मुंबई: सोशल मीडियावर प्रंचड धुमाकूळ घालणाऱ्या कॉक्रोच जनता पार्टीचे कनेक्शन आम आदमी पक्षासोबत जोडलं जातं आहे. CJP पक्षाचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी याआधी आप पक्षासोबत काम पण केलं आहे, आप पक्षाला दिल्ली गमावल्यानंतर एकमेव सत्ता असलेलं पंजाब राज्य वाचवणं अतिशय गरजेचं आहे. भाजपने आपचे 7 खासदार फोडल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनाही मास्टरस्ट्रोक मारणं गरजेचं आहे. कुठेतरी सीजेआय यांच्या रिमार्कची संधी साधत या कॉक्रोच जनता पक्षाची निर्मिती होते आहे का? अभिजीत दीपके आणि आम आदमी पक्षाचं कनेक्शन नेमकं काय होतं समजून घेऊया.
ADVERTISEMENT
कोणत्याही पक्षाला निवडणुकीच्या रिंगणात उतरायचं असेल तर आधी त्या पक्षाची नोंदणी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे करावी लागते. त्यानंतरच तुम्हाला निवडणुकीत लढण्यासाठी चिन्हं मिळतं. मात्र अभिजीत दीपके यांनी अजून तरी असा कोणता निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे केवळ सोशल मीडियावर अकाऊंट्सने वातावरणनिर्मितीच होऊ शकते.
हे ही वाचा>> समजून घ्या: रूपया आपटला, EMI घेतलेल्यांची आता पार लागणार वाट?
आता ही वातावरणनिर्मिती होताना दीपके किंवा सीजेपीच्या अधिकृत हँडल्सवरून भाजपविरोधातच पोस्ट टाकलेल्या पाहायला मिळत आहेत, मग ही वातावरणनिर्मिती भाजपविरोधात करून कोणत्या एका विशिष्ट पक्षाला फायदा पोहोचवण्याचा हा प्रयत्न आहे का असा सूर सोशल मीडियावरच पाहायला मिळतो आहे. भाजपविरोधातल्या पक्षाचा फायदा म्हटल्यावर आपल्या समोर विरोधी पक्षांमधल्या अनेक पक्षांची नावं येतील. पण मग इथे अभिजीत यांची आम आदमी पक्षाची पार्श्वभूमी समजून घ्यायला हवी.
कॉक्रोच जनता पार्टीच्या संस्थापकाची नेमकी पार्श्वभूमी काय?
योगायोगाने दीपकेंची आताची चळवळ ही सोशल मीडियावर सुरू आहे आणि आम आदमी पक्षामध्येही त्यांनी पक्षाच्या सोशल मीडियासाठीच काम केलेलं. सोशल मीडिया आणि निवडणुकीच्या प्रचाराचं काम दीपके पाहायचे. 2020 ते 2023 दीपके आम आदमी पक्षासोबत काम करत होते. आम आदमी पक्षाचं दिल्लीमध्ये सरकार असताना आरोग्य आणि शिक्षण या क्षेत्रात काम करण्यावर सगळ्यात जास्त भर असायचा. फार क्वचित असे पक्ष आहेत जे आरोग्य-शिक्षण या विषयावर जोर देतात त्यामुळे त्यावर प्रभावित होऊन आपण आप पक्षासोबत काम करत होतो हे स्वत: अभिजीत दीपकेंनीच सांगितलं आहे.
पण त्यानंतर दीपकेंनी 2024 ला वैयक्तिक आयुष्य आणि शिक्षणाकडे लक्ष द्यायचं ठरवलं, त्यातून ते अमेरिकेतल्या बॉस्टनमध्ये शिक्षणासाठी गेले आणि आताही तिथेच आहेत. दीपकेंची राजकीयदृष्ट्या शेवटची पोस्ट मनीष सिसोदियांबाबतच होती, ज्यात त्यांच्यासोबतचा फोटो शेअर करून दीपके म्हणालेले की, तुम्ही मला दिलेल्या संधींबाबत मी आभारी आहे आणि आपसोबतच्या माझ्या संबंधांमध्ये कधी अंतर येणार नाही असं दीपके म्हणालेले. आताही ज्यावेळी सीजेपीची लोकप्रियता वाढली त्यावेळी आपचे मनीष सिसोदिया यांनी सीजेपीला पाठिंबा देण्याच्या दृष्टीने पोस्ट टाकली.
हे ही वाचा>> समजून घ्या: खिडक्या आणि डबे सगळंच बदललं, स्वयंचलित बंद दरवाजाची लोकल आहे तरी कशी?
त्यामुळे दीपके हे आपचेच प्रॉक्सी आहेत अशा दृष्टीने पाहिलं जात आहे. नीट पेपर फुटीप्रकरण उजेडात आलं त्यावेळी आपचे अरविंद केजरीवाल यांनी देशातल्या युवकांना रस्त्यावर उतरून रोष व्यक्त करण्याचं आवाहन केलेलं. याच दरम्यान सरन्यायाधीश सूर्यकांत यांचं बेरोजगार तरूण कॉक्रोचचं वक्तव्य आलं आणि उदय झाला कॉक्रोच जनता पार्टीचा. हा सगळा दिसायला योगायोग असला तरी यामागे आपने संधी साधून अभिजीत दीपकेंच्या रूपाने प्रॉक्सी उभा केला आहे असे आरोप होत आहेत. याच आरोपांवरून काहींनी दीपकेंना-सीजेपीला अनफॉलो करायलाही सुरूवात केली आणि त्यांचे आपसोबतचे संबंध असल्याने अनफॉलो करतोय असंही काही सोशल इंन्फ्लूएंर्सस रिल्समार्फत सांगत आहे.
काही गोष्टी स्पष्ट आहेत. अभिजीत दीपके आपसोबत जोडले होते का तर हो. आपची विचारसरणी पटते का... तर हो.. आप पक्ष भाजपसमोर कमजोर झालाय का तर हो. मग आताही दीपकेंच्या मागे आपच आहे का... तर याच ठोस उत्तर देता येणार नाही कारण तसे कोणतेच पुरावे समोर नाही, दीपकेंनीही हे आरोप फेटाळले आहेत.
आम आदमी पक्षाची सत्ता दिल्ली आणि पंजाब या दोन राज्यात, त्यात दिल्ली हातून गेलं. आता पंजाबच्या विधानसभा निवडणुकाही 7-8 महिन्यांवर आहेत. पक्ष थेट भिडला तर नेत्यांच्या फोडाफोडीचं राजकारण आणि तपास यंत्रणांच्या कारवाया कशा निवडणुकांच्या तोंडावर होतात हे आम आदमी पक्ष चांगलाच भोगून आहे. अशात वातावरणनिर्मितीसाठी हा थर्ड पार्टी सपोर्ट उभा केला जात आहे का? अशी चर्चा सध्या सुरू आहे.
ADVERTISEMENT











