभागाचे राज्यमंत्री आशिष जायस्वाल यांनी सरकारच्या वतीने उत्तर देण्याचा प्रयत्न केला. मात्र भास्कर जाधव यांनी यावर आक्षेप घेत हा विषय राज्यासाठी अत्यंत संवेदनशील असल्याने कॅबिनेट मंत्र्यांनीच उत्तर देणे अपेक्षित असल्याचे स्पष्ट केले.

अतुल भातखळकरांचा टोला; विरोधकांवर निशाणा

याचदरम्यान भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी 'पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन'द्वारे हस्तक्षेप करत विरोधकांवर टीका केली.

भातखळकर म्हणाले की, संबंधित विषयाचे राज्यमंत्री सभागृहात उपस्थित आहेत. सरकार संवेदनशीलतेने उत्तर देत असताना सरकारला उद्दाम किंवा बेताल म्हणणे योग्य नाही. तसेच "ज्यांना विरोधी पक्षनेते होण्याची आस लागली आहे, त्यांना राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री कोण आहेत हेही माहिती नाही," असा टोला त्यांनी लगावला.

हे ही वाचा>> "अशाने मोठ्या नेत्यांची विश्वासार्हता कमी होते...", संजय राऊत पवारांवर भडकले

आदित्य ठाकरे संतापले..

भातखळकरांच्या वक्तव्यानंतर शिवसेना (UBT) आमदार आदित्य ठाकरे यांनीही हस्तक्षेप करत, "सत्ताधारी पक्षातून कोण आहे इथे?" असा सवाल उपस्थित केला.

यावर अतुल भातखळकर यांनी आदित्य ठाकरेंना उद्देशून "तुम्ही बसा खाली..." अशी टिप्पणी केली.

'राम मंदिर लुटणारे...' म्हणत आदित्य ठाकरेंची जोरदार प्रतिक्रिया

अतुल भातखळकरांच्या या वक्तव्यानंतर आदित्य ठाकरे मात्र अक्षरश: चवताळून उठले आणि त्यांनी भाजपवर आगपाखड करण्यास सुरुवात केली. 

'तुम्ही सांगू नका.. राम मंदिर लुटणारे आहात तुम्ही.. राम मंदिर लुटणाऱ्यांनी आम्हाला सांगू नये. मंदिर लुटणाऱ्यांनी आम्हाला सांगू नये.. बसा खाली तुम्ही.. मंदिर लुटणाऱ्यांनी आम्हाला सांगू नये. राम मंदिर लुटणाऱ्यांनी सांगू नये.. नीट बोला.. नीट बोला.. नीट बोला.. वय बघा तुमचं..'

अशी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यानंतर त्यांनी "चंदा चोरांनी बोलू नये" असेही वक्तव्य केले. त्यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे सभागृहात मोठा गोंधळ निर्माण झाला.

भास्कर जाधवांचाही संताप अनावर

या गदारोळात भास्कर जाधव यांनीही अतुल भातखळकरांवर जोरदार टीका केली. 'लय लय उर्मट आणि घमेंडखोर.. नुसता बसलाय कोपऱ्यात.. प्रत्येक वेळेस हे असं.. आणि तसं..' असं म्हणत जाधवांनी भातखळकरांच्या बोलण्याच्या शैलीवर निशाणा साधला.

यावेळी तालिका अध्यक्ष असलेल्या समाधान आवताडे यांनी मध्यस्थी करत आदित्य ठाकरेंना शांत राहण्याची विनंती केली.

ज्यानंतर पुन्हा एकदा भास्कर जाधव बोलू लागले. पण यावेळी भास्कर जाधवांनी आक्रमक पवित्रा घेत भातखळकरांना खडे बोल सुनावले.. ते म्हणाले, 'यांचं बोलणं (अतुल भातखळकर) अहंकारी आणि सगळं काही सर्वज्ञ मी आहे वैगरे.. अनेक वेळा बघितलंय या माणसाचं मी.. मी म्हणजेच सर्वज्ञ.. पण तुमच्या मर्यादा लोकांना माहितीए.. तुमचं ज्ञान लोकांना माहिती आहेत. तुमची कुवत, तुमची झेप लोकांना माहिती आहे. सगळं माहितीए.. काही नवीन नाही त्यात.'

'त्यामुळे तुमचं ते.. मला सगळं कळतं बाकी कोणाला कळत नाही अशी जी वागण्याची स्टाइल आहे ना.. अरे राज ठाकरेंनी सांगितलं होतं काय केलं होतंस ते.. राज ठाकरेंनी सांगितलं होतं की, त्यांच्याकडे गेला होता आणि राज ठाकरेंनी नितीन गडकरींना फोन केला होता.. राज ठाकरेंनी हे मुलाखतीत सांगितलं होतं. कोणाला निष्ठा सांगताय तुम्ही? अरे तुम्हाला कोणी घेतलं नाही पक्षात.. मला काय शिकवता तुम्ही?' 

'राज ठाकरेंनी नावानिशी सांगितलं होतं तुमचं.. तुम्ही राज ठाकरेंकडे गेला होतात. काय पक्षाबिक्षाचं काढायचं नाही?' असं म्हणत भास्कर जाधवांनी भातखळकरांचा खरपूस समाचार घेतला.