खुद्द राज ठाकरेंना का यावं लागणार ठाणे कोर्टात?, ‘ते’ प्रकरण काही पाठ सोडेना!

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ११ डिसेंबर रोजी ठाणे कोर्टात हजर राहावं लागणार आहे. जाणून घ्या नेमकं काय आहे प्रकरण.

Mumbai Tak

मुंबई तक

• 07:00 AM • 11 Dec 2025

follow google news

ठाणेः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) प्रमुख राज ठाकरे आज (11 डिसेंबर) ठाणे रेल्वे न्यायालयात हजर राहणार आहेत. २००८ मध्ये कल्याण रेल्वे स्थानकावर उत्तर भारतीय उमेदवारांवर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणातील सुनावणी सकाळी ११ वाजता होणार आहे. या प्रकरणात राज ठाकरेंवर हिंसाचाराला प्रोत्साहन दिल्याचा आरोप आहे. त्यांच्या न्यायालयातील उपस्थितीमुळे ठाण्यात तणावाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे, त्यामुळे पोलिसांकडून विशेष बंदोबस्त करण्यात येणार आहे.

हे वाचलं का?

नेमकं प्रकरण काय?

या प्रकरणाची पार्श्वभूमी २००८ च्या ऑक्टोबर महिन्यातील आहे. तेव्हा रेल्वे भरती प्रक्रियेदरम्यान कल्याण स्थानकावर मनसे कार्यकर्त्यांनी उत्तर भारतीय उमेदवारांवर हल्ला केला होता. या हल्ल्यात उमेदवारांना मारहाण करण्यात आली, तसेच रेल्वेच्या मालमत्तेचे मोठे नुकसान झाले. मनसे कार्यकर्त्यांनी "मराठी तरुणांच्या नोकऱ्या परप्रांतीयांनी हिरावल्या" असा आरोप करत उत्तर भारतीयांना लक्ष्य केले होते. राज ठाकरेंनी या मुद्द्यावर भाष्य करत हिंसाचाराला अप्रत्यक्ष प्रोत्साहन दिल्याचा आरोप प्रकरणात करण्यात आला आहे.

या घटनेनंतर राज ठाकरेंना आणि त्यांच्या सात सहकारी मनसैनिकांवर गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी त्यांना अटकही केली होती. मात्र, नंतर न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर करत दिलासा दिला. सुरुवातीला हे प्रकरण कल्याण न्यायालयात चालले, पण नंतर ते ठाणे रेल्वे न्यायालयात वर्ग करण्यात आले. सुनावणीच्या दरम्यान आरोपी न्यायालयात हजर राहत नसल्याने न्यायालयाने राज ठाकरेंना आणि इतर आरोपींना समन्स बजावली. यानंतर अटक वॉरंटही जारी करण्यात आले होते.

राज ठाकरेंच्या वकिलांनी न्यायालयात अर्ज दाखल करून हे अटक वॉरंट रद्द करण्यात यश मिळवले. मात्र, प्रकरण अद्याप प्रलंबित आहे आणि आज पुन्हा सुनावणी होणार आहे. राज ठाकरेंनी स्वतः न्यायालयात हजर राहण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे त्यांच्या समर्थकांकडून मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. ठाणे पोलिसांनी याची दखल घेतली असून, न्यायालय परिसरात अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. तणाव टाळण्यासाठी वाहतुकीचे नियोजनही करण्यात येत आहे.

हे प्रकरण महाराष्ट्रातील राजकीय वातावरणात नेहमीच चर्चेचा विषय राहिले आहे. मनसेने नेहमीच "मराठी अस्मिता" आणि "स्थानिक नोकऱ्या" या मुद्द्यांवर आक्रमक भूमिका घेतली आहे. २००८ च्या घटनेनंतर राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांबाबत वादग्रस्त विधानं केलेली ज्यामुळे राज्यात मोठा गदारोळ निर्माण झाला होता.

ठाणे रेल्वे न्यायालयातील सुनावणी ही केवळ कायदेशीर प्रक्रिया नसून, राजकीयदृष्ट्या महत्त्वाची आहे. राज ठाकरेंच्या उपस्थितीमुळे मनसे कार्यकर्त्यांकडून न्यायालयाबाहेर निदर्शने किंवा घोषणाबाजी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पोलिसांनी सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचे सांगितले आहे.

    follow whatsapp