Kunal Kamra : कुणाल कामराच्या स्टँड-अप कॉमेडीवर सोशल मीडियापासून ते राजकीय मंडळींपर्यंत दोन मतं मांडले जाताना दिसत आहेत. सत्ताधारी पक्षाचे नेते व कार्यकर्ते विनोदाच्या पलीकडे जाऊन याला राजकीय वक्तव्य म्हणत टीका करत आहेत. या गोष्टीसाठी कुणाल कामराने माफी मागावी, अशी मागणी या लोकांकडून होतेय. तर दुसरीकडे विरोधक कुणाल कामराच्या कॉमेडीला अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणत आहेत. कलाकाराला टीका करण्याचा, उपहासात्मक विनोद आणि भाष्य करण्याचा अधिकार असला पाहिजे, असं विरोधकांचं म्हणणं आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> Samay Raina : इकडे कुणाल कामरा वादात, तिकडे समय रैनाने मागितली माफी, पोलिसांना दिलेल्या जबाबात काय म्हणाला?
कुणाल कामरा हे काही चुकीचं बोलले असं मला वाटत नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले. जो देशद्रोही आहे तो देशद्रोही आहे. कुणालने व्यंग नाही तर वास्तव मांडलं आहे, असं ठाकरे म्हणाले. मात्र, 2020 मध्ये ही परिस्थिती वेगळी होती. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना, सरकारवर झालेल्या टीकेमुळे कंगना रनौतला चांगलाच त्रास सहन करावा लागला होता.
कंगनाने उद्धव ठाकरेंवर केली होती टीका
कंगना रणौतने तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सरकारवर टीका केली होती. विशेषतः सुशांत सिंग राजपूत प्रकरण आणि मुंबई पोलिसांच्या भूमिकेबद्दल जोरदार हल्लाबोल केला होता. कंगनाने ट्विटमध्ये लिहिलं होतं की,
"मला मुंबईत असुरक्षित वाटतं आणि मुंबई पोलिसांवर माझा विश्वास नाही."
अभिनेत्री कंगनाने मुंबईची तुलना थेट पाकव्याप्त काश्मीरशी केली होती. कंगनाने म्हटलं होतं, "मी कधीच चुकीची नाही आणि माझ्या शत्रूंनी हे वारंवार सिद्ध केले आहे. त्यामुळेच माझी मुंबई आता पीओके आहे." यानंतर संजय राऊत यांनी कंगनावर आरोप केला होता. कंगना महाराष्ट्राचा अपमान करतेय असं म्हटलं होतं. तेव्हा कंगनाने उद्धव ठाकरेंना ‘घराणेशाहीचं सर्वात वाईट प्रोडक्ट’ म्हटलं होतं.
कार्टून फॉरवर्ड केल्याबद्दल निवृत्त नौदल अधिकाऱ्याला मारहाण
अभिनेत्री कंगना रणौत आणि उद्धव ठाकरे यांच्यातील वादानंतर आणखी एक प्रकरण समोर आलं होतं. 62 वर्षीय निवृत्त नौदल अधिकारी मदन शर्मा यांनी एक व्यंगचित्र फॉरवर्ड केले होतं. यामध्ये उद्धव ठाकरे, शरद पवार आणि सोनिया गांधी दिसत होते. 10 सप्टेंबर 2020 ला ही घटना घडली होती.त्यानंतर शिवसैनिकांनी नौदल अधिकाऱ्याच्या घरावर हल्ला करून त्यांना मारहाण केली. यामध्ये त्यांना गंभीर दुखापत झाली. या हल्ल्यात त्यांच्या डोळ्याला आणि चेहऱ्याला दुखापत झाली होती.
पवारांबद्दल पोस्ट टाकणारी केतकी 40 दिवस तुरूंगात
मराठी अभिनेत्री केतकी चितळे हिने मे 2022 मध्ये फेसबुकवर एक कविता पोस्ट केली होती. यामध्ये शरद पवारांवर अत्यंत अपमानास्पद शब्दात टिप्पणी केली होती. या कवितेतून त्यांच्या वयावर आणि राजकीय प्रभावावर विडंबन केलं होतं. मात्र, केतकीनं ही कविता स्वत: लिहिली नसून, ती केवळ शेअर केली असल्याचा दावा केला होता.
हे ही वाचा >> Eknath Shinde : कुणाल कामरावर पहिल्यांदाच बोलले, एकनाथ शिंदे म्हणाले 'त्या' तोडफोडीचं समर्थन नाही, पण...
या पोस्टमध्ये फक्त पवार आडनाव आणि त्यांचे वय 80 वर्ष असल्याचा उल्लेख होता. शरद पवार यांच्याकडे बोट दाखवत ही पोस्ट करण्यात आली होती.
शरद पवारांचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यांच्या समर्थकांना ते सहन न झाल्यानं त्यांनीही संताप व्यक्त केला होता. केतकीवर त्यानंतर अनेक एफआयआर दाखल करण्यात आले होते.
ठाणे पोलिसांनी 14 मे 2022 रोजी त्याला अटक केली. चितळे विरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 500, 501, 505 (2), 153 अ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, पुण्यातही राष्ट्रवादीच्या एका कार्यकर्त्याच्या तक्रारीवरून याच प्रकरणी चितळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यात मानहानीच्या प्रकरणाचाही समावेश होता. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी केतकीवर काळी शाई आणि अंडी फेकली होती.
महाविकास आघाडीचं सरकार असताना घडलेल्या या घटनांमुळे तेव्हाच्या सरकारवरही अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होत असल्याचं म्हटलं होतं. सत्तेत असताना आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना या तीन घटना घडल्या.
ADVERTISEMENT
