डोंबिवली: कल्याण-डोंबिवलीत शिवसेना (UBT) प्रमुख उद्धव ठाकरे यांना मोठा राजकीय धक्का बसला आहे. कल्याण जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून भारतीय जनता पक्षात सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. दीपेश म्हात्रे यांच्या सोबत 7 ते 8 माजी नगरसेवक हे भाजपमध्ये प्रवेश करतील असे सांगितले जात आहेत. हा पक्षप्रवेश आज (9 नोव्हेंबर) डोंबिवली जिमखाना येथे आयोजित करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
सूत्रांनुसार, दीपेश म्हात्रे यांना विधान परिषद किंवा केडीएमसीत महापौर पद अशा दोन अटींवर भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे.
म्हात्रे हे रविवारी महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री गणेश नाईक आणि माजी मंत्री कपिल पाटील यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. म्हात्रे यांचे हे पाऊल केवळ उद्धव ठाकरेंनाच नव्हे तर सध्या भाजपसोबत युतीत असलेल्या एकनाथ शिंदेच्या शिवसेनेलाही मोठा धक्का मानला जात आहे.
हे ही वाचा>> 'फडणवीस साहेब तेव्हा साफ खोटं बोलले...', गुवाहटीच्या 'त्या' फोनबाबत बच्चू कडूंचा खळबजनक खुलासा
विशेषतः आगामी केडीएमसी निवडणुकीपूर्वी हे लक्षात घेण्यासारखे आहे की, दीपेश म्हात्रे यांनी शिवसेनेत नगरसेवक आणि केडीएमसी सभापती पद भूषविले आहेत. दीपेश म्हात्रे हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांचे निकटवर्तीय समजले जात होते.
डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण आणि दीपेश म्हात्रे हे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जातात. दीपेश म्हात्रे यांनी रवींद्र चव्हाण यांच्या विरोधात दोन वेळा विधानसभेची निवडणूक देखील लढवली आहे. एकमेकांवर नेहमी टिका-टिप्पणी करत होते. पण एकाकाळचे जानी दुष्मन गणेशोत्सवात अचानक एकत्र दिसले होते. यंदाच्या गणेशोत्सवात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी दीपेश म्हात्रे यांच्या घरी जाऊन बाप्पाचे दर्शन घेतले होते. तेव्हापासूनच त्यांच्या भाजप प्रवेशाची राजकीय चर्चा रंगली होती.
हे ही वाचा>> 'या केसमध्ये पार्थ पवार दोषी आहेत की नाही?', थेट प्रश्न.. पण अजित पवारांचं 'हे' उत्तर म्हणजे...
◆ शिवसेनेचे दोन गट पडले, तेव्हा म्हात्रे यांनी शिंदेसोबत राहणं पसंत केलं होतं. गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी पक्ष बदलला आणि चार नगरसेवकांसह ते उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत (UBT) सामील झाले आणि रवींद्र चव्हाण यांच्या विरोधात विधानसभा निवडणूक देखील लढवली. पण विधानसभा निवडणुकांना एक वर्षही होत नाही तोवर दीपेश म्हात्रेंनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
◆ कोण आहेत दीपेश म्हात्रे?
दीपेश म्हात्रे हे कल्याण-डोंबिवलीतील एक मातब्बर आणि जुने नगरसेवक म्हणून ओळखले जातात. ते 2009 पासून नगरसेवक आहेत. त्यांनी महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदाची जबाबदारी 2 वेळा यशस्वीरित्या सांभाळली आहे. म्हात्रे हे कल्याण-डोंबिवलीतील एका प्रतिष्ठित राजकीय कुटुंबातील आहेत. त्यांचे वडील पुंडलिक म्हात्रे केडीएमसीचे माजी महापौर होते आणि एकेकाळी ते शहरातील सर्वात प्रभावशाली नेत्यांपैकी एक मानले जात होते. त्यांचे भाऊ जयेश म्हात्रे माजी नगरसेवक आहेत आणि त्यांची आई देखील माजी नगरसेविका आहे. म्हात्रे यांच्या भाजपमध्ये प्रवेशामुळे कल्याण-डोंबिवलीतील राजकीय समीकरणांमध्ये लक्षणीय बदल होण्याची अपेक्षा आहे, ज्याचा भविष्यातील निवडणूक समीकरणांवर परिणाम होऊ शकतो.
ADVERTISEMENT











