मुंबई: दोन दिवसांपूर्वी मुंबई-पुणे मिसिंग लिंक (कनेक्टिंग लिंक) परिसरात दरड कोसळल्यामुळे अनेक तास वाहतूक विस्कळीत झाली होती. या घटनेनंतर विरोधकांनी महायुती सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. मात्र, आज (8 जुलै) विधानसभेत राज्यातील पावसाची परिस्थिती आणि मिसिंग लिंकबाबत निवेदन करताना मुख्यमंत्री फडणवीसांनी विरोधकांना अत्यंत आक्रमक शब्दांत प्रत्युत्तर दिले.
ADVERTISEMENT
विधानसभेत मुख्यमंत्र्यांचा संताप...
'काही लोकं तर असे आहेत की, एखाद कोटी खोटारडे लोकं मेल्यानंतर ते पैदा झाले असतील आणि त्यांना खोटं बोलायलाही लाज वाटत नाही. कनेक्टिंग लिंक सुरू झाल्यानंतरही दुसऱ्या दिवशी टीव्हीवर येऊन खोटं बोलतात. एखाद कोटी.. जयंतराव तुम्ही हसू नका.. मी तुम्हाला नक्की सांगतो, आपल्याकडे काही हे नाहीए.. पण कोटी खोटारडे मेल्याशिवाय हे पैदाच नाही होऊ शकत.'
अशा शब्दांत मुख्यमंत्री फडणवीसांनी विरोधकांवर हल्लाबोल केला.
'खोटारडेपणा पूर्णपणे उघड झाला'
फडणवीस म्हणाले की, मिसिंग लिंकच्या घटनेनंतर वास्तव समोर आले असून विरोधकांचा खोटारडेपणा उघड झाला आहे. "महायुती सरकारमध्ये हिंमत होती म्हणून आम्ही हा प्रकल्प पूर्ण करून दाखवला," असे ते म्हणाले.
कोकण रेल्वेचे उदाहरण देत विरोधकांना सुनावले
मिसिंग लिंक प्रकल्पाचे समर्थन करताना मुख्यमंत्र्यांनी कोकण रेल्वेचा संदर्भ दिला. 'कोकण रेल्वे उभारतानाही दरड कोसळण्याचे कारण पुढे करून विरोध झाला होता. मात्र, तत्कालीन रेल्वे मंत्री मधु दंडवते यांनी धाडस दाखवत हा प्रकल्प पूर्ण केला. सुरुवातीच्या काही वर्षांत दरडी कोसळल्या, पण प्रत्येक वेळी त्यातून धडा घेत सुधारणा करण्यात आल्या आणि अखेर समस्या मोठ्या प्रमाणात नियंत्रणात आली', असे त्यांनी सांगितले.
"आज विचार करा, त्या भीतीपोटी कोकण रेल्वेच बांधली नसती तर काय परिस्थिती झाली असती?" असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
हे ही वाचा>> राज्यात अचानक पाऊस का वाढलाय? पुढील तीन दिवस काय इशारा?
पण लक्षात ठेवा.. फिरते है शेरे सवार मैदान-ए-जंग में.. वो तिफ्ल क्या गिरे जो घुटनो के बल चले.. असा शेरही मुख्यमंत्र्यांनी यावेळी विधानसभेत ऐकवला.
'आघाडी सरकारने फाइलच बंद केली होती'
मुख्यमंत्र्यांनी दावा केला की, 'मिसिंग लिंकचा प्रस्ताव तत्कालीन आघाडी सरकारच्या काळात तयार झाला होता. मात्र, त्यावेळच्या मुख्यमंत्र्यांनी दोन पानी नोंद करून तब्बल 14 कारणे देत हा प्रकल्प अशक्य असल्याचे सांगून फाइल बंद केली होती.'
"आम्ही अधिकाऱ्यांशी आणि तज्ज्ञांशी चर्चा केली. त्यांनी हा प्रकल्प शक्य असल्याचे सांगितले आणि आम्ही तो करून दाखवला," असे फडणवीस म्हणाले.
'ही केवळ लिंक नाही, इंजिनिअरिंगचं मार्वल'
मिसिंग लिंकचे वर्णन करताना फडणवीस म्हणाले की, 'हा केवळ रस्ता नसून अभियांत्रिकी क्षेत्रातील एक अद्भुत नमुना आहे.'
त्यांच्या मते, या प्रकल्पामध्ये जगातील सर्वात रुंद बोगद्यांपैकी एक, भारतातील सर्वात उंच केबल-स्टेड वायाडक्ट आणि अतिशय कठीण भौगोलिक परिस्थितीत उभारण्यात आलेली अत्याधुनिक संरचना आहे.
हे ही वाचा>> Monsoon Update : 20 वर्षांचा विक्रम मोडला, अतिमुसळधार पाऊस, डेटाच सांगतोय!
'दरड पडली, पण प्रकल्प सुरक्षित राहिला'
दरड कोसळल्याच्या घटनेबाबत स्पष्टीकरण देताना मुख्यमंत्री म्हणाले की, 'वरून आलेली दरड पाण्याच्या कमानीवर पडली. त्यामुळे कमानीचा काही भाग तुटून ढिगारा तयार झाला. मात्र, केबल-स्टेड ब्रिज किंवा बोगद्याला कोणतेही नुकसान झाले नाही.'
'उलट, बोगद्यातील आपत्कालीन व्यवस्थेचे नागरिकांनी कौतुक केले. इमर्जन्सी बटण दाबल्यानंतर अवघ्या तीन मिनिटांत क्रेन घटनास्थळी पोहोचली. अनेकांनी बोगदा असल्यामुळे आपला जीव वाचल्याचेही सांगितले', असे त्यांनी नमूद केले.
'7000 कोटी पाण्यात गेले' असा अपप्रचार केला
मुख्यमंत्र्यांनी आरोप केला की, 'काही जणांनी प्रकल्पच कोसळल्याचा भास निर्माण करण्यासाठी दिशाभूल करणारे व्हिडिओ आणि दृश्ये सोशल मीडियावर प्रसारित केली. जसं काही कनेक्टिंग लिंकच तुटली. काही लोकं यांना तोंडफुडी आहे.. आमचा विदर्भातील शब्द आहे.'
'जणू काही 7000 कोटी रुपये पाण्यात गेले, असा अपप्रचार करण्यात आला. पण केवळ 18 तासांत वाहतूक पुन्हा सुरू झाली. तेही यांच्या थोबाडावर टिच्चून.. हेच त्या टीकाकारांच्या आरोपांना उत्तर आहे," असे ते म्हणाले.
'मी शिव्याप्रूफ आहे, पण महाराष्ट्राला बदनाम करू नका'
विरोधकांच्या टीकेवर भाष्य करताना फडणवीस म्हणाले, 'अरे देवेंद्र फडणवीसला शिव्या द्या.. त्याला सवय आहे. शिव्याप्रूफ आहे मी.. कारण जीवनात एकच गोष्ट शिकलो.. आजपासून 10 वर्षाने हे शिव्या देणारे दिसणार नाहीत. पण ती कनेक्टिंग लिंक असेल आणि तिथे देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेचं नाव असेल.'
'भाड्याचे तट्टू महाराष्ट्राचा अपमान करत असतील तर सोडणार नाही'
सोशल मीडियावरील काही जणांवरही मुख्यमंत्र्यांनी गंभीर आरोप केले. पैसे घेऊन महाराष्ट्राची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न होत असल्याचा दावा करत त्यांनी अशा लोकांवर कठोर कारवाईचा इशारा दिला.
"काही भाड्याचे तट्टू पैसे घेऊन मिसिंग लिंकबाबत खोटं लिहित होते. मला बदनाम करा, पण महाराष्ट्राचा अपमान करणार असाल तर सोडणार नाही," असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिला.
ADVERTISEMENT












