"देहविक्रीला हे तयारच असतील तर", सचिन अहिरांवर प्रश्न विचारताच राज ठाकरेंची तीव्र प्रतिक्रिया

Raj Thackeray on Sachin Ahir : सचिन अहिर यांच्या पक्षांतरावर राज ठाकरे यांची तीव्र प्रतिक्रिया. "प्रश्न विकत घेणाऱ्यांचा नाही, विकले जाणाऱ्यांचा आहे," म्हणत सध्याच्या राजकारणावरही साधला निशाणा.

Raj Thackeray on Sachin Ahir

Raj Thackeray on Sachin Ahir

मुंबई तक

02 Jul 2026 (अपडेटेड: 02 Jul 2026, 02:27 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

"देहविक्रीला हे तयारच असतील तर.."

point

सचिन अहिरांवर प्रश्न विचारताच राज ठाकरेंची तीव्र प्रतिक्रिया

Raj Thackeray on Sachin Ahir, मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आमदार सचिन अहिर यांच्या पक्षांतरावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केलीये. विधानपरिषदेचे आमदार सचिन अहिर यांनी ठाकरेंच्या शिवसेनेची साथ सोडून शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर त्यांनी सध्याच्या राजकारणावरही कठोर शब्दांत टीका केली. "प्रश्न विकत घेणाऱ्यांचा नाहीये. विकले जाणाऱ्यांचा आहे. देहविक्रीला हे तयारच असतील तर गिऱ्हाईक आहेतच.", असं पक्षांतराच्या प्रश्नावर बोलताना राज ठाकरे म्हणाले. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. 

हे वाचलं का?

हेही वाचा : "रिअ‍ॅलिटी त्यांनाही माहितीये अन् मलाही..", शिंदेंच्या मुख्यमंत्री बनण्याच्या महत्त्वाकांक्षेवर फडणवीस स्पष्टच बोलले

'अशा प्रकारच्या राजकारणामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये संताप'

यावेळी पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले की, मुळात हे कुठल्या प्रकारचं राजकारण सुरू आहे? असा सवाल करत अशा प्रकारच्या राजकारणामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये संताप असल्याचंही त्यांनी सांगितलं. लोकं उन्हा-तान्हात उभे राहून मतदान करतात, मात्र त्यानंतर अशा प्रकारच्या पक्षांतराच्या घटना घडत असल्यामुळे जनतेमध्ये नाराजी वाढत असल्याचं त्यांनी नमूद केलं. सध्याच्या राजकीय घडामोडींकडे पाहता हा प्रकार लोकशाहीसाठी योग्य नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

हेही वाचा : 'दिल्लीने स्पष्ट सांगितलंय छोट्या मोठ्या गोष्टी महाराष्ट्रातच..', शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत फडणवीसांचं मोठं वक्तव्य

'भाजप म्हणजे पत्त्यांचा उलटा बंगला, तो पत्ता सटकला तर सगळं कोसळेल'

राज ठाकरे यांनी यावेळी भारतीय जनता पक्षावरही निशाणा साधला. ते म्हणाले की, भाजप म्हणजे पत्त्यांचा उलटा बंगला आहे. या बंगल्यातील सर्वात खालचा पत्ता नरेंद्र मोदी आहे. तो एकदा सटकला की सगळं कोसळेल ." तसेच सध्या सुरू असलेल्या फोडा-फोडीमध्ये अमित शाह यांचं राजकारण असल्याचा आरोपही त्यांनी केला. यापूर्वीही आपण आपल्या भाषणात शिवसेनेचे सहा खासदार भाजपमध्ये का गेले नाहीत आणि तृणमूल काँग्रेसचे 22 खासदार वेगळा गट करून का गेले नाहीत? असा प्रश्न उपस्थित केला होता, याचीही त्यांनी आठवण करून दिली. 

याचवेळी राज ठाकरे यांनी विरोधक संपवण्याच्या राजकारणावरही भाष्य केलं. "ज्यावेळी तुम्ही समोरचे विरोधक संपवता, त्यावेळी विरोधक तुमच्यातच तयार होतात," असं ते म्हणाले. महाराष्ट्रासह देशभरात हे चित्र पुढील काळात अधिक स्पष्टपणे दिसेल, असा दावा त्यांनी केला. "बेधुंद सत्ता ज्यावेळी येते, त्यावेळी माणसं अशी वागायला लागतात," असं म्हणत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली. सचिन अहिर यांच्या पक्षांतराच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी केलेल्या या वक्तव्याची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.