Rajya Sabha Election, नवी दिल्ली : एप्रिल 2026 मध्ये राज्यसभेतील सदस्यांचा कार्यकाळ संपुष्टात येत असल्याने देशभरातील 37 रिक्त होणाऱ्या जागांसाठी द्वैवार्षिक निवडणुकांची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाने केली आहे. विविध राज्यांतील या जागांसाठी निवडणूक प्रक्रिया राबविण्यात येणार असून महाराष्ट्रातून सर्वाधिक 7 जागांसाठी मतदान होणार आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय घडामोडींना वेग येण्याची चिन्हे आहेत.
ADVERTISEMENT
मतदान अन् मतमोजणी कधी?
निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या अधिकृत कार्यक्रमानुसार, 26 फेब्रुवारी 2026 रोजी निवडणुकीची अधिसूचना जारी करण्यात येणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 5 मार्च 2026 निश्चित करण्यात आली आहे. 6 मार्च रोजी अर्जांची छाननी होणार असून 9 मार्चपर्यंत उमेदवारांना अर्ज मागे घेण्याची मुदत देण्यात आली आहे.
मतदानाची प्रक्रिया 16 मार्च 2026 रोजी पार पडणार आहे. सकाळी 9 ते सायंकाळी 4 या वेळेत मतदान होईल. त्याच दिवशी सायंकाळी 5 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार असून निकाल त्यानंतर जाहीर केले जातील. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया 20 मार्च 2026 पूर्वी पूर्ण केली जाणार आहे.
हेही वाचा : भिगवण : लग्न चार दिवसांवर असताना तरुणीचं अपहरण, आई आणि भावाच्या डोळ्यात चटणी टाकून पळवून नेलं
महाराष्ट्रातील कोणते नेते राज्यसभेतून निवृत्त होणार?
महाराष्ट्रातील 7 जागांसाठी होणारी ही निवडणूक विशेष लक्षवेधी ठरणार आहे. विधानसभेतील सध्याच्या पक्षीय संख्याबळाच्या पार्श्वभूमीवर कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील, याबाबत राजकीय चर्चांना उधाण आले आहे. महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातील राजकीय समीकरणे, तसेच संभाव्य अपक्ष किंवा छोटे पक्ष यांची भूमिका निर्णायक ठरू शकते.
दरम्यान, महाराष्ट्रातून निवृत्त होणाऱ्या राज्यसभा सदस्यांमध्ये ज्येष्ठ नेते Sharad Pawar, केंद्रीय मंत्री Ramdas Athawale, फौजिया खान (शरद पवार गट),रजनी पाटील, प्रियंका चतुर्वेदी, धैर्यशील पाटील (भाजप) आणि Bhagwat Karad यांचा समावेश आहे. या सर्वांचा कार्यकाळ एप्रिल 2026 मध्ये पूर्ण होत आहे.
राज्यसभा ही संसदेतले वरिष्ठ सभागृह असून तिच्या सदस्यांची निवड संबंधित राज्यांच्या विधानसभेतील निवडून आलेले सदस्य करतात. प्रमाण प्रतिनिधित्व पद्धतीने आणि एकल हस्तांतरणीय मतप्रणालीद्वारे ही निवडणूक घेतली जाते. त्यामुळे प्रत्येक पक्षाचे संख्याबळ आणि राजकीय रणनीती यांना मोठे महत्त्व असते. आगामी काही दिवसांत उमेदवारी अर्ज भरण्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय हालचालींना वेग येण्याची शक्यता असून संभाव्य उमेदवारांबाबत विविध पक्षांत अंतर्गत चर्चांना सुरुवात झाली आहे. राज्यसभेच्या या निवडणुका केवळ संसदीय गणितापुरत्याच मर्यादित नसून आगामी राजकीय दिशा ठरवणाऱ्या ठरू शकतात.
इतर महत्त्वाच्या बातम्या
10 वीच्या मुलीची मैत्रिणींकडून फसवणूक, भावाकडून बलात्कार घडवून आणला अन् व्हिडीओ दाखवून ब्लॅकमेल...
ADVERTISEMENT











