Ujjwal Nikam : पूनम महाजनांचे तिकीट कापून भाजपने ज्यांना उमेदवारी दिली, ते निकम कोण?

मुंबई तक

28 Apr 2024 (अपडेटेड: 28 Apr 2024, 01:16 PM)

Who is Ujjwal Nikam : मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातून पूनम महाजन यांचे तिकीट कापून भाजपने ज्यांना उमेदवारी दिली ते उज्ज्वल निकम कोण आहेत?

उज्ज्वल निकम यांना भाजपने उमेदवारी दिली आहे, ते कोण आहेत?

उज्ज्वल निकम हे उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून उमेदवार आहेत.

follow google news

Who is Ujjwal Nikam, BJP's Lok Sabha Candidate : काँग्रेसने उमेदवार जाहीर केल्यानंतर भाजपने मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून आपल्या उमेदवाराच्या नावाची घोषणा केली. विद्यमान खासदार पूनम महाजन यांचे तिकीट कापत भाजपने या जागेवरून प्रसिद्ध वकील उज्ज्वल निकम यांना उमेदवारी दिली आहे. या जागेवरून काँग्रेसने मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाड यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे पूनम महाजन यांचं तिकीट कापून ज्यांना भाजपने मैदानात उतरवलं आहे, ते उज्ज्वल निकम कोण, जाणून घेऊया...

हे वाचलं का?

उज्ज्वल निकम यांचा जन्म महाराष्ट्रातील जळगाव येथे एका मराठी कुटुंबात झाला. त्यांचे वडील पेशाने न्यायाधीश होते. निकम यांनी जळगावच्या एस.एस. मणियार लॉ कॉलेजमधून कायद्याची पदवी घेतली. 

त्यांनी विज्ञान शाखेतून पदवी प्राप्त केलेली आहे. जळगाव येथे जिल्हा सरकारी वकील म्हणून त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली आणि नंतर राज्य आणि राष्ट्रीय खटल्यांमध्ये त्यांनी आपल्या वकिलीच्या जोरावर ओळख मिळवली.

हेही वाचा >> भाजपने कापलं तिकीट, पूनम महाजन म्हणाल्या...

1991 मध्ये कल्याण बॉम्बस्फोटासाठी रविंदर सिंगला दोषी ठरवण्यात त्यांचा मोठा वाटा होता. 1993 मध्ये जेव्हा ते मुंबई साखळी बॉम्बस्फोट खटल्यात सरकारी वकील बनले, तेव्हा त्यांच्या कारकिर्दीत एक टर्निंग पॉइंट आला.

दहशतवादी कारवाया (प्रतिबंध) कायद्यांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या विशेष न्यायालयात त्यांनी 14 वर्षांहून अधिक काळ काम केले. २६/११ च्या मुंबई हल्ल्याच्या सुनावणीदरम्यान राज्य सरकारच्या वतीने निकम यांनी युक्तिवाद केला होता.

हेही वाचा >> 'उद्धव ठाकरे, शरद पवारांबद्दल महाराष्ट्रात सहानुभूतीची लाट', भुजबळांचे मोठे विधान

मुंबई हल्ल्यातील आरोपी अजमल कसाब याने तुरुंगात मटन बिर्याणीची मागणी केली होती, हे निकम यांचं विधान बरंच गाजलं होतं. पण, नंतर ते खोटं होतं, असा खुलासा त्यांनी केला होता.

निकमांनी लढवल्या या हायप्रोफाईल केसेस

1993 चे बॉम्बस्फोट प्रकरण, गुलशन कुमार खून प्रकरण, प्रमोद महाजन हत्या प्रकरण आणि 2008 च्या मुंबई हल्ल्यासह अनेक मोठ्या प्रकरणांशी त्याचा संबंध आहे. 2013 च्या मुंबईतील सामूहिक बलात्कार प्रकरण आणि 2016 च्या कोपर्डी बलात्कार आणि खून खटल्यातही ते सरकारी वकील होते.

पद्मश्रीने सन्मान

उज्ज्वल निकम यांनी आपल्या 30 वर्षांच्या कारकिर्दीत 628 कैद्यांना जन्मठेपेची शिक्षा दिल्याची माहिती आहे. 37 दोषींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 2009 मध्ये 26/11 प्रकरणाच्या सुनावणीवेळी उज्ज्वल निकम यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात आली होती. तसेच, कायदेशीर क्षेत्रातील योगदानाबद्दल भारत सरकारने 2016 मध्ये त्यांना पद्मश्री देऊन सन्मानित केलेले आहे.

'मी चूक सुधारण्याचा प्रयत्न करेन', निकम तिकीट मिळाल्यानंतर काय सांगितलं?

भाजपकडून तिकीट मिळाल्यानंतर 'इंडिया टुडे'शी बोलताना त्यांनी सांगितले की, 'दहशतवादाशी लढा आणि देशाची सुरक्षा सुनिश्चित केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले. देशासाठी आणखी काही करण्याची वेळ आली आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

हेही वाचा >> ''रश्मी वहिनी उद्धवला म्हणायच्या...राणे शिवसेनेत असेपर्यंत तुम्हाला पद मिळणार नाही''

'मी राजकारणापासून दूर होतो, पण 2014 नंतर देश कसा बदलला आहे, भारताची जी प्रतिमा मी जागतिक स्तरावर निर्माण केली आहे. त्याचे बारकाईने निरीक्षण सुरू केले आणि याचे श्रेय पंतप्रधान मोदी आणि भाजपला द्यायला हवे. भारत आणि तेथील लोकांप्रती त्यांचे समर्पण पाहिल्यानंतर मला वाटले की देशासाठी आणखी काही करण्याची हीच योग्य वेळ आहे. मला माहीत आहे की राजकारणात तुमच्यावर अनेक खोटे आरोप होऊ शकतात, पण मी तुम्हाला खात्री देतो की जर माझ्या चुका कोणी निदर्शनास आणून दिल्या तर मी त्या सुधारण्याचा प्रयत्न करेन.'

    follow whatsapp