'जेव्हा प्रेमाची गरज होती, तेव्हा प्रेमभंग केला..' मुंबई Tak बैठकीत CM फडणवीसांचे ठाकरेंना टोल्यांवर टोले!

मुंबई Tak बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्या 'ऑपरेशन फडणवीस' आरोपाला सडेतोड उत्तर दिलं. 2019 च्या सत्तासंघर्षाचा संदर्भ देत 'प्रेमभंग' आणि 'दुसरं लग्न' अशी मिश्किल उपमा देत त्यांनी ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला.

mumbai tak baithak suffered heartbreak in 2019 now remarried too cm fadnavis takes a playful dig at uddhav thackeray also responds to operation fadnavis

मुंबई Tak बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई तक

• 09:47 PM • 01 Jul 2026

follow google news

मुंबई: ठाकरे गटातील सहा खासदारांच्या पक्षांतर हे ऑपरेशन टायगर नसून ते मुख्यमंत्री फडणवीसांची दिल्लीची वाट अडविण्यासाठी सुरू असलेलं 'ऑपरेशन फडणवीस' असल्याचा दावा उद्धव ठाकरे यांनी केला होता. याचबाबत 'मुंबई Tak बैठक' कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर मिश्किल शैलीत निशाणा साधत 2019 च्या राजकीय घडामोडींची आठवण करून दिली.

हे वाचलं का?

प्रश्नाला उत्तर देताना फडणवीस म्हणाले, "माझं पण मनोरंजन झालं... मी ते ऐकलं. समजा माझा मित्रपक्ष एखादं ऑपरेशन करत असेल, तर मी ते का म्हणून थांबवेन? आणि आमच्यात असं काय प्रेम उरलंय की, जे माझ्यासोबत दिवसरात्र उभे आहेत त्यांना थांबवून, ज्यांनी योग्य वेळी मला साथ देण्याची गरज असताना साथ सोडली, त्यांच्या पाठिशी मी का जावं? काहीच कारण नाही. पॉलिटिकल सर्व्हायव्हलचा विषय त्यांच्यासाठी आहे, माझ्यासाठी नाही."

'137 आमदारांचा मुख्यमंत्री आमच्याच पक्षाचा'

यावेळी फडणवीसांनी महायुतीतील समन्वयावरही भाष्य केलं. ते म्हणाले,

"137 आमदार ज्यांच्या पक्षाचे आहेत, त्याच पक्षाचा मुख्यमंत्री राहणार आहे. त्यामुळे सत्य काय आहे, हे मला आणि शिंदे साहेबांना माहिती आहे. कोणी कितीही कहाण्या तयार केल्या तरी त्याने काही फरक पडत नाही. आमच्या दोघांमध्ये योग्य संवाद आहे."

या वक्तव्यातून महायुतीत कोणताही मतभेद नसल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न फडणवीसांनी केला.

हे ही वाचा>> Mumbai Tak Baithak : 'एकही दिवस सरकारला झोपू दिलं नाही', फडणवीसांनी सांगितलं भाजप न फुटण्याचं टॉप सीक्रेट!

हिंदी गाण्याचा उल्लेख करत साधला टोला

उद्धव ठाकरे यांनी आपल्याकडून मदतीची अपेक्षा व्यक्त केल्याच्या चर्चेवर बोलताना फडणवीसांनी हिंदी चित्रपटातील एका गाण्याची ओळ उद्धृत केली.

'हिंदीमध्ये एक गाणं आहे... 'माना की तेरे जहाँ में ये नहीं कि प्यार नहीं मिलता... वो जब चाहिए तब नहीं मिलता...'

यानंतर त्यांनी थेट 2019 च्या सत्तासंघर्षाचा संदर्भ देत ठाकरेंना लगावला टोला

'2019 मध्ये प्रेमभंग झाला, आता दुसरं लग्नही झालं'

"हे सगळं प्रेम मला 2019 मध्ये हवं होतं. तेव्हा प्रेमभंग झाला. आता पुन्हा प्रेम जुळणं कठीण आहे. प्रेमभंगानंतर आम्ही दुसरं लग्नही केलं, संसार थाटला... त्या लग्नाचे वाढदिवसही झाले. आता काय राहिलं?"

या विधानानंतर सभागृहात एकच हशा पिकला. फडणवीसांनी राजकीय समीकरणांची तुलना प्रेमभंग आणि दुसऱ्या लग्नाशी करत उद्धव ठाकरे यांच्यावर मिश्किल पण अत्यंत मार्मिक शैलीत निशाणा साधला.

हे ही वाचा>> 2 खासदारांना भाजपमध्ये यायचं होतं, पण फडणवीसांनी रोखलं, CM साहेबांनीच सांगितली सगळी Inside स्टोरी!

'ऑपरेशन फडणवीस'च्या आरोपाला स्पष्ट नकार

उद्धव ठाकरे यांनी सहा खासदारांच्या पक्षांतरामागे 'ऑपरेशन फडणवीस' असल्याचा दावा केला होता. मात्र, फडणवीसांनी या आरोपाला थेट उत्तर देताना आपण कोणालाही थांबवण्याचा प्रश्नच येत नसल्याचं स्पष्ट केलं. मित्रपक्षाच्या राजकीय निर्णयात हस्तक्षेप करण्याचं कोणतंही कारण नसल्याचं त्यांनी सांगितलं.

राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

फडणवीसांच्या या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आलं आहे. विशेषतः 2019 मधील भाजप-शिवसेना युती तुटल्याचा संदर्भ देत त्यांनी केलेल्या 'प्रेमभंग' आणि 'दुसऱ्या लग्ना'च्या उपमेची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. त्याचबरोबर महायुतीतील समन्वय आणि उद्धव ठाकरे यांच्याशी आता कोणताही राजकीय पुनर्मिलाफ होण्याची शक्यता नसल्याचाही स्पष्ट संदेश फडणवीसांनी आपल्या वक्तव्यातून दिला.