Petrol Rate , पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या 86 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने राज्यभरात विविध उपक्रम राबवले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून पुण्यातील कोथरूड परिसरात नागरिकांसाठी कमी दरात पेट्रोल उपलब्ध करून देण्याचा उपक्रम आज (दि.12) सकाळी राबविण्यात आला. कोथरूड विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे नेते गिरीश गुरनानी यांच्या पुढाकाराने कर्वे पुतळा येथील पेट्रोल पंपावर प्रती लिटर फक्त 86 रुपये दराने पेट्रोल देण्याची व्यवस्था करण्यात आली. हा उपक्रम सुरू झाल्यानंतर काही मिनिटांतच पेट्रोल पंपाबाहेर मोठी रांग लागली. दुपारी 2 वाजेपर्यंत हा उपक्रम सुरू ठेवण्यात येणार असून, आतापर्यंत सुमारे 500 नागरिकांनी या सवलतीचा लाभ घेतल्याची माहिती आयोजकांनी दिली.
ADVERTISEMENT
हेही वाचा : मुंबई : फेसबुकवर मैत्री, नंतर महिलेचा whatsapp वर अर्धनग्न होऊन व्हिडीओ कॉल, अन् व्हायरलची धमकी देत लुटलं
गिरीश गुरानी काय म्हणाले?
“महागाईमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त आहेत. पेट्रोल-डिझेलचे वाढते दर ही मोठी समस्या बनली आहे. साहेबांच्या 86 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने नागरिकांना थोडासा दिलासा द्यावा म्हणून आम्ही हा उपक्रम राबवला. सकाळी दहा वाजता सुरुवात केली असून मोठ्या प्रमाणावर नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे,” अशी प्रतिक्रिया गिरीश गुरनानी यांनी दिली.
उपक्रमाचा लाभ घेतलेल्या काही नागरिकांनी म्हटले—“पेट्रोलचे दर गगनाला भिडले असताना 86 रुपयांत पेट्रोल मिळणे ही मोठी मदत आहे. काही प्रमाणात का होईना, महागाईत दिलासा मिळाल्याचं समाधान आहे. पवार साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.”
काहींनी हा उपक्रम ‘सर्वसामान्यांसाठी उपयुक्त आणि कौतुकास्पद’ असल्याचे मत व्यक्त केले. शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभर विविध ठिकाणी सामाजिक, आरोग्यविषयक आणि जनकल्याणकारी उपक्रम राबवले जात असताना, पुण्यातील हा पेट्रोल सवलत उपक्रम विशेष लक्षवेधी ठरला आहे. कोथरूडमध्ये नागरिकांच्या मोठ्या प्रतिसादामुळे पंप परिसरात दिवसभर उत्साही वातावरण पाहायला मिळाले.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











