Shivraj Patil Passes Away : माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर (Shivraj Patil Passes Away) यांचे वयाच्या 90व्या वर्षी निधन झाले. लातूर येथील त्यांच्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. काही दिवसांपासून ते तब्येत बिघडल्याने उपचार घेत होते. आयुष्यभर काँग्रेस पक्षात सक्रिय राहिल्यानंतर गेल्या काही वर्षांपासून त्यांनी सार्वजनिक जीवनापासून दूर राहणे पसंत केले होते. स्वच्छ प्रतिमा, सखोल अभ्यास आणि शांत कार्यशैली असलेले राजकारणी म्हणून त्यांची ख्याती होती.
ADVERTISEMENT
कोण होते शिवराज पाटील चाकूरकर?
भारतीय राजकारणातील अनुभवी आणि प्रभावी नेते म्हणून ओळखले जाणारे शिवराज पाटील (जन्म: 12 ऑक्टोबर 1935) यांचा जन्म लातूर जिल्ह्यातील चाकूर येथे झाला. उस्मानिया विद्यापीठातून विज्ञान शाखेची पदवी आणि मुंबई विद्यापीठातून कायद्याचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी 1967 ते 1969 या काळात लातूर नगरपालिकेत काम करत आपल्या राजकीय वाटचालीची सुरुवात केली.
1980 साली ते प्रथमच लातूर लोकसभा मतदारसंघातून निवडून आले आणि त्यानंतर 1999 पर्यंत सलग सात वेळा विजय मिळवत संसदेत आपले मजबूत स्थान निर्माण केले. इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी संरक्षण राज्यमंत्री, वाणिज्य, विज्ञान-तंत्रज्ञान, अणुऊर्जा, इलेक्ट्रॉनिक्स आणि अवकाश विभागांसारख्या अनेक महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी सांभाळली. 1991 ते 1996 या कालावधीत त्यांनी देशाचे दहावे लोकसभा अध्यक्ष म्हणून कार्यभार सांभाळला. संसदेचे संगणकीकरण, कामकाजाचे थेट प्रक्षेपण, नवी ग्रंथालय इमारत अशा अनेक उपक्रमांना त्यांनी चालना दिली. आंतरराष्ट्रीय संसदीय परिषदांमध्ये भारताचे प्रतिनिधित्वही त्यांनी बजावले.
सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षात त्यांनी जाहीरनामा समितीचे अध्यक्षपद आणि इतर जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या. 2004 मध्ये निवडणूक हरूनही त्यांच्यावर ठेवलेल्या विश्वासामुळे त्यांना केंद्रीय गृहमंत्रिपद देण्यात आले. मात्र, २००८ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षेतील त्रुटीची नैतिक जबाबदारी स्वीकारत त्यांनी 30 नोव्हेंबर 2008 रोजी गृहमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर 2010 ते 2015 या काळात ते पंजाबचे राज्यपाल आणि चंदीगड केंद्रशासित प्रदेशाचे प्रशासक म्हणून कार्यरत होते. देशातील ‘उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार’ सुरू करण्याचे श्रेय देखील त्यांच्याकडे जाते.
वैयक्तिक आयुष्यात ते लिंगायत समाजाशी संबंधित असून 1963 मध्ये विजया पाटील यांच्याशी त्यांचा विवाह झाला. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी असून सून डॉ. अर्चना पाटील चाकूरकर राजकारणात सक्रिय आहे. त्यांच्या दोन नाती आहेत. शिवराज पाटील हे सत्य साई बाबांचे श्रद्धास्थ भक्त म्हणूनही ओळखले जात. पाच दशकांचा राजकीय, संसदीय आणि प्रशासकीय अनुभव, तसेच विविध मंत्रालयांमधील योगदानामुळे ते भारतीय राजकारणातील महत्त्वपूर्ण, अभ्यासू आणि प्रभावी व्यक्तिमत्त्व मानले जातात.
इतर महत्त्वाच्या बातम्या
कपडे अस्ताव्यस्त.. अर्धनग्न अवस्थेत सापडला पाणी खात्यात काम करणाऱ्या महिलेचा मृतदेह, नेमकं काय घडलं?
ADVERTISEMENT











