मुंबई: महाराष्ट्रातील विरोधी पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी आज (14 ऑक्टोबर) मुख्य निवडणूक आयुक्त एस. चोकलिंगम यांची भेट घेतली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना (UBT)चे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह काँग्रेस आणि इतर पक्षांच्या महत्त्वाच्या नेत्यांनी निवडणूक आयुक्तांची भेट घेतली. मात्र ही बैठक आज पूर्णच झाली नाही. त्यामुळे आता उद्या (15 ऑक्टोबर) पुन्हा एकदा शिष्टमंडळ हे मंत्रालयात येणार आहे.
ADVERTISEMENT
अवघ्या राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या या बैठकीतून आजच्या दिवशी काहीच तोडगा निघाला नाही. त्यामुळे आता उद्या पुन्हा एकदा शिष्टमंडळ चर्चा करणार आहे. दरम्यान, या बैठकीत नेमकं काय घडलं याची माहिती संजय राऊत यांनी दिली आहे.
संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
'एस. चोकलिंगम यांच्या बरोबरच्या बैठकीतील काही मुद्दे हे अनिर्णीत आहेत. ती चर्चा उद्या परत सुरू राहणार आहे. उद्या राज्याचे निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे आणि चोकलिंगम यांची एकत्रित भेट आणि चर्चा हे शिष्टमंडळ, यातील प्रमुख नेते घेतील. त्यामुळे उद्याच याबाबतची माहिती पत्रकारांना दिली जाईल.'
हे ही वाचा>> काँग्रेसला सोबत घ्यावं, अशी राज ठाकरेंची देखील इच्छा; संजय राऊत यांचं वक्तव्य
'शरद पवार, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे आज पत्रकार परिषदेसाठी येणार होते. पण चर्चा अपुरी आहे. त्यामुळे उद्या पुन्हा एकदा चोकलिंगम आणि दिनेश वाघमारे यांची एकत्र बैठक याच शिष्टमंडळाबरोबर होणार असल्यामुळे ती संपल्यावर तुम्हाला पत्रकार परिषदेची वेळ कळवली जाईल.'
'जसं प. बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचं सरकार आहे तिथे भाजपचे लोकं निवडणूक आयोगाला भेटून हीच मागणी करत आहेत. केरळमध्ये भाजप हीच मागणी करत आहे. कर्नाटकमध्ये भाजप हीच मागणी करत आहे. त्याच मागणीसाठी आम्ही सुद्धा निवडणूक आयोगाला भेटत असताना भाजपच्या नेत्यांनी सुद्धा आमच्यासोबत राहावं ही आमची भूमिका आहे. हे राजकीय शिष्टमंडळ नाहीए.'
हे ही वाचा>> मतदार याद्यांमध्ये एवढे घोळ असताना निवडणुका कशा घेता? राज ठाकरेंचे निवडणूक आयोगाला 8 मोठे सवाल
'आम्ही सगळे एकत्र आहोत. देशाचं संविधान आणि लोकशाही यानुसार निवडणुका व्हाव्यात आणि पारदर्शक पद्धतीने व्हाव्यात ही सगळ्यांची गरज आहे. सगळे वरिष्ठ नेते असतील उद्या पुन्हा चर्चेसाठी जातील.' अशी माहिती संजय राऊत यांनी दिली आहे.
बैठकीत राज ठाकरेंचें आयुक्तांना तिखट सवाल?
या बैठकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निवडणूक आयुक्तांवर अनेक प्रश्नाची सरबत्ती केली. ते म्हणाले, 'निवडणूक लागलेली नाही तरी मतदान नोंदणी बंद का केली आहे. जे आज वयाची 18 वर्ष पूर्ण करत आहे त्यांनी मतदान करू नये का? अनेक मतदारांचे दोन-दोन ठिकाणी नाव आहे.यामुळे मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोळ आहे.काही ठिकाणी तर वडिलांचं वय हे मुलाच्या वयापेक्षा कमी असल्याचं आढळन आहे. निवडणूक याद्यांमध्ये एवढा घोळ? तुम्ही कसं निवडणुकांना सामोरे जाता? 31 जानेवारीपर्यंत निवडणूक घेण्याचे आपल्याला आदेश आहे. आपण आम्हाला उत्तर द्या की तुम्ही निवडणुकीसाठी सज्ज आहात का? असा सवाल करत राज ठाकरेंनी निवडणूक आयुक्तांना थेट जाबच विचारला.
ADVERTISEMENT
