Rajan Patil : विजय बाबर : अनेक वर्षांपासून अनगर ग्रामपंचायत बिनविरोध निवडून आणणारे माजी आमदार राजन पाटील यांनी अनगर नगरपंचायतीत 17 उमेदवार निर्विवादपणे बिनविरोध निवडून आणले आहेत. मात्र नगराध्यक्षपदासाठी दोन अर्ज आल्याने या पदासाठी निवडणूक मात्र होणार आहे. अशातच आता नगरपालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशीच सोलापुरातील अनगरमध्ये माजी आमदार राजन पाटील यांचे पुत्र बाळराजे पाटील आणि अजिंक्यराणा पाटीलसह ग्रामस्थांनी जल्लोष केला. त्याचं कारणंही तसंच आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : फलटणमध्ये शिवसेनेकडून रामराजेंचा मुलगा लढवणार निवडणूक, दुसरीकडे भाजपच्या माजी खासदाराचा भाऊ निवडणुकीच्या रिंगणात
अनगर नगरपालिकेमध्ये सर्व 17 जागा बिनविरोध निवडून आल्या
अनगर नगरपालिका निवडणुकीत सर्व 17 जागा या बिनविरोध निवडून आल्या आहेत. राष्ट्रवादीतून नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केलेले माजी आमदार राजन पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनेल बिनविरोध निवडून आलं आहे. मात्र नगराध्यक्षपदासाठी दोन अर्ज आल्याने निवडणूक होणार आहे.
सोलापुरातील अनगर नगरपंचायतीच्या 17 सदस्यांच्या जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत.17 सदस्यांच्या जागासाठी केवळ 17 अर्ज दाखल झाल्याने ही निवडणूकच बिनविरोध झाली आहे. भाजपचे नेते माजी आमदार राजन पाटील यांनी ही किमया घडवून आणली आहे. माजी आमदार राजन पाटील यांनी नुकतंच भाजपमध्ये प्रवेश केला आहे.त्या आधी ते अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये होते.अशा पद्धतीने सर्व 17 जागा या बिनविरोध होणारी अनगर नगरपंचायत ही राज्यातील पहिलीच नगरपंचायत ठरली आहे.
नगराध्यक्षपदासाठी भाजप विरुद्ध राष्ट्रवादी महायुतीतील पक्षांमध्ये लढत
नगरसेवकपदाच्या सर्व जागा जरी बिनविरोध निवडून आल्या असल्या तरी नगराध्यक्षपदासाठी मात्र निवडणूक होणार आहे. नगराध्यक्ष पदासाठी दोन अर्ज आले आहेत. नगराध्यक्षपदासाठी भाजपकडून राजन पाटील यांच्या सून प्राजक्ता पाटील उभ्या आहेत. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून उज्वला थिटे यांनी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे भाजप विरुद्ध राष्ट्रवादी या महायुतीतील दोन पक्षांमध्येच ही लढत रंगणार असल्याचं स्पष्ट आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून मोहोळ तालुक्यासोबत अनगर ग्रामपंचायतीमध्येही राजन पाटील यांच्या कुटुंबाचे निर्विवाद वर्चस्व राहिले आहे.अनगर ग्रामपंचायतीची नगरपंचायत झाल्यानंतर याठिकाणी पहिल्यांदाच निवडणूक होत आहे. गेली अनेक वर्षे याठिकाणी राजन पाटील यांना आव्हान देणारा एकही चेहरा नव्हता. किंबहुना असा कोणताही उमेदवार उभाच राहणार नाही, अशी काळजी राजन पाटील यांनी घेतली होती. आताही सर्व नगरसेवक त्यांनी बिनविरोध निवडून आणले.
हे ही वाचा : पुणेकरांसाठी आणखी एक टर्मिनस, दोन रेल्वे नवीन प्लॅटफॉर्मवरून सुसाट धावणार, Time Table आलं समोर
राजन पाटील भाजपमध्ये गेल्यानंतर अजित पवार यांनी याठिकाणी उज्ज्वला थिटे यांच्या रुपाने नवा मोहरा रिंगणात उतरवला आहे.आपल्याला उमेदवारी अर्ज भरू दिला जात नव्हता.रस्त्यात ट्रॅक्टर आडवे लावले होते, गाड्या चेक करून कुटुंबावर हल्ला करण्याचा डाव होता, राजन पाटलांची इतकी दहशत आहे असा आरोप उज्ज्वला थिटे यांनी केला होता.
ADVERTISEMENT











