मला पाडण्यासाठी भाजपने 5 कोटी दिले, स्थानिक निवडणुकीत तुकडा सुद्धा देणार नाही, अजितदादांच्या आमदाराचं वक्तव्य
Ajit Pawar MLA Dharamrao Baba Atram : मला पाडण्यासाठी भाजपने 5 कोटी दिले, स्थानिक निवडणुकीत तुकडा सुद्धा देणार नाही, अजितदादांच्या आमदाराचं वक्तव्य
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

मला पाडण्यासाठी भाजपने 5 कोटी दिले

स्थानिक निवडणुकीत तुकडा सुद्धा देणार नाही, धर्मराव बाबा आत्राम यांचं वक्तव्य
Ajit Pawar MLA Dharamrao Baba Atram, चार्मोशी : भाजपने विधानसभेत मला पाडण्यासाठी तब्बल पाच कोटी रुपये दिले. माझ्या पुतण्याला माझ्या विरोधात डमी उमेदवार म्हणून उभे केले. परंतु आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मी एक तुकडा सुद्धा देणार नाही. येणाऱ्या निवडणुकीमध्ये फक्त घड्याळ चालेल आणि एकही जागा आम्ही दुसऱ्या पक्षाला देणार नाही, असे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार धर्मराव बाबा आत्राम म्हणाले आहेत. चामोर्शी येथे आयोजित जनकल्याण यात्रेत ते बोलत होते.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीत माझ्या मतदारसंघात कोण किती जागा लढवणार आणि कोणाला किती जागा द्यायच्या, याचा अंतिम निर्णय मीच घेईन, असं आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी स्पष्ट केलं. तसेच, या निवडणुकीत अहेरी मतदारसंघात फक्त ‘घड्याळ’च चालेल, असं ठाम विधान त्यांनी केलं.
आपल्या मतदारसंघात जागावाटपाचा निर्णय स्वतः घेणार असल्याचं सांगत त्यांनी भारतीय जनता पक्षावरही टीका केली. “भाजपने मला हरवण्यासाठी माझ्या पुतण्याला डमी उमेदवार म्हणून उभं केलं आणि त्यासाठी तब्बल पाच कोटी रुपये दिले. पण मी त्यांना स्पष्ट सांगू इच्छितो की माझ्याकडून त्यांना एक इंचही जागा मिळणार नाही. या निवडणुकीत अहेरीत केवळ घड्याळाचेच वर्चस्व दिसेल,” असं ते म्हणाले.
विधानसभा निवडणुकीत काय घडलं?
गेल्या विधानसभा निवडणुकीत अहेरी मतदारसंघात कौटुंबिक लढत पाहायला मिळाली होती. अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून धर्मरावबाबा आत्राम रिंगणात उतरले होते, तर शरद पवार गटाकडून त्यांच्या कन्या भाग्यश्री आत्राम यांनी आव्हान दिलं होतं. याशिवाय, अपक्ष उमेदवार म्हणून त्यांचे पुतणे राजे अंबरीशराव आत्राम यांनीही उमेदवारी दाखल केली होती.