Sanjay Raut on Raj Thackeray, Mumbai : "काँग्रेसला सोबत घ्यावं, अशी राज ठाकरेंची देखील इच्छा आहे. त्यांची भूमिका आहे, याचा अर्थ निर्णय आहे, असा नाही. कारण महाराष्ट्रात प्रत्येक पक्षाचं एक वेगळं स्थान आहे. जसं शिवसेनेचं आहे, तसं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं देखील आहे. माननीय शरद पवार साहेबांचं आहे. डाव्या पक्षांचं देखील आहे. शिवाय काँग्रेस देखील महाराष्ट्रातील महत्त्वाचा पक्ष आहे", असं वक्तव्य ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलंय. ते मुंबईतील पत्रकार परिषदेत बोलत होते.
ADVERTISEMENT
संजय राऊत म्हणाले, महाविकास आघाडीत नवीन घटक यायचा असेल तर नक्कीच एकत्र बसून चर्चा करावी लागेल, असं माझं मत आहे. काँग्रेसचा निर्णय दिल्लीतून होईल. आम्ही उरलेले लोकं महाराष्ट्रात आहोत. आम्ही महाराष्ट्रात निर्णय घेऊ...उद्या सर्वपक्षीय नेते निवडणूक आयोगाकडे जाणार आहेत. उद्याच्या शिष्टमंडळाच्या बैठकीत मनसे प्रमुख राज ठाकरे, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदरणीय शरद पवार सामील होत आहेत.
पुण्यात सुरु असलेल्या गुन्हेगारीवरुन संजय राऊतांची अजितदादांवर टीका
एकेकाळी पुणे हे शिक्षणाचे आणि संस्कृतीचे माहेरघर म्हणून ओळखले जात होते. मात्र, आजच्या घडीला अजित पवार आणि नंतर भाजपातील काही घटकांमुळे हेच शहर गुंडांच्या आश्रयस्थानात परिवर्तित झाल्याचे दिसत आहे. कोयता गँगची संकल्पना देखील याच पुण्यात उदयास आली. अशा परिस्थितीत पोलिसांची भूमिका काय आहे, असा सवाल उपस्थित करत संजय राऊत यांनी टीका केली.
त्यांनी म्हटलं की, पुण्याचे पोलीस आयुक्तांनी नाशिकच्या पोलीस आयुक्तांकडून धडा घ्यावा, कारण नाशिकमध्ये सुरू असलेल्या कारवायांमधून प्रेरणा घेण्यासारखे आहे. राज्याचे गृहमंत्री यांच्यावर याची जबाबदारी आहे. पुण्यातील एक मंत्री केंद्रात असूनही शहराची सुरू असलेली बदनामी अत्यंत चिंताजनक आहे. ठाण्याप्रमाणेच पुण्यातही मोठ्या प्रमाणावर गुंडगिरी वाढत चालली आहे, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT
