मृत व्यक्तीला जिवंत दाखवून माजी नगरसेवकाने भूखंड ढापला, नुकताच शेकाप सोडून भाजपमध्ये केला होता प्रवेश

Panvel News : विशेष म्हणजे, सुनील बहिरा यांनी अलीकडेच शेकापचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर काही दिवसातच त्यांचे नाव या मोठ्या जमीन गैरव्यवहारात समोर आल्यामुळे राजकीय वर्तुळातही चर्चेला उधाण आले आहे.

Panvel News

Panvel News

मुंबई तक

04 Dec 2025 (अपडेटेड: 04 Dec 2025, 09:29 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

मृत व्यक्तीला जिवंत दाखवून माजी नगरसेवकाने भूखंड ढापला

point

नुकताच शेकाप सोडून भाजपमध्ये केला होता प्रवेश

Panvel News : पनवेलमध्ये सिडकोच्या जमिनीवर झालेल्या मोठ्या गैरव्यवहाराचा पर्दाफाश झाला असून, भाजपचे माजी नगरसेवक सुनील बहिरा यांच्यासह 12 जणांविरोधात पनवेल शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मृत व्यक्तीला जिवंत असल्याचे भासवून 11000 चौरस मीटरचा मौल्यवान भूखंड मिळवण्यात आल्याचा गंभीर आरोप आहे. सिडकोने सविस्तर तपास करून पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून, या संपूर्ण प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

हे वाचलं का?

ही घटना तक्का गावातील बहिरा कुटुंबाशी संबंधित आहे. विष्णू बहिरा यांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले होते. त्यांच्या मृत्यूनंतर सिडकोकडून संपादित जमिनीच्या बदल्यात त्यांच्या कुटुंबाला भूखंड मिळणार होता. मात्र, या भूखंडावर डोळा ठेवून काही जणांनी एकत्र येऊन फसवणुकीची योजना आखल्याचा आरोप सिडकोने केला आहे.

तपासात असे उघड झाले की, विष्णू बहिरा मृत असल्याचे माहित असूनही त्यांच्या नावे बनावट ओळखपत्र तयार करण्यात आले. या ओळखपत्रावर विष्णू बहिरा यांचा फोटो न लावता सखाराम ढवळे यांचा फोटो बसवण्यात आला. ढवळे यांनाच विष्णू बहिरा असल्याचे भासवून विविध सरकारी कार्यालयांत कागदपत्रे सादर करण्यात आली. इतकेच नव्हे तर स्वाक्षऱ्याही ढवळे यांच्या घेतल्या गेल्या, ज्यामुळे सिडकोकडून मिळणाऱ्या 1100 चौरस मीटरच्या भूखंडावर कब्जा मिळवण्याचा प्रयत्न झाला.

हेही वाचा : 4 वर्षांच्या चिमुरडीला बाथरूममध्ये नेलं, नंतर जमिनीवर डोकं आपटलं, गळा दाबून... मदतनीसनं ओलांडली क्रूरतेची सीमा

ही बनावट कागदपत्रे 2006 सालापासून तहसील कार्यालय, दुय्यम निबंधक कार्यालय आणि सिडकोच्या अनेक शाखांमध्ये वापरण्यात आल्याचे दस्तऐवज तपासात आढळले. भाडेपट्टा करारनामा आणि त्रिपक्षीय करार प्रक्रियेदरम्यानही ढवळे हेच विष्णू बहिरा म्हणून हजर राहिले होते. या सर्व व्यवहारांमधील विसंगती तपासात उघड झाल्याने सिडकोने चौकशी सुरू केली आणि अखेर पोलिसांकडे औपचारिक तक्रार दिली.

सिडकोच्या तक्रारीनुसार, या प्रकरणात सुनील बहिरा यांच्यासह एकूण 12 जणांची नावे आहेत. सर्वांनी संगनमताने कागदपत्रांची जुळवाजुळव करून भूखंड बळकावण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. पनवेल शहर पोलिसांनी 2 डिसेंबर रोजी या सर्वांविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे.

विशेष म्हणजे, सुनील बहिरा यांनी अलीकडेच शेकापचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर काही दिवसातच त्यांचे नाव या मोठ्या जमीन गैरव्यवहारात समोर आल्यामुळे राजकीय वर्तुळातही चर्चेला उधाण आले आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

अवघ्या 19व्या वर्षी 'दंडक्रम पारायण'! सतत 50 दिवस 2000 वेदमंत्रांचे पठण... अहिल्यानगरच्या महेशने रचला नवा विक्रम

    follow whatsapp