Raj-Uddhav Thackeray: 'जे बाळासाहेबांना, जमलं नाही.. ते फडणवीसना जमलं', राज ठाकरे असं का म्हणाले?

'जे बाळासाहेबांना, अनेकांना जमलं नाही.. आम्हाला दोघांना एकत्र आणायचं ते देवेंद्र फडणवीसना जमलं..' असं विधान मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आपल्या भाषणात केलं.

Raj Thackeray

Raj Thackeray

मुंबई तक

05 Jul 2025 (अपडेटेड: 05 Jul 2025, 04:39 PM)

follow google news

मुंबई: 'जे बाळासाहेबांना, अनेकांना जमलं नाही.. आम्हाला दोघांना एकत्र आणायचं ते देवेंद्र फडणवीसना जमलं..' असं विधान करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विजयी मेळाव्यात सुरुवातीलाच हिंदी भाषा सक्तीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला. 

हे वाचलं का?

पाहा विजयी मेळाव्यात राज ठाकरे नेमकं काय म्हणाले

'मोर्चा खरं तर निघायला पाहिजे होता. मराठी माणूस कसा सर्व बाजूने एकवटतो याचं चित्र मोठ्या प्रमाणावर उभं राहिलं होतं. पण फक्त मोर्चाच्या चर्चेनेच माघार घ्यावी लागली. खरं तर आजचाही मेळावा शिवतीर्थावर मैदानात व्हायला हवा होता. मैदान ओसांडून वाहलं असतं. पण पाऊस आहे त्यामुळे इथे कार्यक्रम घ्यावा लागला.' 

'मी माझ्या मुलाखतीत म्हटलं होतं की, कोणत्याही वादापेक्षा आणि भांडणापेक्षा महाराष्ट्र हा मोठा आहे. जे माननीय बाळासाहेबांना जमलं नाही, जे अनेकांना जमलं नाही.. आम्हाला दोघांना एकत्र आणायचं.. ते देवेंद्र फडणवीसना जमलं.'

हे ही वाचा>> Raj-Uddhav: बाळासाहेबांच्या मनातलं चित्र कॅमेऱ्यात झालं कैद, ठाकरेंच्या शिवसेनेने शेअर केलेला 'हा' फोटो पाहिलात का?

'खरं तर कोणचाही झेंडा नाही मराठी हाच अजेंडा.. माझ्या मराठीकडे, माझ्या महाराष्ट्राकडे कोणी वेड्यावाकड्या नजरेने पाहायचं नाही कोणी. हे कुठून अचानक आलं हिंदीचं मला कळलं नाही. हिंदी.. कशासाठी हिंदी.. त्या लहान लहान मुलांवर तुम्ही जबरदस्ती करतायेत.' 

'कोणाला विचारायचं नाही, शिक्षण तज्ज्ञांना विचारायचं नाही.. आम्ही लादणार.. आमच्या हातात सत्ता आहे आम्ही लादणार.. तुमच्या हातात सत्ता असेल ती विधानभवनात. आमच्याकडे सत्ता आहे रस्त्यावर.' 

'एक पत्र लिहिलं, दोन पत्रं लिहिली.. नंतर ते दादा भुसे माझ्याकडे आले.. म्हणाले, आम्ही काय म्हणतोय ते समजून तर घ्या.. काय म्हणतोय ते ऐकून तर घ्या.. म्हटलं दादा भुसे तुम्हाला एक गोष्ट सांगतो.. तुम्ही काय सांगताय ते ऐकून घेईन पण ऐकणार नाही.' 

'महाराष्ट्रात त्रिभाषेचा प्रयोग करून पाहिला त्यांनी. पण महाराष्ट्र जेव्हा पेटून उठतो त्यावेळेला काय घडतं आणि काय होतं हे आज राज्यकर्त्यांना समजलं असेल. त्याशिवाय का माघार घेतली. विनाकारण आणलेला विषय होता.' 

'हिंदी भाषेबद्दल मला वाईट नाही वाटत, कोणतीही भाषा ही सुंदरच असते. एक भाषा उभी करायला प्रचंड तपश्चर्या लागते. अशाच भाषा काय उभ्या राहत नसतात. भाषेचं हे नवीन कुठून आणलं.'

हे ही वाचा>> Raj and Uddhav Thackeray Victory Rally LIVE: राज ठाकरेंची तुफान फटकेबाजी, उद्धव ठाकरेंनी केलं प्रचंड कौतुक

'संपूर्ण हिंद प्रांतावर 125 वर्ष मराठ्यांनी राज्य केलं. यामध्ये जे प्रदेश होते त्यावर आम्ही मराठी लादली? बरं हिंदी भाषा आहे.. 200 वर्षांपूर्वीची भाषा आहे. महाराजांच्या काळातही नव्हती.'

'यांनी फक्त चाचपडून पाहिलं, चाचपडून.. मुंबई स्वतंत्र करता येते का यासाठी अगोदर थोडंसं भाषेला डिवचून बघू.. महाराष्ट्र शांत राहिला तर पुढे पाऊल टाकू. कोणाची माय व्यायलीय त्याने महाराष्ट्राला हात घालून दाखवावा, मुंबईला हात घालून दाखवावा.'

'आम्ही शांत आहोत याचा अर्थ गांX नाही आहोत.. काही अंगावर लादायचा प्रयत्न करतायेत.. आता माघार घेतली ना.. माघार घेतली तर काय करायचं. तर वेगळ्या ठिकाणी वळवा सगळं प्रकरण.. म्हणजे कुठे ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली.' 

'म्हणजे दादा भुसे मराठी मीडियमध्ये शिकून शिक्षणमंत्री झाले. देवेंद्र फडणवीस इंग्रजी मीडियममध्ये शिकून मुख्यमंत्री झाले. कुठे काय शिकलं याचा काय संबंध.. कोणाकोणाची मुलं परदेशात शिकतात याच्या याद्या आहेत.' 

'आता मी तुम्हाला अजून एक सांगतो.. आम्ही मराठी मीडियाममध्ये शिकलो. आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली.. यावर तुम्ही प्रश्न काय उपस्थित केला की, यांना मराठीचा पुळका कसा? हे लोकं मुलं इंग्रजी मीडियममध्ये टाकतात. बरं..' 

'माननीय बाळासाहेब ठाकरे आणि माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजी मीडियममध्ये शिकलेले आहेत. या दोघांवर तुम्ही मराठीबद्दल शंका घेऊ शकता का?'

'उद्या मी हिब्रू भाषेत शिकेन पण मराठीपणाचा कडवट अभिमान बाळगेन.. काय अडचण आहे?' असं घणाघाती भाषण राज ठाकरेंनी यावेळी केलं.

    follow whatsapp