'भाजपने बळाचा, दांडगाईचा वापर...', मंत्री शंभूराज देसाई प्रचंड संतापले थेट भाजपविरोधात एल्गार!

मुंबई तक

• 08:11 AM • 05 Apr 2026

साताऱ्यातल्या सभापती पदाच्या निवडीनंतर पत्रकार परिषदेत शिवसेनेचे नेते तथा साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाईंचा संताप पुन्हा एकदा पाहायला मिळाला. यावेळी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी भाजपविरोधात साताऱ्यात बहिष्कार करत असल्याचं एल्गार केला.

bjp resorted to force and high handedness shiv sena minister shambhuraj desai is absolutely furious now launching a direct offensive against bjp

मंत्री शंभूराज देसाई प्रचंड संतापले

Google CTA

सातारा: सातारा जिल्हा परिषदेच्या 20 मार्च रोजी झालेल्या अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडणुकीनंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. महायुतीतील फूट स्पष्ट झाली असून, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांनी भाजपविरोधात एकत्र येत तीव्र निषेध नोंदवला आहे.

हे वाचलं का?

पालकमंत्री तथा शिवसेनेचे नेते शंभूराज देसाई यांनी पत्रकार परिषदेत संताप व्यक्त करताना भाजपवर गंभीर आरोप केले. त्यांनी सांगितले की, “20 मार्च   रोजी अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीदरम्यान ज्या घटना घडल्या त्या अत्यंत गंभीर होत्या. भाजपने बळाचा आणि दांडगाईचा वापर करून ही निवडणूक घेतली. या प्रकाराची दखल राज्यासह देशभरातील माध्यमांनी घेतली असून, जिल्हा प्रशासनानेही चुकीची भूमिका घेतल्याचे पडसाद उमटले आहेत.”

सभापती निवडीवर एकमुखी बहिष्कार

या पार्श्वभूमीवर शंभूराज देसाई आणि मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, शेतकरी संघटना आणि अपक्ष सदस्यांनी एकत्र येत सभापती निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

हे ही वाचा>> अजितदादांच्या विमान अपघाताबाबत देवेंद्र फडणवीस यांनी दिली 57 दिवसानंतर महत्त्वाची अपडेट, पायलटबाबत म्हणाले...

पत्रकार परिषदेत शंभूराज देसाई म्हणाले, “साताऱ्यासारख्या यशवंतराव चव्हाणांच्या विचारांच्या जिल्ह्यात पहिल्यांदाच सदस्यांना हाताला काळ्या फिती बांधून निषेध करावा लागला. सदस्यांवर अन्याय झाला तर आम्ही सर्वजण त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहू आणि या घटनेचा निषेध कायम ठेवू.”

काळ्या फिती बांधून निषेध

सभागृहासमोर जिल्हा परिषद सदस्यांनी हातावर काळ्या फिती बांधून जोरदार निषेध नोंदवला. अनेक सदस्यांनी निवडणुकीच्या प्रक्रियेवर बहिष्कार टाकत सभागृहातून वॉक आऊट केल्याचे दिसून आले. या प्रकारामुळे साताऱ्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

हे ही वाचा>> मंत्री शंभुराज देसाईंचं रक्त काढलं, मराठा आंदोलन लाठीमार अन् बिद्रे प्रकरणातही आरोप आणि दोशी?

नेमके काय घडलेले 20 मार्चला?

20 मार्च रोजी झालेल्या अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडणुकीदरम्यान सभागृहात अभूतपूर्व गोंधळ झाला होता. सदस्यांना सभागृहात घेऊन जाण्याच्या प्रयत्नात झटापट झाली होती. या दरम्यान पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हाताला जखम झाली होती. ज्याबाबत त्यांनी थेट विधानसभेत आवाज उठवला होता आणि थेट भाजप आणि प्रशासनावर पक्षपाताचा आणि बळजबरीचा आरोप केला होता.

दरम्यान, त्यावेळी झालेल्या निवडणुकीत भाजपने बाजी मारली होती. त्यामुळे प्रिया शिंदे यांना अध्यक्ष आणि राजू भोसले यांना उपाध्यक्ष पद मिळालेले. मात्र, या प्रक्रियेवर शिवसेना-राष्ट्रवादीने आक्षेप घेतला होता.

महायुतीतील फूट स्पष्ट

या घटनेमुळे महायुतीतील अंतर्गत संघर्ष अधिक स्पष्ट झाला आहे. शंभूराज देसाई आणि मकरंद पाटील यांच्या संयुक्त नेतृत्वाखाली शिवसेना व राष्ट्रवादी एकत्र येत असल्याचे चित्र निर्माण झाले. दोन्ही नेत्यांनी “राजकारण आपल्या जागी, पण लोकशाही आणि न्याय महत्त्वाचा” असं म्हटलं होतं.

या प्रकारामुळे साताऱ्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सर्व स्तरातून या घटनेची चर्चा सुरू आहे.