Pawanraje Nimbalkar murder case, धाराशिव - गणेश जाधव : पवनराजे निंबाळकर यांच्या हत्या प्रकरणाचा निकाल आज (दि.16) लागणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत होती. मात्र, न्यायालयाने निकालाची तारीख पुढे ढकलली आहे. निकाल तीन दिवसांनी 20 जूनला लागणार असल्याची माहिती समोर आली आहे. न्यायाधीशांनी निकालाचा मसुदा (जजमेंट) तयार करून त्याचे डिक्टेशन पूर्ण केले आहे. मात्र, त्यामध्ये काही दुरुस्त्या करायच्या असून अंतिम संकलन (कम्पायलेशन) बाकी आहे. नियमित स्टेनोग्राफर रजेवर असल्यामुळे हे काम पूर्ण होऊ शकले नाही. तसेच, संपूर्ण न्यायालयीन सुट्टीदरम्यान न्यायाधीश विविध कामकाज आणि नियुक्त्यांमध्ये व्यस्त होते, त्यामुळे निर्णय अंतिम स्वरूपात तयार करता आला नाही. सीबीआयच्या वकिलांनी आपण उपस्थित राहू शकणार नसल्याचे सांगितले. त्यांना नागपूरला जावे लागणार असल्याने त्यांनी मुदतवाढ देण्याची विनंती केली. अखेरीस न्यायाधीशांनी ती विनंती मान्य केली आणि निकाल जाहीर करण्याची तारीख 20 जूनपर्यंत पुढे ढकलली.
ADVERTISEMENT
हेही वाचा : Maharashtra Monsoon : उष्णतेची लाट कुठल्या भागांमध्ये धडकणार? पाऊस कधी येणार?
दरम्यान, न्यायालयात पद्मसिंह पाटील यांच्या वकिलांकडून कोणते युक्तीवाद करण्यात आले होते? याची माहिती आपण जाणून घेऊयात...
डॉ पाटील निर्दोष - 1 हजार 250 पानांचा लेखी युक्तिवाद
राजकीय स्वार्थ, सहानुभूती व लाभासाठी - शत्रुत्वातुन हत्या, निंबाळकर परिवारावर गंभीर आरोप
पवनराजे निंबाळकर व त्यांच्या गाडीचा चालक समद काझी यांच्या दुहेरी हत्याकांडातील मुख्य संशयित आरोपी माजी गृहमंत्री तथा माजी खासदार डॉ पद्मसिंह पाटील यांच्या वतीने ऍड भुषण महाडिक यांनी तब्बल 1 हजार 250 पानाचा लेखी युक्तिवाद कोर्टात सादर केला. त्यात त्यांनी डॉ पद्मसिंह पाटील यांच्यावरील सर्व आरोप फेटाळत निंबाळकर परिवार व तपास यंत्रणावर अनेक गंभीर आरोप केले.
राजकीय स्वार्थ, सहानुभूती व लाभ मिळविण्यासाठी डॉ पद्मसिंह पाटील यांच्या विरोधात निंबाळकर परिवाराने भूमिका घेतली असा आरोप करण्यात आला. मुंबईतील अतिरिक्त सत्र न्यायाधीश तथा विशेष न्यायाधीश एस आर नावंदर यांच्या कोर्टात सुनावणी सुरु आहे.
हेही वाचा : Maharashtra Monsoon : उष्णतेची लाट कुठल्या भागांमध्ये धडकणार? पाऊस कधी येणार?
डॉ पद्मसिंह पाटील यांच्या वतीने ऍड महाडिक यांनी 25 नोव्हेंबर 25 रोजी तोंडी युक्तिवाद संपवला, त्यांनी सलग 24 सुनावणीत बाजु मांडली. डॉ पद्मसिंह पाटील हे या खुन खटल्यात कसे निर्दोष आहेत व त्यांच्यावरील आरोप चुकीचे आहेत, माफीचा साक्षीदार हा विश्वासार्ह नाही असे म्हणत पुरावे, तपासातील त्रुटी व इतर खटल्यातील न्यायालयाचे निकाल मांडले. 28 जानेवारी 26 रोजी ऍड महाडिक यांनी 1 हजार 250 पानाचे लेखी म्हणणे सादर केले.
डॉ पाटील यांच्या युक्तिवाद नुसार, माफीचा साक्षीदार जैन याने दिलेल्या जबाबावर हा खटला पुर्णपणे अवलंबून असून सीबीआयने एकतर्फी, पुर्वनियोजित तपास केला. कै. पवनराजे निंबाळकर यांच्या परिवाराने राजकीय स्वार्थाच्या कथित हेतूने डॉ पद्मसिंह पाटील यांच्यावर नेहमी आरोप केले. सीबीआयने महाराष्ट्र पोलिसांकडून मिळालेल्या आधीच्या तपास नोंदीचा योग्य वापर केला नाही. आरोपी व माफीचा साक्षीदार, पवन राजे यांचे कॉल डिटेल रेकॉर्ड तपासले नाही.
माफीचा साक्षीदार आणि आरोपी दिनेश तिवारी यांच्यावर 8 फेब्रुवारी ते 20 एप्रिल 2009 या कालावधीत मुंबई गुन्हे शाखेने 5 गुन्ह्यांमध्ये ताब्यात ठेवले. त्यानंतर त्यांच्या जबाबाच्या आधारे सर्व आरोपींना अटक करून तपास केला. जैन व तिवारी याच्या विश्वासहर्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थितीत केले आहे. पवनराजे यांच्या कथित आर्थिक गैरव्यवहारांमुळे त्यांनी सभासद, शेतकरीसह अनेक शत्रू निर्माण केले होते त्यामुळे त्यांचे अनेक शत्रू होते. आर्थिक व्यवहार त्यातून हत्या झाली.
डॉ. पाटील यांनी दिलेल्या अधिकारांचा वापर समाज सेवेसाठी करण्याऐवजी पवनराजे यांनी त्याचा गैरवापर करून वैयक्तिक व आर्थिक लाभ घेतला. तेरणा साखर कारखाना, जिल्हा मध्यवर्ती बँक संबंधित कथित आर्थिक गैरव्यवहारांमुळे गुन्हे दाखल होऊन त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला. त्या परिस्थितीत पवनराजे यांना डॉ पाटील यांनी वाचवावे अशी अपेक्षा व्यक्त केली होती. मात्र डॉ. पाटील यांनी त्यास नकार दिल्यामुळेच पवनराजे व त्यांच्या कुटुंबीयांनी डॉ पाटील यांच्या विरोधात भूमिका घेतल्याचा दावा करण्यात आला.
3 जून 2006 रोजी हत्या झालेल्या दिवशी तानाजी पाटील हे ठाणे परिसरात असल्याची माहिती तपासात समोर आली होती. त्यानंतर त्यांची नार्को एनालिसिस चाचणी घेण्यात आली. या चाचणीत तानाजी पाटील यांनी छोटा राजन टोळीतील शूटर विकी मल्होत्रा यांनी पवनराजे यांच्यावर गोळीबार केल्याचा दावा केल्याचे नमूद केले. मात्र या चाचणीतून मिळालेल्या सुगाव्यांचा तपास पुढे नेण्याऐवजी सीबीआयने त्या दिशेने तपास न करता केवळ माफीचा साक्षीदार परसमल जैन यांच्या कथित कबुली जबाबावरच अवलंबून राहिल्याचा आरोप डॉ पाटील यांच्या वतीने केला आहे.
दुहेरी हत्याकांडातील माफीचा साक्षीदार पारसमल जैनला 14 वर्षांनी व शुटर दिनेश तिवारी आणि पिंटू सिंग या 2 आरोपींना तब्बल 16 वर्षानंतर तर डॉ पाटील यांना साडे 3 महिन्यात जामीन मिळाला असून सर्व आरोपी जामिनावर आहेत.
ADVERTISEMENT











