नवी दिल्ली: काँग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील एका मोठ्या जमीन घोटाळ्यावरून ट्वीट करून मोदी सरकार आणि महाराष्ट्रातील महायुती सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. त्यांच्या ट्वीटमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या कंपनीशी संबंधित असलेल्या पुण्यातील एका जमीन व्यवहारावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या ट्वीटने राजकीय वातावरण तापले असून, विरोधकांनी अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
ADVERTISEMENT
राहुल गांधींचे ट्वीट आणि आरोप
या ट्वीटमध्ये राहुल गांधींनी पार्थ पवार यांच्या कंपनीने पुण्यातील 1800 कोटी रुपयांच्या किंमतीची सरकारी जमीन केवळ 300 कोटी रुपयांत खरेदी केल्याचा आणि स्टँप ड्यूटी हटविण्यात आल्याचा आरोप केला आहे.
राहुल गांधींनी या घोटाळ्याला 'जमीन चोरी' असे संबोधून महाराष्ट्रातील 'वोट चोरी'शी जोडले आहे, ज्यात ते मोदी सरकारच्या मौनावर प्रश्न उपस्थित करत आहेत.
नेमका जमीन घोटाळा काय?
हे प्रकरण पुण्यातील एका मोठ्या जमीन व्यवहाराशी संबंधित आहे. सरकारी अहवालानुसार, पुण्यातील अमेडिया कंपनीने, ज्यात पार्थ पवार हे संचालक आहे. त्या कंपनीने 1800 कोटी रुपयांची सरकारी जमीन केवळ 300 कोटी रुपयांत खरेदी केली.
या जमिनीच्या व्यवहारात केवळ 500 रुपयांची स्टँप ड्यूटीमध्ये भरण्यात आली. जिथे 6 कोटींहून अधिकचा भरणा हा शासनाला अपेक्षित होता त्यात अचानक मोठी सूट देण्यात आल्याने आता या प्रकरणाला गंभीर वळण लागलं आहे. या व्यवहारामुळे सरकारी तिजोरीला मोठा फटका बसला आहे.
हे प्रकरण काही अधिकाऱ्यांच्या संगनमताने पार पडल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. दोन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले असून, फडणवीस म्हणाले, "या घोटाळ्यात कितीही शक्तिशाली व्यक्ती असली तरी तिला सोडले जाणार नाही. न्याय सर्वांसाठी समान आहे."
विरोधी पक्षांनी अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी केली असून, पार्थ पवार यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्याची मागणी केली आहे.
अजित पवार यांनी या आरोपांचा इन्कार केला आहे. ते म्हणाले, "मला या व्यवहाराची कोणतीही माहिती नाही. माझ्या याच्याशी काही संबंध नाही."
पार्थ पवार हे अजित पवारांचे पुत्र असून, ते राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत आणि 2019 मध्ये बारामती लोकसभा निवडणुकीत पराभूत झाले होते. ते काही कंपन्यांचे संचालक असल्याचे सांगितले जाते.
ADVERTISEMENT











