Raj Thackeray facebook post on Balasaheb Thackeray death anniversary : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (दि.17) शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्ताने त्यांना अभिवादन करण्यासाठी एक फेसबुक पोस्ट केली आहे. यातून त्यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केलं असून बाळासाहेबांच्या विचारांबाबत सविस्तरपणे भाष्य केलंय. राज ठाकरे यांनी पोस्टमध्ये काय म्हटलंय? जाणून घेऊयात..
ADVERTISEMENT
राज ठाकरे यांची पोस्ट जशीच्या तशी
शिवसेना पक्षाचे संस्थापक, हिंदुहृदयसम्राट आणि माझे काका स्व. बाळासाहेब ठाकरे यांची आज पुण्यतिथी. देशाच्या इतिहासात भाषिक अस्मितेच्या जोरावर एक प्रचंड चळवळ निर्माण करून त्यातून एका राजकीय पक्षाला जन्म देणारे बाळासाहेब. आणि पुढे जातीय अस्मिता तीव्र होण्याच्या काळात आणि भारतीय जनता पक्षाचा कमंडलवाद फोफावायच्या आधी हिंदू म्हणून अस्मिता जागी करणारे बाळासाहेबच.
हेही वाचा : राज्यात गेल्या 9 महिन्यांत 11532 जणांचा रस्ते अपघातात मृत्यू; समृद्धी महामार्गाची आकडेवारी चिंतेत टाकणारी
पण म्हणून बाळासाहेबांनी हिंदूंकडे व्होटबँक म्हणून नाही पाहिलं. त्यांच्यासाठी हा विषय अस्मितेचा होता, धर्माप्रतीच्या प्रेमाचा होता. आणि हे करताना बाळासाहेबांनी, प्रबोधनकारांकडून आलेला तर्कवाद पण सोडला नाही. बाळासाहेब हे कमालीचे हिंदुप्रेमी होते, पण म्हणून त्यांच्यातली चिकित्सक वृत्ती लोप पावली नाही. त्यामुळे बाळासाहेबांची प्रतिमा चोरून हिंदुत्वाचे वारस म्हणून मिरवणाऱ्यांची किंवा त्यावर मतं मागणाऱ्यांची गंमत वाटते. ना त्यांना बाळासाहेब माहित आहेत, ना त्यांना प्रबोधनकार माहित आहेत, ( अर्थात ऐकणं आणि वाचणं यांचा दुष्काळ असल्यामुळे ) त्यामुळे त्यांना बाळासाहेबांच्या विचारांची झालेली मशागत किती समृद्ध होती ह्या पुसटशी देखील कल्पना नाही !
फक्त मतं, सत्ता मिळवणे आणि ती सत्ता मिळाल्यावर वाट्टेल तसं ओरबाडणं म्हणजे राजकारण हे रूढ होत असताना, समाजकारण आधी आणि मग राजकारण हे आमच्या विचारात रुजवणाऱ्या बाळासाहेबांच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे विनम्र अभिवादन !
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











