सूनेत्रा पवारांविरोधात काँग्रेसने उमेदवारी दिलेले आकाश मोरे कोण आहेत?

Akash More Profile Story : बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवारांविरुद्ध काँग्रेसने नामांकित वकील अ‍ॅड. आकाश मोरे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलंय.

Akash More Profile Story

Akash More Profile Story

मुंबई तक

06 Apr 2026 (अपडेटेड: 06 Apr 2026, 09:43 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

सूनेत्रा पवारांविरोधात काँग्रेसने उमेदवारी दिलेले आकाश मोरे कोण आहेत?

point

बिनविरोध निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे प्रयत्न सुरु असताना काँग्रेसने दिला उमेदवार

बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने अ‍ॅड. आकाश मोरे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर रिक्त झालेल्या या जागेसाठी निवडणूक होत असून, राष्ट्रवादी काँग्रेसकडून पक्षाच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. अशा संवेदनशील परिस्थितीत काँग्रेसने माजी आमदार अ‍ॅड. विजयराव मोरे यांचा काँग्रेसी विचारांचा वारसा लाभलेले आणि बारामतीमधील नावाजलेले वकील आकाश मोरे यांना संधी दिली आहे. बी.ए. एल.एल.बी. पर्यंत शिक्षण पूर्ण केलेले आकाश मोरे हे केवळ एक कायदेतज्ज्ञ नसून गेल्या 20-25 वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात अत्यंत सक्रिय आणि समर्पित भावनेने कार्य करणारे नाव आहे. आपल्या वडिलांचा वारसा समर्थपणे पुढे नेणारे आकाश मोरे आता राजकीय आखाड्यात आपले नशीब आजमावत आहेत.

हे वाचलं का?

समाजसेवेचा वारसा आणि वंचितांचा आधार

अ‍ॅड. आकाश मोरे यांना आपल्या वडिलांकडून समाजसेवेचा मोठा वसा मिळाला असून त्यांनी तो खऱ्या अर्थाने कृतीत उतरवला आहे. बारामतीमधील गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी ते स्वतः एक वसतिगृह चालवतात, जेणेकरून आर्थिक परिस्थितीअभावी कोणत्याही विद्यार्थ्याचे शिक्षण थांबू नये. शिक्षणाची ही गंगा तळागाळातील मुलांपर्यंत पोहोचवण्यासाठी ते सदैव तत्पर असतात. केवळ शहरातच नव्हे, तर त्यांच्या मूळ गावी भटक्या विमुक्त समाजातील मुलांसाठी ते तब्बल 400 विद्यार्थ्यांची निवासी आश्रमशाळा अत्यंत यशस्वीपणे चालवत आहेत. उपेक्षितांच्या आयुष्यात प्रकाशाची वाट निर्माण करणे हेच त्यांचे ध्येय असून, गेल्या दोन दशकांपासून ते उपेक्षितांच्या कल्याणासाठी अहोरात्र झटत आहेत.

अजितदादांच्या मृत्यूचा तपास आणि व्यवस्थेविरुद्ध लढा

या निवडणुकीत आकाश मोरे यांनी अत्यंत महत्त्वाचा आणि संवेदनशील मुद्दा उपस्थित केला आहे, तो म्हणजे स्व. अजितदादांच्या मृत्यूचा संशयास्पद प्रकार. या प्रकरणाचा तपास योग्य रीतीने होणे ही काळाची गरज असल्याचे सांगत त्यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. वर्तमान सरकार या तपासाबाबत अनुकूल दिसत नसल्याचा आरोप करत त्यांनी जबाबदार असणाऱ्यांना कायद्याच्या चौकटीत खेचून शिक्षा मिळवून देण्याचा संघर्षाचा पवित्रा घेतला आहे. जर राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना न्याय मिळत नसेल, तर सामान्य जनतेने कोणाकडे पाहायचे, असा जळजळीत प्रश्न त्यांनी व्यवस्थेला विचारला आहे. न्यायासाठी सुरू असलेला हा कायदेशीर आणि सामाजिक संघर्ष त्यांच्या प्रचाराचा एक महत्त्वाचा केंद्रबिंदू बनला असून जनतेचे लक्ष वेधून घेत आहे.

भाजपच्या धोरणांविरुद्ध एल्गार आणि परिवर्तनाचा संकल्प

राजकीय रणमैदानात आकाश मोरे यांनी भाजपच्या धोरणांविरुद्ध एल्गार पुकारला असून सत्ताधारी पक्ष सर्वसामान्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत असल्याचा दावा केला आहे. वाढती बेरोजगारी, महागाईचा भस्मासुर आणि संकटात असलेला बळीराजा या मुद्द्यांवर सरकार उदासीन असल्याचा त्यांचा आरोप आहे. तसेच पुरोगामी महाराष्ट्रात वैज्ञानिक दृष्टिकोनाऐवजी चुकीच्या बाबींना आणि अंधश्रद्धेला खतपाणी घातले जात असल्याबद्दल त्यांनी तीव्र खेद व्यक्त केला आहे. त्यांचा हा लढा केवळ राजकीय सत्तेसाठी नसून तो हक्काचा आणि न्यायाचा असल्याचे ते ठामपणे सांगतात. लोकशाहीची मूल्ये टिकवण्यासाठी आणि सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी अ‍ॅड. आकाश मोरे यांच्या नेतृत्वाखाली हा संघर्ष आगामी काळात अधिक तीव्र होणार असल्याचे चित्र बारामतीत दिसत आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

पुणे : घट्ट पकड, नाहीतर राजाला दुसरी बायको आणावी लागेल; निवृत्त सैनिकाच्या नातेवाईकांचा हवेत गोळीबार VIDEO