मुंबई: पांढऱ्या पट्टीचा वाद आता दादरपर्यंत येऊन पोहोचला आहे. दादरमधील एका जैन मंदिराबाहेर पांढरी पट्टी मारण्यात आली होती. त्यानंतर मनसेकडून इशारा देण्यात आला होता की दुपारी तीन वाजेपर्यंत ही पट्टी हटवली नाही तर पक्ष आपल्या पद्धतीने उत्तर देईल. त्यानंतर बीएमसी आणि संबंधित यंत्रणांनी ती पट्टी हटवून त्या ठिकाणी वेगळा रंग दिला आहे.
ADVERTISEMENT
या संपूर्ण प्रकरणाबाबत मनसेची भूमिका जाणून घेण्यासाठी आम्ही मनसे नेते संदीप देशपांडे यांच्याशी संवाद साधला.
मनसेचे संदीप देशपांडे संतापले
यावेळी संदीप देशपांडे म्हणाले, "आमचा पांढऱ्या रंगाला विरोध नाही. विरोध या गोष्टीला आहे की हा सार्वजनिक रस्ता आहे. उद्या कोणाला वाटेल हिरवी पट्टी मारावी, कोणाला वाटेल पिवळी पट्टी मारावी, तर कोणाला भगवी पट्टी मारावी. सार्वजनिक मालमत्ता ही सर्वांची असते, कोणाच्या एकट्याच्या मालकीची नसते. त्यामुळे तिचा वापर सार्वजनिक हितासाठी आणि नियमांनुसारच झाला पाहिजे. एखाद्या व्यक्तीच्या किंवा एका धर्माच्या इच्छेनुसार सार्वजनिक जागेचा वापर होऊ शकत नाही. आमचा आक्षेप या नियमबाह्य प्रकाराला आहे."
हे ही वाचा>> जैन मुनींसाठी पांढरी पट्टी, वाद विकोपाला; दोन्ही पक्ष समोरासमोर, पाहा व्हिडीओ
जैन समाजातील काही प्रतिनिधींनी मनसेच्या भूमिकेवर टीका केली असून, त्यामध्ये निलेशचंद्र मुनी यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. याबाबत विचारले असता संदीप देशपांडे म्हणाले, "मी जे बोलतोय ते या देशाचा कायदा सांगतो. बाकी कुणी शहाणपणा करण्याची गरज नाही. मुंबईत राहायचे असेल तर इथले नियम आणि कायदे पाळावे लागतील."
त्यांना विचारण्यात आले की जैन समाज शांतताप्रिय आहे, मग त्यांच्या विरोधात आंदोलन का केले जाते? त्यावर ते म्हणाले, "विषय हा शांत समाज आहे की गोंधळ करणारा समाज, हा नाही. विषय आहे कायदा काय सांगतो. रस्त्यावर पट्टी मारण्याची परवानगी आहे का? नाही. मग एवढाच प्रश्न आहे."
हे ही वाचा>> 'राज ठाकरे तुझे विचार माझ्या पायाच्या बुटाच्या धुळीबरोबर आहेत...', सदावर्ते हे काय बोलून गेले?
मनसेवर असा आरोपही केला जातो की ते काही विशिष्ट मुद्द्यांवरच आंदोलन करतात. त्यावर संदीप देशपांडे म्हणाले, "भोंग्यांच्या विरोधात आंदोलन आम्हीच केले होते. तेव्हा देखील आम्ही नियमांनुसार वागण्याचीच भूमिका घेतली होती. आजही आम्ही तेच सांगत आहोत."
सात जून रोजी केलेल्या एका ट्वीटमध्ये संदीप देशपांडे यांनी या प्रकाराला "सांस्कृतिक दहशतवाद" असे म्हटले होते. याबाबत त्यांनी स्पष्टीकरण देताना सांगितले, "इतकी वर्षे कधी गरज वाटली नाही आणि आता अचानक पट्ट्या मारून एखाद्या भागावर आपली छाप निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. हा रस्ता आमचा आहे, ही मुंबई आमची आहे, असा संदेश देण्याचा प्रयत्न होत असेल तर तो सांस्कृतिक दहशतवादच आहे."
जैन समाजाकडून असा दावा करण्यात आला की पावसाळ्यात रस्त्यावर शेवाळ येते आणि जीवहिंसा टाळण्यासाठी ही पट्टी मारली जाते. त्यावर देशपांडे यांनी तीव्र प्रतिक्रिया देत म्हटले, "पांढरी पट्टी मारली म्हणजे शेवाळ येत नाही, असे कोणते विज्ञान सांगते? अशा प्रकारच्या युक्तिवादांना उत्तर देण्यात अर्थ नाही."
मनसेची पुढील भूमिका काय असेल, असे विचारले असता ते म्हणाले, "कुठल्याही प्रकारच्या सांस्कृतिक दहशतवादाला आमचा विरोध होता, आहे आणि राहणार आहे. नियम सर्वांसाठी सारखेच असले पाहिजेत."
भाजपने देखील या विषयावर भूमिका घ्यावी का, या प्रश्नावर ते म्हणाले, "जर ते स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवत असतील तर त्यांनीही याचा विरोध करायला हवा. मात्र मतांच्या राजकारणामुळे ते तसे करत नसावेत."
शेवटी, जैन समाजातील काही लोकांचे म्हणणे होते की आधी सूचना दिली असती तर पट्टी मारलीच नसती किंवा ती हटवली असती. त्यावर संदीप देशपांडे म्हणाले, "प्रत्येक गोष्टीसाठी कुणीतरी सांगण्याची गरज नसते. सार्वजनिक रस्त्यावर काय करायचे आणि काय करायचे नाही, याची जाणीव प्रत्येकाला असली पाहिजे."
सध्या त्या ठिकाणी पांढऱ्या पट्टीवर ग्रे रंग देण्यात आला असून, त्यामुळे हा वाद तात्पुरता शमल्याचे दिसत आहे. मात्र या विषयावरील राजकीय आणि सामाजिक चर्चा अद्याप सुरूच आहेत. त्यामुळे हा वाद खरोखरच संपला आहे का, हा प्रश्न अद्याप अनुत्तरितच आहे.
ADVERTISEMENT











