'देवेंद्र फडणवीसांनीच 2034 पर्यंत मुख्यमंत्री राहावं..', महसूल मंत्री बावनकुळेंच्या 'या' वक्तव्याचा नेमका काय अर्थ

मुंबई तक

• 10:02 PM • 11 Jul 2026

Maharashtra Politics: देवेंद्र फडणवीस यांनीच 20234 पर्यंत मुख्यमंत्री राहावं, विकसित महाराष्ट्राची हीच गरज आहे. मुख्यमंत्री होण्याची कुणीही घाई करू नये. असं ट्विट चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे. त्यामुळे आता त्यांच्या या ट्विटचे वेगवेगळे अर्थ काढले जात आहे.

devendra fadnavis should remain chief minister until 2034 chandrashekhar bawankules categorical statement political speculation intensifies following sanjay rauts claim

चंद्रशेखर बावनकुळे यांचं मोठं विधान

Google CTA

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भवितव्याबाबत पुन्हा एकदा चर्चांना वेग आला आहे. गेल्या काही दिवसांपासून देवेंद्र फडणवीस यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळू शकतं, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. शिवसेना UBT पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही यासंदर्भात अनेकदा दावे केले आहेत. त्यातच खासदार संजय राऊत यांनीही शनिवारी (11 जुलै) याच मुद्द्यावर भाष्य करत फडणवीसांनंतर मुख्यमंत्रिपदासाठी भाजप नेते आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं नाव पुढे येऊ शकतं, असा दावा केला.

हे वाचलं का?

मात्र, या सर्व चर्चांवर चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर पोस्ट करत स्पष्ट भूमिका मांडली आहे. त्यांनी या सर्व चर्चा 'अफवा' आणि 'बिनबुडाचे आकलन' असल्याचं म्हटलं असून, देवेंद्र फडणवीस यांनीच 2034 पर्यंत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहावं, अशी भावना व्यक्त केली आहे.

चंद्रशेखर बावनकुळे यांनी नेमकं काय म्हटलं?

"सध्या अफवांचा बाजार गरम आहे. यातीलच अफवा आज पेरली गेली. त्याला बिनबुडाचे आकलन म्हणावे लागेल. सूर्यप्रकाशाइतके एक सत्य आहे. महाराष्ट्राचे इन्फ्रामॅन मा. श्री. देवेंद्र फडणवीसजीच 2034 पर्यंत मुख्यमंत्री राहावेत, ही महाराष्ट्रातील 14 कोटी जनतेची भावना आहे. विकसित महाराष्ट्राची हीच गरज आहे. मुख्यमंत्री होण्याची कुणीही घाई करू नये."

या पोस्टमधून बावनकुळे यांनी फडणवीस यांच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास व्यक्त करत मुख्यमंत्री बदलाच्या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे.

हे ही वाचा>> मोदींचे 'Blue Eyed Boy' असलेल्या देवेंद्र फडणवीसांना महाराष्ट्रातून दिल्लीत नेणं इतकं सोपं आहे का?

संजय राऊतांनी काय दावा केला होता?

संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात पाठवण्याची चर्चा सुरू असल्याचा दावा केला. तसेच, फडणवीसांनंतर मुख्यमंत्रिपदासाठी चंद्रशेखर बावनकुळे यांचं नाव पुढे येऊ शकतं, असं त्यांनी म्हटलं.

राऊत यांच्या मते, बावनकुळे हे सर्वसमावेशक नेतृत्व असलेले नेते असून विविध पक्षांतील नेत्यांशी त्यांचे चांगले संबंध आहेत. त्यांनी असा दावाही केला की, मुख्यमंत्रिपदासाठी बावनकुळे यांच्या नावाला स्वतः देवेंद्र फडणवीस यांचाही पाठिंबा असू शकतो. त्याचवेळी त्यांनी गिरीश महाजन यांच्या संदर्भातही टीका केली.

मात्र, या सर्व बाबी या संजय राऊत यांनी केलेले राजकीय दावे असून त्याला भाजपकडून कोणतीही अधिकृत पुष्टी देण्यात आलेली नाही.

फडणवीसांना केंद्रात नेण्याच्या चर्चेचं कारण काय?

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा सुरू झाल्या की देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची चर्चा वारंवार होते. यामागे त्यांचा प्रशासनातील अनुभव, निवडणूक व्यवस्थापनातील भूमिका आणि केंद्रीय नेतृत्वाशी असलेला समन्वय ही कारणं सांगितली जातात. सध्या फडणवीस यांना केंद्रीय मंत्रिमंडळात घेतलं जाणार असल्याची कोणतीही अधिकृत घोषणा किंवा पुष्टी झालेली नाही.

हे ही वाचा>> "अशाने मोठ्या नेत्यांची विश्वासार्हता कमी होते...", संजय राऊत पवारांवर भडकले

मात्र, राजकीय वर्तुळात अशीही चर्चा आहे की, फडणवीसांना केंद्रीय मंत्रिमंडळात घेऊन भाजपचं नेतृत्व विशेषत: अमित शाह हे एकाच दगडात अनेक पक्षी मारण्याचा प्रयत्न करू शकतात. त्यामुळे तूर्तास फडणवीसांबाबत सगळ्या चर्चा असल्या तरी राजकारण्याचा दृष्टीने त्यात अजिबातच तथ्य नाही असं म्हणता येणार नाही. मात्र, या गोष्टी नेमक्या कधी आणि कशा पद्धतीने आकार घेणार यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत.

दुसरीकडे, चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पोस्टकडे भाजपकडून आलेला स्पष्ट राजकीय संदेश म्हणून पाहिलं जाऊ शकतं. या पोस्टमधून त्यांनी तीन महत्त्वाच्या गोष्टी अधोरेखित केल्या आहेत.

  • मुख्यमंत्री बदलाबाबत सुरू असलेल्या चर्चा अफवा असल्याचा दावा.
  • देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास.
  • 2034 पर्यंत फडणवीस यांनीच मुख्यमंत्री राहावं, अशी भूमिका.

राजकीय चर्चांना आणखी उधाण

बावनकुळे यांच्या पोस्टनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे. विरोधकांकडून करण्यात आलेल्या दाव्यांना भाजपने थेट उत्तर दिल्याचं मानलं जात आहे. दरम्यान, मुख्यमंत्री बदल, केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार किंवा महाराष्ट्रातील नेतृत्वात कोणताही बदल यासंदर्भात भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.