समजून घ्या: रूपया आपटला, EMI घेतलेल्यांची आता पार लागणार वाट?
डॉलरच्या तुलनेत रुपयाची दिवसेंदिवस घसरण होत आहे. याचा थेट परिणाम हा आता सर्वसामान्य भारतीयांवर होणार आहे. कारण या सगळ्यामुळे गृहकर्ज अधिक महागण्याची शक्यता आहे.
ADVERTISEMENT

मुंबई: अमेरिका-इराण युद्ध सुरू झाल्यापासून रुपया आतापर्यंत 6 टक्क्यांनी घसरला आहे. त्यामुळे आता रुपया कोणत्याही क्षणी शंभरीत जाईल. यामागे मुख्य कारणं म्हणजे वाढते कच्च्या तेलाचे दर, परदेशी गुंतवणूकदारांचा पैसा बाहेर जाणं आणि जागतिक अनिश्चितता. पण रुपयाची घसरण आता फक्त चलनाची गोष्ट राहिलेली नाही. तिचा परिणाम आता तुमचं घरगुती बजेट, गृहकर्जाचे EMI आणि भारतात घर घेण्याच्या एकूण खर्चावरही होऊ शकतो.
पश्चिम आशियातील युद्ध स्थिती आणि नुकसानामुळे कच्च्या तेलाचे दर झपाट्याने वाढले. त्यामुळे साहजिकच महागाई, भारताचा आयात खर्च आणि मोठ्या आर्थिक संकटाबाबत चिंता वाढली आहे. वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी गुरुवारी सांगितले की, रुपयाच्या घसरणीचा सामना करण्यासाठी सरकार अनेक उपायांवर विचार करत आहे. “आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत आणि अनेक उपायांवर विचार सुरू आहे. जागतिक परिस्थिती खूपच आव्हानात्मक आहे,” असं गोयल म्हणाले.
मग आता या सगळ्याचा तुमच्यावर थेट परिणाम कसा होणार? खास करून घर घेणं, त्यासाठी कर्ज काढणं किंवा EMI भरण्याच्या प्रक्रियेत तुम्ही असाल तर....
• कमजोर रुपयाचा गृहकर्जांवर कसा परिणाम होऊ शकतो?
- रुपया आणि गृहकर्ज यांचा काही संबंध नसल्यासारखं काहींना वाटू शकतं. पण अर्थतज्ज्ञांच्या मते हा संबंध महागाई आणि व्याजदरांमधून येतो.
- कच्चं तेल महाग त्यात रुपया कमजोर झाला की आयात महाग होते. त्यामुळे इंधनाचे दर वाढतात, वाहतूक खर्च वाढतो आणि वस्तू व सेवांच्या किंमती वाढू लागतात.
- यामुळे अर्थव्यवस्थेत महागाईचं संकट तयार होतं.
- जर महागाई दीर्घकाळ जास्त राहिली, तर ती नियंत्रणात आणण्यासाठी आणि किंमती स्थिर ठेवण्यासाठी RBI ला रेपो दर वाढवावे लागू शकतात. रेपो दर म्हणजे RBI बँकांना ज्या दराने कर्ज देते तो दर.
- रेपो दर वाढले की बँकाही कर्जावरील व्याजदर वाढवतात. त्यामुळे गृहकर्जांचे EMI वाढतात.
- सोप्या भाषेत सांगायचं तर:
- कमजोर रुपया → आयातीतून वाढणारी महागाई → RBI कडून संभाव्य दरवाढ → गृहकर्ज महाग
RBI कडून पुन्हा होऊ शकते दरवाढ
Standard Chartered मधील अर्थतज्ज्ञांच्या मते, कच्च्या तेलाचे वाढते दर आणि रुपयातील कमजोरीमुळे वाढणाऱ्या महागाईच्या धोक्यामुळे RBI लवकरच व्याजदर वाढवू शकते. हे सगळं कधीपासून होऊ शकतं? तर स्टँडर्ड चार्टर्डचे अर्थतज्ज्ञ अनभूती सहाय आणि सौरव आनंद यांनी म्हटलं आहे की, RBI जूनपासूनच दरवाढ सुरू करू शकते.









