Maharashtra politics : अजित पवारांनी घेतली शपथ, शरद पवारांनी मानले नरेंद्र मोदींचे आभार

मुंबई तक

02 Jul 2023 (अपडेटेड: 02 Jul 2023, 12:11 PM)

शरद पवारांनी अजित पवारांसह काही नेत्यांचा शपथ विधी पार पडल्यानंतर त्यांची भूमिका मांडली. यावेळी पवारांनी थेट पंतप्रधान मोदींचे आभार मानले.

latest political news maharashtra : sharad pawar rection on ajit pawar oath ceremony

latest political news maharashtra : sharad pawar rection on ajit pawar oath ceremony

follow google news

Maharashtra Politics News Today : अजित पवारांनी रविवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना धक्का दिला. अजित पवारांसह काही ज्येष्ठ नेत्यांनी भाजप-शिवसेना युती सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. शरद पवारांनी अजित पवारांसह काही नेत्यांचा शपथ विधी पार पडल्यानंतर त्यांची भूमिका मांडली. यावेळी पवारांनी थेट पंतप्रधान मोदींचे आभार मानले. पवार नेमकं काय म्हणाले? ते बघा… (what said Sharad Pawar After Ajit Pawar took oath as chief Minister of Maharashtra)

हे वाचलं का?

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, “देशाच्या पंतप्रधानांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबद्दल एक विधान केलं होतं. त्या विधानामध्ये पंतप्रधानांनी (नरेंद्र मोदी) दोन गोष्टी सांगितल्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भ्रष्टाचारामध्ये सापडलेला पक्ष आहे. हे सांगत असताना त्यांनी राज्य सहकारी बँकेचा उल्लेख केला. त्याचबरोबर सिंचनामध्ये जी तक्रार होती, त्याचा उल्लेख त्यांनी केला होता.”

मी पंतप्रधानांचा आभारी -शरद पवार

पवार यांनी याच मुद्द्यावर पुढे बोलताना सांगितलं की, “हा जो उल्लेख त्यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या भ्रष्टाचारात सहभागी आहे, असा आरोप त्यांनी केला. मला आनंद आहे की, आज मंत्रिमंडळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या काही सहकाऱ्यांना त्यांनी शपथ दिली, याचा अर्थ त्यासंबंधीचे त्यांनी केलेले आरोप हे वास्तव नव्हते. त्या सगळ्या आरोपातून पक्षाला आणि ज्यांच्याबद्दल त्यांनी आरोप केलेले होते, त्या सगळ्यांना मुक्त केलं. त्याबद्दल मी पहिल्यांदा पंतप्रधानांचा आभारी आहे.”

वाचा >> NCP चे 70 हजार कोटींचे घोटाळे, सुप्रिया सुळे…, PM मोदींचा शरद पवारांवर पहिला ‘वार’

“आमच्या काही सहकाऱ्यांनी जी पक्षाची भूमिका आहे, त्यापेक्षा वेगळी भूमिका घेतली. 6 तारखेला मी महाराष्ट्रातील पक्षाच्या काही प्रमुख लोकांची बैठक बोलावली होती. त्या बैठकीत काही प्रश्न उपस्थित केले गेले होते. संघटनात्मक बदल करण्यासंबंधीचे त्यावर विचार करणार होतो. पण, प्रश्न उपस्थित केले गेले होते, त्यापूर्वीच काही सहकाऱ्यांनी पक्षापासून एकदम वेगळी भूमिका घेतली. आम्हीच पक्ष आहोत, अशी भूमिका त्यांनी मांडली”, असं शरद पवार यांनी यावेळी सांगितलं.

मी आताच काही बोलू इच्छित नाही -शरद पवार

“पक्षातील काही सदस्यांनी कितपत वेगळी भूमिका घेतली, यासंबंधीचं चित्र आणखी दोन तीन दिवसांत लोकांच्या समोर येईल. त्याचं कारण ज्यांची नावं आली, त्यातील काही लोकांनी आजच माझ्याशी संपर्क केला. आम्हाला निमंत्रित करून आमच्या सह्या घेतल्या. पण, आमची भूमिका वेगळी आहे, ती कायम आहे, याचा खुलासा त्यांनी माझ्याकडे केला आहे. याबाबतीत मी आताच काही बोलू इच्छित नाही”, असं शरद पवार म्हणाले.

वाचा >> Ajit Pawar : “…म्हणून आम्ही शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झालो”

“याबद्दल त्यांनी माझ्याबरोबरच जनतेच्या समोर स्पष्ट चित्र मांडण्याची गरज आहे. ते जर त्यांनी मांडलं, तर माझा विश्वास बसेल. मांडलं नाही, तर त्यांनी वेगळी भूमिका घेतली, असा निष्कर्ष मी काढेन”, असा इशाराही शरद पवारांनी अजित पवारांसोबत गेलेल्या नेत्यांना दिला.

नरेंद्र मोदींनी राष्ट्रवादीवर काय केले होते आरोप?

भोपाळमध्ये झालेल्या भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की, “राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल सांगायचं, तर एनसीपी’ वरही जवळपास 70 हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप आहे. महाराष्ट्र शिखर बँक घोटाळा, सिंचन घोटाळा, अवैध उत्खनन घोटाळा.. यांची यादीही खूप मोठी आहे. या पक्षाच्या घोटाळ्यांचे मीटर डाऊन होतच नाही.” पंतप्रधान मोदी असंही म्हणाले होते की, “तुम्हाला शरद पवारांच्या मुलींचं भलं करायचं असेल, तर राष्ट्रवादी काँग्रेसला मत द्या. पण, जर तुम्हाला तुमच्या मुलाचा, मुलीचा, नातंवडांचं कल्याण करायचं असेल, तर भाजपला मत द्या.”

    follow whatsapp