Ravindra Dhangekar on Pune Jain boarding land transactions : पुण्यातील जैन बोर्डिंग ट्रस्टसोबतचा वादग्रस्त जमीन व्यवहार अखेर रद्द करण्यात आला आहे. बिल्डर विशाल गोखले यांनी ई-मेलद्वारे जैन बोर्डिंग ट्रस्टला हा व्यवहार रद्द करण्याचा निर्णय कळवला आहे. ट्रस्टचे चेअरमन आणि इतर ट्रस्टी यांना पाठवलेल्या मेलमध्ये त्यांनी व्यवहारातून माघार घेत असल्याचं स्पष्ट केलं आहे. तसेच 230 कोटी रुपये परत देण्याची विनंतीही गोखले यांनी केली आहे.
ADVERTISEMENT
धर्मदाय आयुक्तालयालाही पत्र पाठवून या व्यवहाराबाबत योग्य ती कायदेशीर कार्यवाही करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. नैतिकतेच्या दृष्टीने हा निर्णय घेतल्याचं सांगत, “जैन समाजाच्या भावना दुखवण्याचा माझा हेतू नव्हता,” असं स्पष्टीकरणही गोखले यांनी दिलं आहे.
जैन बोर्डिंगच्या जमिनीच्या व्यवहारावरून मागील काही दिवसांपासून राजकीय वातावरण तापलेलं आहे. भाजप खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर विरोधकांकडून आरोपांची मालिका सुरू होती. या प्रकरणी शिवसेना (शिंदे गट) नेते आणि माजी आमदार रवींद्र धंगेकर हे याप्रकरणी आक्रमक झाले होते. मात्र, मोहोळ यांनी सर्व आरोप फेटाळून लावले होते. या पार्श्वभूमीवर आता व्यवहार रद्द झाल्यानंतर रवींद्र धंगेकरांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा : अभिनेत्री तेजस्विनी लोणारी आणि शिवसेना नेत्याचा साखरपुडा संपन्न, पाहा व्हिडीओ
जैन बोर्डिंगचा व्यवहार रद्द करण्याचा मेल पाठवल्यानंतर रवींद्र धंगेकरांची प्रतिक्रिया
रवींद्र धंगेकर म्हणाले, “जर दोन दिवसांत हा व्यवहार पूर्णपणे रद्द झाला, तर मी मुरलीधर मोहोळ आणि सर्वांना जिलेबी भरवणार आहे. पुढील दोन दिवस मी त्यांच्याविरुद्ध काहीही बोलणार नाही,” असं ते म्हणाले. एकनाथ शिंदे यांनी दोन दिवसांत तोडगा निघेल असं सांगितल्याने ते समाधानी असल्याचंही त्यांनी नमूद केलं.
“हा व्यवहार पूर्णपणे बोगस आणि गतीमान पद्धतीने झाला. देशभर या प्रकरणाची चर्चा झाली. विशाल गोखले यांनी मेल पाठवला असला तरी, मी तो व्यवहार प्रत्यक्ष रद्द झाल्याशिवाय शांत बसणार नाही,” असं धंगेकरांनी स्पष्ट केलं.
ते पुढे म्हणाले, “विशाल गोखले फार मोठा माणूस नाही. त्याला व्यवहार करण्यास आणि नंतर माघार घेण्यास कोणी प्रवृत्त केलं, याचा विचार करायला हवा. दोन दिवसांत हा व्यवहार कायदेशीररीत्या संपला पाहिजे. मी एकनाथ शिंदे साहेबांना शब्द दिला आहे की दोन दिवस मी गप्प बसेन. पण काही चुकीचं घडत असेल, तर मी पुन्हा बोलणारच,” असं धंगेकरांनी ठामपणे सांगितलं.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











