पंढरपुरातील आंदोलनावेळी Rohit Pawar यांचा परिवार भावूक, पत्नी कुंती यांच्यासह मुलंही रडली

मुंबई तक

15 Jun 2026 (अपडेटेड: 15 Jun 2026, 03:46 PM)

Rohit Pawar Farmer Protest Pandharpur Update : आमदार रोहित पवार यांच्या कुटुंबियांनी आंदोलनस्थळी त्यांची भेट घेतली.यावेळी रोहित पवारांच्या पत्नी-मुलांना अश्रू अनावर झाले. पत्नी कुंती पवार मुलांसह रोहित पवार उपोषण करत असलेल्या स्टेजवर आल्या होत्या.

Rohit Pawar Farmer Protest Pandharpur Update

Rohit Pawar Farmer Protest Pandharpur Update

Google CTA

बातम्या हायलाइट

point

पंढरपुरातील आंदोलनावेळी Rohit Pawar यांचा परिवार भावूक

point

पत्नी कुंती यांच्यासह मुलंही रडली

 Farmer Protest Pandharpur: शेतकरी कर्जमाफीच्या प्रश्नावरुन आमदार रोहित पवार पंढरपुरात उपोषणाला बसलेले असताना त्यांच्या कुटुंबियांनी रविवारी (दि.14 आंदोलनस्थळी जाऊन त्यांची भेट घेतली होती. यावेळी रोहित पवारांच्या पत्नी-मुलांना अश्रू अनावर झालेले पाहायला मिळाले. पत्नी कुंती पवार मुलांसह रोहित पवार उपोषण करत असलेल्या स्टेजवर आल्या. स्टेजवर येताच मुलांना अश्रू अनावर झाले. पत्नी कुंती पवारही भावूक झाल्या. रोहित पवारही भावूक झाले होते. अन्नदात्यासाठी अन्नत्याग आंदोलन करत रोहित पवार सरकारविरोधात चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळाले होते. मात्र, सरकारने आश्वासन दिल्यानंतर त्यांनी तिसऱ्या दिवशी उपोषण सोडलं.

हे वाचलं का?

हेही वाचा : सांगली : 13 वर्षीय मुलावर गोळ्या झाडल्या, आरोपी मैत्रिणीसोबत लॉजवर सापडला!

उपोषण सोडल्यानंतर रोहित पवारांची पोस्ट, जशीच्या तशी 

सरकारने शेतकरी कर्जमाफी योजनेला ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर’ यांचं नाव दिलं परंतु अटीशर्ती टाकल्यामुळं बहुतांश शेतकरी कर्जमाफीच्या लाभापासून वंचित राहणार होते आणि हा एकप्रकारे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचाही अवमान आहे, ही गोष्ट पंढरपुरात अन्नत्याग आंदोलन सुरु करुन आम्ही सरकारच्या निदर्शनास आणून दिली. त्यावर सुरवातीला अटीशर्ती नाकारणारं सरकार आता या अटीशर्ती काढण्याबाबत तयार झालं, हे या आंदोलनाचं यश आहे.

मंत्री गिरीश महाजन साहेब यांनी पंढरपुरात आंदोलन स्थळी भेट देऊन इथूनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याशीही संपर्क साधून चर्चा केली आणि येत्या पावसाळी अधिवेशनापूर्वी म्हणजेच २२ जूनपूर्वी मुंबईत बैठक घेऊन कर्जमाफीतील या जाचक अटीशर्ती काढून टाकण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचं आश्वासन दिलं. त्यामुळं गेले तीन दिवस सुरु असलेलं अन्नत्याग आंदोलन तात्पुरतं स्थगित करण्यात आलं. महाराष्ट्रातील तमाम वारकऱ्यांचं श्रद्धास्थान असलेल्या नामदेव पायरीवर माझ्यासोबतचे सर्व उपोषणकर्ते, वारकरी, शेतकरी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते या सर्वांच्या उपस्थितीत महाआरती करुन उपोषणाची औपचारीक सांगता करण्यात आली.

शेतकऱ्यांची कर्जमाफी या विषयाकडे राजकारणाच्या पलिकडं बघितलं पाहिजे, अशी आमची भूमिका आहे. त्यामुळं अधिवेशनापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यासोबत आमची जी बैठक होणार आहे त्या शिष्टमंडळात मा. हर्षवर्धन सपकाळ साहेब, मा. राजू शेट्टी साहेब, मा. शशिकांत शिंदे साहेब, कॉ. अजित नवले साहेब, मा. वामनराव चटप साहेब, मा. महादेव जानकर साहेब, मा. प्रवीणदादा गायकवाड, मा. रविकांत तुपकर जी यांचा समावेश असणार आहे. हे अन्नदात्यासाठीचं आंदोलन असल्याने सरकारलाही एक संधी देणं महत्त्वाचं होतं. आंदोलन अधिक ताणून धरल्यानंतरही हाती काही लागलं नाही तर त्यामुळं व्यक्तीगत नाही तर राज्यातील शेतकऱ्यांचं नुकसान झालं असतं आणि ते आपल्याला होऊ द्यायचं नव्हतं, म्हणून हा निर्णय घेतला.

आता सरकारने विठुरायाच्या पवित्र भूमीत येऊन कर्जमाफी योजनेतील अटीशर्ती काढण्याचा शब्द दिल्याने ते दिलेला शब्द पाळतील आणि राज्यातील शेतकऱ्यांना न्याय देतील, अशी अपेक्षा आहे. परंतु मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत सकारात्मक निर्णय झाला नाही तर मात्र रस्त्यावरची मोठी लढाई लढणार, ही बाबही सरकारने लक्षात घ्यावी. या आंदोलनाला पाठिंबा दिलेले राज्यभरातील शेतकरी, महाविकास आघाडीतील सर्व घटकपक्ष, विविध संस्था, संघटना, प्रत्यक्ष येऊन भेटलेले नेते, फोनवरून आणि सोशल मिडियातून पाठींबा दिलेले सर्वजण तसंच माझ्या पाठिशी खंबीरपणे उभं राहिलेलं माझं कुटुंब या सर्वांचेच मनापासून आभार!