मुंबई: राज्यातील फडणवीस सरकारने त्रिभाषा सूत्र लागू करण्याचा जीआर मागे घेतल्यानंतर शिवसेना UBT आणि मनसे म्हणजेच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र येत मुंबईत विजयी मेळावा घेतला होता. दरम्यान, त्या क्षणापासून उद्धव ठाकरे हे सातत्याने अनेक ठिकाणी उल्लेख करत आहेत. की, राज ठाकरे हे आता आमच्यासोबत आले आहेत. तर दुसरीकडे राज ठाकरे हे याबाबत असा कोणताही उल्लेख उघडपणे करताना दिसत नाहीत. त्यामुळे ठाकरेंमध्ये युती होणार की नाही हा संभ्रम कायम आहे.
ADVERTISEMENT
दरम्यान, असं असताना आज (19 जुलै) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची एक विशेष मुलाखत आज प्रसिद्ध झाली. जी खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी घेतली. या मुलाखतीत उद्धव ठाकरेंनी भाजप, एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली.
हे ही वाचा>> 'आम्ही मिटवून टाकली भांडणं, आलो ना दोघं भाऊ एकत्र...' उद्धव ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं, पण...
मात्र, याच मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा उल्लेख केला की, राज ठाकरे हे आता सोबत आले आहेत. एकीकडे उद्धव ठाकरे हे सातत्याने असं म्हणत असले तरी दुसरीकडे मनसेच्या अनेक नेत्यांचं म्हणणं आहे की, केवळ मराठीच्या मुद्द्यावर आपण एकत्र आहोत. निवडणुकीच्या युतीबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.
यामुळे आता उद्धव ठाकरे हे ज्या पद्धतीने सातत्याने राज ठाकरे सोबत आले असल्याचं म्हणत आहेत त्यामागे नेमकं कोणत्या पद्धतीचं राजकारण आहे याविषयी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
संजय राऊतांना दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले?
'ठाकरे हे वारे नाहीत.. आमची पाळंमुळं ही कित्येक पिढ्यांपासून महाराष्ट्राच्या मातीत रुजलेली आहेत, खोलवर गेली आहेत. अगदी जास्त पिढ्यांचा उल्लेख नाही केला तरी आमच्या आजोबापासून, त्यानंतर शिवसेनाप्रमुख.. नंतर मी आहे, आदित्य आहे. आता सोबत राज आलेला आहे.'
'सदासर्वदा ठाकरे म्हणजे एक संघर्ष. हा संघर्ष मतलबी वाऱ्यांसाठी नाही.. तर समाजाच्या हितासाठी आम्ही करत आलो. त्यामुळे आम्ही सत्तेत किती काळ राहिलो यापेक्षा सत्तेच्या विरोधात.. सत्तेच्या विरोधात म्हणण्यापेक्षा.. जे काही अनिष्ट आहे त्याच्या विरोधात आम्ही संघर्ष करत आलो.'
हे ही वाचा>> Bala Nandgaonkar Mumbai Tak Baithak 2025: राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार? बाळा नांदगावकरांची Exclusive मुलाखत
'म्हणूनच.. हा काही ठाकरे ब्रँड म्हणा.. हा काही आम्ही नाही बनवला. हा लोकांनी स्वीकारलेला आहे. कारण त्यांना माहिती आहे की, ठाकरे हे प्रामाणिक आहेत, स्वार्थी नाहीत. आपल्यासाठी लढणारे आहेत. आपल्या व्यथा, वेदना आहेत त्याला वाचा फोडणारे आहेत. म्हणून महाराष्ट्रातील जनता इतकी वर्ष ही आमच्यासोबत राहिली आहे.'
'ठाकरे हा फक्त ब्रँड नाही.. तर तो महाराष्ट्राची, मराठी माणसाची आणि हिंदू अस्मितेची ओळख आहे. ही ओळख पुसून टाकण्याचा ज्या कोणी प्रयत्न केला ते पुसले गेले.'
'आज तर माझ्याकडे काहीच नाही.. तरी लोकं माझ्याकडे येतात, बोलतात. जे घडतंय त्याबाबत संताप व्यक्त करतात, हळहळ व्यक्त करतात. तसंच काही झालं तरी आम्ही तुमच्यासोबत आहोत असंही सांगतात.' असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
ADVERTISEMENT
