अजित पवारांमुळे बंड करणाऱ्या शिवसेनेच्या आमदारांना आता ‘दादा’च हवेत!

रोहित गोळे

18 Apr 2023 (अपडेटेड: 18 Apr 2023, 01:47 PM)

Shiv Snea and Ajit Pawar: अजित पवार हे सोबत आले तर त्यांचं स्वागत केलं जाईल असं शिवसेनेनं जाहीर केलं आहे. मात्र ९ महिन्यांपूर्वी याच अजित पवारांवर शिंदे गटाकडून टीका केली जात होती.

shiv sena mlas who rebelled because of ajit pawar now want ajitdada to join the bjp

shiv sena mlas who rebelled because of ajit pawar now want ajitdada to join the bjp

follow google news

मुंबई: साधारण वर्षभरापूर्वी राज्यात अचानक एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी 40 आमदारांसह शिवसेनेत (Shiv sena) बंडाचं निशाण फडकवलं. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी हिंदुत्व गुंडाळून फक्त सत्तेसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी (NCP) आघाडी केली आणि हीच गोष्ट आपल्याला बोचत असून आपण सत्तेतून बाहेर पडत असल्याचं शिंदे गटाने सुरुवातीला सांगितलं होतं. त्यानंतर काही दिवसांनी आपण अजित पवारांमुळे (Ajit Pawar) बाहेर पडत आहोत असंही शिंदे गटाने सांगितलं होतं. मात्र, असताना आता अचानक 9 महिन्यांनतर याच शिवसेनेच्या आमदारांना अजितदादाच आपल्या सत्तेत हवे आहेत.. आता शिवसेनेच्या आमदारांमध्ये हा बदल कसा झाला आणि यामागे नेमकं काय राजकारण आहे. हे आपण सविस्तर जाणून घेऊया. (shiv sena mlas who rebelled because of ajit pawar now want ajitdada to join the bjp)

हे वाचलं का?

शिंदे गटाला आधी नकोसे झालेले अजित पवार

एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंविरोधात बंड करताना सुरुवातीला अजित पवार यांना टार्गेट केलं होतं. एकनाथ शिंदेंनी असा दावा केला होता की, त्यांच्यासोबतच्या अनेक आमदारांची अशी तक्रार आहे की, ‘उद्धव ठाकरे जरी मुख्यमंत्री असले तरी सत्ता ही अजित पवारच राबवत होते. महत्त्वाचे निर्णय हे अजित पवार हेच घेतात. तसंच अर्थमंत्री असल्याने फंड कोणाला द्यायचा हे त्यांच्याच अधिकारात आहे. त्यामुळे ते सर्वाधिक फंड हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनाच देतात. शिवसेनेला सर्वात कमी फंड मिळतो.’ अशी तक्रार करत शिंदे गटाने अजित पवारांनाही बंडासाठी जबाबदार धरलं होतं.

हे ही वाचा>> हत्येपूर्वी अशरफने नाव घेतलेल्या गुड्डू मुस्लिमला नाशिकमधून अटक, सत्य काय?

अजित पवार हे अनेक कामं अडकवून ठेवत असल्याची तक्रारही शिवसेना आमदारांनी त्यावेळी केली होती. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार हे बंड केलेल्या आमदारांना नकोसे झाले होते. त्यावेळी अजित पवारांवर शिंदे गटाकडून बरीच टीकाही केली गेली होती.

शिवसेनेला आता ‘अजितदादा’च हवेत!

दरम्यान, आता काही दिवसांपासून अजित पवार हे भाजपसोबत येणार असल्याची चर्चा सुरू झाल्यानंतर राजकीय गणितं बदलली आहेत. भाजपचे अनेक नेते अजित पवारांबाबत अनुकूल असल्याचं दिसून येताच शिंदे गटाकडून देखील तात्काळ पत्रकार परिषद घेऊन अजित पवार हे युतीच्या सरकारमध्ये आल्यास त्यांचे स्वागतच होईल असं सांगत आहे.

शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी आज (18 एप्रिल) पत्रकार परिषद घेऊन अजित पवारांबाबतची शिवसेनेची काय भूमिका असेल हे स्पष्ट केलं. पाहा यावेळी संजय शिरसाट नेमकं काय म्हणाले:

‘अजित पवारांचं आम्ही स्वागतच करू….’

‘महाविकास आघाडीत बेबनाव आहे. त्यामुळे या आघाडीची बिघाडी होत आहे. आतापर्यंत अजितदादा त्यावर काही बोलले नाहीत, भाष्य केलं नाही.. याचा अर्थ तुम्ही समजून घ्या की, त्यांना आता राष्ट्रवादीमध्ये राहायचं नाही. म्हणून जर अजितदादांनी राष्ट्रवादी सोडली, तर आम्ही त्यांचं निश्चित स्वागत करू.. परंतु ते राष्ट्रवादीसहित.. म्हणजे राष्ट्रवादी हे भाजपसोबत जाण्याबाबत काही लोकांचा कयास आहे तो अत्यंत चुकीचा आहे.’

हे ही वाचा>> अतिक आणि अशरफवर गोळ्या झाडणारा शुटर अरुण उर्फ कालिया कोण आहे?

‘अजितदादांनी राष्ट्रवादी सोडली तर आम्ही त्यांचं स्वागत करू. अनेक पक्षात असं होतं… आमच्याबाबत देखील आमचा तोच अनुभव आहे. आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला का सोडलं? आम्ही आघाडी का सोडली? कारण आम्हाला काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत राहायचं नाही. तिकडचा असणारा नेता तो ज्या काही पद्धतीने कारभार करतो. आज अजितदादांना मोकळीक नाही असं माझं मत आहे. त्यामुळे जर त्यांनी राष्ट्रवादी सोडली तर आम्ही त्यांचं स्वागत करू. नाहीतर आम्ही सत्तेमध्ये राहणार नाही. राष्ट्रवादी सोडल्यानंतर अजित पवार भाजपमध्ये गेले तर त्यांचं स्वागत आहे. आमच्याकडे आले तरी स्वागत आहे.’

‘अजित पवार यांचं नेतृत्व कोणी तरी दुसरं करत होतं. अजित पवारांनी जी सकाळची शपथ घेतली त्याचं नेतृत्व ते स्वत: करत होते का? त्यांचं नेतृत्व कोण करत होतं.. तर वरिष्ठ करत होते. वरिष्ठांच्या सांगण्यावरून त्यांनी इतरांना त्रास दिला. एकनाथ शिंदे यांच्याकडे तेव्हा यूडी खातं होतं. त्यांना त्रास कोण देत होतं.. तर त्यांचे वरिष्ठ देत होते.’

‘आता जर अजित पवार स्वतंत्र झाले तर त्यांची भूमिका बदलेल. जर त्यांना भाजप-शिवसेनेच्या विचारधारेशी जोडायचं असेल. विचार मान्य असेल तर त्यांचं स्वागत आहे.’

‘अजित पवार नव्हे तर काँग्रेसमध्ये देखील हीच अवस्था सुरु आहे. त्यातील अनेक आमदारांना वाटतं की आघाडीमध्ये राहू नये. 15 आमदार असलेला पक्ष 40-45 जणांचं नेतृत्व करायला लागला. तर त्यांना मान्य नाही.. म्हणून ते सुद्धा याच मार्गावर आहेत.’

‘आम्ही उठाव केला तेव्हा आमची भूमिका स्पष्ट होती की, आम्हाला काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत राहायचं नाही. म्हणून आम्ही वेगळे झालो. वेगळं होताना आम्ही आमचं अस्तित्व ठेवलं. जर उद्या अजित पवार राष्ट्रवादीपासून वेगळे होत असतील त्यांचं स्वत:चं अस्तित्व ठेवत असतील त्यांचं स्वागत करायला हरकत नाही.’

हे ही वाचा>> BJP: ‘जीवात जीव असेपर्यंत मी..’ अजित पवारांकडून एक घाव दोन तुकडे!

‘त्यांनी काय नाव लावायचं ते आज ठरू शकत नाही. पण एकदा त्यांची भूमिका ठरू द्या. आज आपण या ज्या काही चर्चा करतोय त्या फक्त सुप्रीम कोर्ट किंवा अजित पवार यांचं काय मत आहे जे आता त्यांनी कुठेही व्यक्त केलेलं नाही. एकदा त्यांचं मत व्यक्त झालं तर मग त्यावर प्रतिक्रिया देऊ.’

‘अजित पवार हे ताकदवान नेते आहेत. कोणाला उगाच बदनाम करणं हा आमचा हेतू नाही. पण तो जर कोणाच्या दबावाखाली काम करत असेल पण आता तो दबाव झुगारत असतील आणि पुन्हा आमच्या बरोबर येत असतील राष्ट्रवादी सोडून तर त्यांचं स्वागतच आहे.’

‘आमची शिवसेना-भाजपची विचारधारा त्यांना मान्य असेल तर आम्ही त्यांच्यासोबत सत्तेत राहू. राष्ट्रवादी हा शरद पवारांनी स्थापन केलेला पक्ष आहे आणि त्याचे हे सर्व सदस्य आहेत. म्हणून आता त्या पक्षातील अस्वस्थता आता बाहेर पडू लागली आहे. त्याचा परिणाम १-२ दिवसात दिसून येईल. राजकारणात निर्णय घ्यायला धाडस लागतं. त्यासाठी वेळेची वाट पाहावी लागत नाही.’

‘सुप्रीम कोर्टाचा निकाल आल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार होईल. तसंच अजित पवार आमच्यासोबत आल्यानंतर शिवसेनेच्या ताकदीवर कुठेही परिणाम होणार नाही. आम्ही आमच्या ताकदीने लढणार आहोत.. ते त्यांच्या ताकदीने लढतील. जर ते आले तर.. कारण त्यांचं तळ्यात मळ्यात आहे. म्हणून त्यावर आज भाष्य करणं योग्य नाही. पण जर ते आले आमच्यासोबत तर त्याबद्दलची स्ट्रॅटेजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ठरवतील.’

‘सुप्रीम कोर्टाचा निकाल लागू द्या.. तुम्हाला मोठा भूकंप झालेला दिसेल.. प्रकाश आंबेडकर दोन भूकंप करणार आहेत.. आम्ही तिसरा करू. येणारी जी काही लोकसभेची निवडणूक आहे ती मोदी साहेबांच्या नेतृत्वात जिंकणार आहे. तसेच विधानसभेत देखील सेना-भाजपचं सरकार येईल. त्यामुळे आमच्यापासून कोणीही दूर जायच्या मनस्थितीत नाही. सर्वजण मिळून आपण सत्ता आणू असा सगळ्यांचा आग्रह आहे. त्या पद्धतीने अनेक आमदार जे इतर पक्षातील आहेत ते आमच्या बरोबर येतील. सुप्रीम कोर्टाचा जेव्हा निकाल लागेल तेव्हा फार मोठी उलथापालथ होईल.’ असं संजय शिरसाट यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं.

याचाच अर्थ अगदी ९ महिन्यांपूर्वीच जे अजित पवार शिंदे गटाला नकोसे झाले होते तेच अजित पवार आता आपली सत्ता भक्कम करण्यासाठी हवे आहेत.

    follow whatsapp