पवार स्वत: शिंदेंच्या दालनात गेले.. याचा अर्थ दिसतो तेवढा सरळ-सोप्पा नाही! भेटीमागची भन्नाट Inside Story

ऋत्विक भालेकर

• 07:37 PM • 08 Jul 2026

Sharad Pawar and Eknath Shinde Meeting: राजकारणात अनेकदा शब्दांपेक्षा भेटी अधिक बोलक्या ठरतात. शरद पवार आणि एकनाथ शिंदेंची विधानभवनातील 15 मिनिटांची भेट देखील अशाच स्वरुपाची आहे. वाचा या भेटी मागची Inside Story

sharad pawar himself visited eknath shinde office  significance of this meeting is not as straightforward as it appears discover fascinating inside story behind this meeting

शरद पवारांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट

Google CTA

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात अनेकदा एखादी भेट, एखादं हस्तांदोलन किंवा काही मिनिटांची चर्चा ही पुढील अनेक महिन्यांच्या राजकीय घडामोडींची दिशा ठरवत असते. त्यामुळेच विधानभवनात मंगळवारी (8 जुलै) घडलेली एक घटना सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा प्रमुख विषय ठरली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी स्वतः पुढाकार घेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या दालनात जाऊन त्यांची भेट घेतली. विशेष म्हणजे, त्या वेळी शिंदे मंत्रिमंडळाच्या बैठकीत व्यस्त होते. मात्र, पवार स्वतः दालनात आल्याची माहिती मिळताच शिंदेंनी कॅबिनेट बैठक काही काळासाठी सोडून तातडीने आपल्या दालनात येत त्यांची भेट घेतली.

हे वाचलं का?

ही घटना वरकरणी शिष्टाचार भेट वाटत असली, तरी महाराष्ट्रातील सध्याची राजकीय परिस्थिती पाहता तिचे अनेक राजकीय अर्थ लावले जात आहेत.

महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीनंतर पवार थेट शिंदेंच्या दालनात

शरद पवार हे विधानभवनात आयोजित केलेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीसाठी आले होते. पण बैठक संपल्यानंतर त्यांनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनाकडे आपला मोर्चा वळवला. त्यांच्यासोबत पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि आमदार जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड तसेच शशिकांत शिंदे हेही उपस्थित होते. दरम्यान, पवारांनी स्वतः एकनाथ शिंदेंच्या दालनात जाण्याचा निर्णय घेतल्यामुळे या भेटीचं महत्त्व अधिक वाढलं आहे.

शिंदेंनी कॅबिनेट बैठक सोडली, पवारांचा केला मानसन्मान

जेव्हा पवार दालनाकडे गेले असल्याच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना समजलं तेव्हा ते मंत्रिमंडळाच्या बैठकीत होते. अखेर ही बाब समजताच शिंदे कॅबिनेट बैठकीतून काही काळासाठी बाहेर पडले आणि त्यांनी पवारांची भेट घेतली.

हे ही वाचा >> "रिअ‍ॅलिटी त्यांनाही माहितीये अन् मलाही..", शिंदेंच्या मुख्यमंत्री बनण्याच्या महत्त्वाकांक्षेवर फडणवीस स्पष्टच बोलले

राजकीय मतभेद असले तरी राज्यातील ज्येष्ठ नेते म्हणून पवारांचा सन्मान राखत शिंदेंनी त्यांच्याशी जवळपास 15 मिनिटे चर्चा केली. त्यानंतर ते पुन्हा मंत्रिमंडळाच्या बैठकीत सहभागी झाले. विशेष म्हणजे, शिंदे बैठकीला परतल्यानंतरही काही वेळ शरद पवार यांनी त्याच दालनात आपल्या पक्षाच्या आमदारांशी चर्चा केली आणि त्यानंतरच ते विधानभवनातून बाहेर पडले.

भेटीमागे नेमकं राजकीय गणित काय?

राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडी पाहता या भेटीकडे केवळ शिष्टाचार म्हणून पाहणं कठीण आहे.

काही दिवसांपूर्वीच एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना UBT पक्षाचे 6 खासदार हे शिवसेना शिंदे गटात दाखल झाले. या घडामोडीनंतर राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना सुरुवात झाली होती की, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षातील काही खासदारांवरही शिंदे गटाची नजर आहे. याच पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी स्वतः शिंदेंच्या दालनात जाऊन त्यांची भेट घेणे ही साधी घटना मानली जात नाही.

पवारांचा 'मेसेज पॉलिटिक्स'चा डाव?

शरद पवार हे भारतीय राजकारणातील अत्यंत अनुभवी आणि दूरदृष्टीचे नेते मानले जातात. अनेक दशकांच्या राजकीय कारकिर्दीत त्यांनी वेळोवेळी अनपेक्षित निर्णय घेत विरोधकांसह स्वतःच्या सहकाऱ्यांनाही आश्चर्याचा धक्का दिला आहे.

त्यामुळे शिंदेंनी कोणतीही पुढची राजकीय हालचाल करण्यापूर्वीच पवारांनी स्वतः भेट घेऊन अनेक स्तरांवर संदेश दिला असावा, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

हे ही वाचा >> 2 खासदारांना भाजपमध्ये यायचं होतं, पण फडणवीसांनी रोखलं, CM साहेबांनीच सांगितली सगळी Inside स्टोरी!

हा संदेश फक्त एकनाथ शिंदेंनाच नव्हे, तर स्वतःच्या पक्षातील खासदार आणि आमदारांनाही असू शकतो, अशीही चर्चा रंगली आहे. पक्षातील नेतृत्व सक्रिय असून प्रत्येक घडामोडीवर स्वतः लक्ष ठेवून आहे, हा विश्वास कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधींमध्ये निर्माण करण्याचाही हा प्रयत्न असू शकतो.

पवार-शिंदे भेटीतून CM देवेंद्र फडणवीसांनाही अप्रत्यक्ष संदेश?

शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीचा आणखी एक राजकीय अर्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संदर्भातही काढला जात आहे. राज्यात महायुती सरकारचं नेतृत्व फडणवीसांकडे असलं, तरी शिवसेना आणि भाजप यांच्यातील राजकीय समन्वयावर कायम चर्चा होत असते. अशा परिस्थितीत शरद पवार यांनी थेट मुख्यमंत्री नव्हे, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनात जाऊन भेट घेणं हे अनेकांच्या नजरेत भरलं.

राजकीय जाणकारांच्या मते, या भेटीतून पवारांनी आपण राज्यातील प्रत्येक महत्त्वाच्या सत्ताकेंद्राशी संवाद ठेवू शकतो, हा संदेश दिला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवार हे संवादाची दारं कधीच पूर्णपणे बंद करत नाहीत, अशी त्यांची प्रतिमा राहिली आहे. त्यामुळे सत्ताधारी आघाडीतील सर्व प्रमुख नेत्यांशी संवाद ठेवण्याची त्यांची ही शैली असल्याचंही मानलं जातं.

दुसरीकडे, काही विश्लेषकांच्या मते, मुख्यमंत्री फडणवीस हे महायुतीचे प्रमुख रणनीतीकार मानले जातात. अशा वेळी शिंदेंशी झालेली ही भेट फक्त शिष्टाचारापुरती नव्हती, तर महायुतीतील सर्व घटकांना आपण अजूनही महाराष्ट्राच्या राजकारणातील प्रभावी खेळाडू आहोत, याची अप्रत्यक्ष जाणीव करून देण्याचाही प्रयत्न असू शकतो.

याशिवाय, अलीकडच्या काळात महाराष्ट्रातील राजकीय समीकरणं वेगाने बदलताना दिसत आहेत. अशा वेळी कोणत्याही संभाव्य राजकीय हालचालीपूर्वी संवादाची दारं खुली ठेवणं, हा शरद पवार यांच्या राजकारणाचा जुना स्वभाव राहिला आहे. त्यामुळे या भेटीकडे त्याच दृष्टिकोनातून पाहणारेही अनेक राजकीय निरीक्षक आहेत.

मात्र, या सर्व चर्चा राजकीय विश्लेषणाच्या पातळीवर आहेत. शरद पवार किंवा एकनाथ शिंदे यांनी या भेटीमागील कोणताही राजकीय उद्देश अधिकृतरीत्या स्पष्ट केलेला नाही. त्यामुळे या भेटीचा नेमका अर्थ काय होता, हे भविष्यातील राजकीय घडामोडींवरूनच स्पष्ट होऊ शकेल.

पवारांची राजकीय शैली पुन्हा चर्चेत

शरद पवार यांच्या राजकीय शैलीचं एक वैशिष्ट्य म्हणजे ते अनेकदा प्रत्यक्ष कृतीतून संदेश देतात. सार्वजनिक वक्तव्यांपेक्षा योग्य वेळी योग्य व्यक्तीची घेतलेली भेट अधिक प्रभावी ठरते, असा त्यांचा राजकीय अनुभव राहिला आहे.

त्यामुळेच विधानभवनातील ही 15 मिनिटांची भेट चर्चेचा विषय ठरली आहे. भेटीत नेमकी कोणती चर्चा झाली, कोणते विषय मांडले गेले किंवा भविष्यातील राजकीय घडामोडींवर काही चर्चा झाली का, याबाबत दोन्ही बाजूंनी कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. त्यामुळे या भेटीभोवतीचं गूढ आणखी वाढलं आहे.