नवी दिल्ली: 'राष्ट्रवादी काँग्रेसचं नेतृत्व हे आधी अजित पवारांकडे होतं आणि आता ते सुनेत्रा पवारांकडे आहे. तसंच प्रफुल पटेल यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे. त्यामुळे मला असं वाटत नाही की, त्यांच्याकडून शरद पवारांच्या NCP ला विलिनीकरणासाठी आमंत्रित केलं जाईल. कारण त्यांनी (शरद पवारांच्या NCP ने) जनतेचा विश्वास गमावला आहे.' असं अत्यंत खळबळजनक विधान एका ज्येष्ठ भाजप मंत्र्याने केलं आहे. ज्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.
ADVERTISEMENT
प्रफुल पटेल यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती झाली असून ते शरद पवारांच्या NCP सोबत विलिनीकरण करणार नाही.. असं विधान करणारे भाजपचे हे नेते आहेत पियुष गोयल. केंद्रातील राजकारणात भाजपमधील वरिष्ठ नेत्यांमध्ये पियुष गोयल यांचा समावेश होतो. त्यामुळेच त्यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत केलेल्या या विधानावरून आता महाराष्ट्रातील राजकारण पुन्हा एकदा तापलं आहे.
नेमकं काय म्हणाले पियुष गोयल?
केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना मुलाखतीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन्ही गटांमध्ये विलीनीकरणाबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी आपल्याला असं काही होईल असं वाटत नसल्याचं म्हटलं होतं. एका गटाचे नेतृत्व अजित पवार करत होते आणि दुसऱ्या गटाचे नेतृत्व त्यांचे काका शरद पवार करत होते. अजित पवार यांचे दोन दिवसांपूर्वी विमान अपघातात निधन झाले. त्यामुळे दोन्ही पक्षाच्या विलिनीकरणाच्या चर्चांना अचानक ब्रेक लागला.
हे ही वाचा>> 'पार्थ पवारांनी सुनेत्रा पवारांच्या शपथविधीला येऊ नये', भाजपकडून स्पष्ट संदेश.. बारामतीलाच का थांबले पार्थ पवार?
पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत गोयल म्हणाले, "NCP च्या विलिनीकरणाबाबत वैयक्तिकरित्या, मला असे होताना दिसत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्व पूर्वी अजित पवारांकडे होते आणि आता ते सुनेत्रा पवारांकडे आहे. प्रफुल पटेल यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे मला वाटत नाही की शरद पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामील होण्यासाठी आमंत्रित केले जाईल कारण त्यांनी जनतेचा विश्वास गमावला आहे."
पिंपरी चिंचवड आणि पुण्यात एकत्रित येऊनही त्यांच्या सुफडा साफ झाला. अजित पवार महायुतीसोबत आले असते तर पिंपरी चिंचवड आणि पुण्याच्या विजयाचा ते भाग असते. शरद पवारांसोबत युती करणं ही मोठी चूक होती, आता त्यांच्या पक्षाच्या नेत्यांना हे समजलं आहे.
'राष्ट्रवादी काँग्रेसबाबत जाणीवपूर्वक खोट्या बातम्या पसरवण्याचं काम सुरु', पियुष गोयलांच्या विधानावर मिटकरी संतापले
पियुष गोयल यांच्या या वक्तव्यानंतर आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. आमदार अमोल मिटकरी यांनी पोस्ट लिहीत म्हटलं आहे की राष्ट्रवादी काँग्रेसबाबत जाणीवपूर्वक खोट्या बातम्या पसरवण्याचं काम सुरु आहे. अध्यक्षपदासंदर्भात कोणताही निर्णय झालेला नसताना अफवा पसरवणं हे राजकीय हेतूने केलं जात आहे. जनता आणि कार्यकर्त्यांनी अशा बातम्यांवर विश्वास ठेवू नये.
हे ही वाचा>> 'हे ढेकणं आणि गिधाडं सुनेत्रा पवारांचा घात करू शकतात..', मनोज जरांगे थेट बोलून गेले!
पाहा राष्ट्रीय अध्यक्ष पदाबाबत प्रफुल पटेल काय म्हणाले
दरम्यान या चर्चांनंतर प्रफुल पटेल यांनी समोर येत या सगळ्यावर स्पष्टीकरण दिलं आहे. पटेल यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, माझी राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली अशा बातम्या प्रसारीत होत असल्याचं निदर्शनास आलं. मी हे स्पष्ट करु इच्छीतो की हे रिपोर्ट निराधार आणि असत्य आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा लोकशाही पक्ष आहे. हा महत्त्वाचा निर्णय आमचे वरिष्ठ नेते, आमदार पक्षाचे पदाधिकारी आणि पक्षाच्या सदस्यांच्या भावना आणि इच्छा लक्षात घेऊन घेण्यात येईल. राष्ट्रीय पक्ष असल्याने या प्रकरणात आम्ही विहीत प्रक्रिया पार पाडू.
'अस्सल मराठमोळ्या मातीतला, रांगड्या पक्षाचा अध्यक्ष हा कोणीही मराठी असावा, पाटील असावा पण पटेल नाही!', राज ठाकरेंची बोचरी टीका
दरम्यान कालच्या दिवसभराच्या घडामोडींवर राज ठाकरेंनी भाष्य केलं होतं. त्याचबरोबर राष्ट्रवादीच्या अध्यक्ष पदावर देखील भाष्य केलं होतं. राज ठाकरे यांनी पोस्टमध्य म्हटलं होत की, 'महाराष्ट्राच्या राजकारणाचा गेल्या काही काळात पार विचका झाला आहे त्यावर खरंतर भाष्य पण करावं असं वाटत नाही. पण तरीही आज दिवसभर ज्या घडामोडी सुरु आहेत. त्यावर बोलावंच लागेल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासारख्या अस्सल मराठमोळ्या मातीतला, आणि रांगड्या पक्षाचा अध्यक्ष हा कोणीही मराठी असावा, पाटील असावा पण पटेल नाही!
'आता विलिनीकरणात अडथळा', शरद पवारांनाही बोलून दाखवली ती भीती
शरद पवार यांनी शनिवारी स्वतः सांगितलेलं की, 'अजित पवार यांच्या निधनामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार) यांच्यातील विलीनीकरण प्रक्रियेत आता अडथळा येऊ शकतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (राष्ट्रवादी) पक्षाचे प्रमुख आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे 28 जानेवारी रोजी बारामती येथे विमान अपघातात निधन झाले.
राष्ट्रवादी काँग्रेस (सपा) पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी बारामती येथे पत्रकारांना सांगितले होते की, ''अजित पवार आणि जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालील दोन्ही गटांचे विलीनीकरण करण्याची प्रक्रिया गेल्या चार महिन्यांपासून सुरू होती. सर्व चर्चा त्यांच्या पातळीवर झाल्या, परंतु आता असे दिसते की विमान अपघातामुळे या प्रक्रियेत अडथळा येऊ शकते. चर्चा सकारात्मक दिशेने सुरू होती, परंतु अपघाताचा प्रक्रियेवर गंभीर परिणाम झाला."
ADVERTISEMENT











