बीसीसीआय आणि आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलने आयपीएलच्या चौदाव्या सिझनची अधिकृत घोषणा केली आहे. ९ एप्रिल ते ३० मे या दरम्यान ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. गतविजेते मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात सलामीचा सामना रंगणार आहे. जगातलं सर्वात मोठं क्रिकेट मैदान अशी ओळख मिळवलेल्या अहमदाबादच्या नरेंद्र मोदी मैदानावर यंदाच्या हंगामाचे प्ले-ऑफ आणि फायनलचे सामने खेळवले जाणार आहेत.
ADVERTISEMENT
अहमदाबादसोबतच बंगळुरु, चेन्नई, दिल्ली, मुंबई आणि कोलकाता या शहरांत ही लिग स्टेजचे सामने खेळवले जाणार आहेत. यंदाच्या हंगामातली सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सर्व संघांना आपले सामने हे त्रयस्थ जागेवर खेळावे लागणार आहेत. यंदाच्या सिझनमध्ये ११ डबल हेडर सामने खेळवले जाणार असून पहिला सामना दुपारी साडेतीन आणि दुसरा सामना संध्याकाळी साडेसात वाजता खेळवला जाणार आहे.
देशात कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता बीसीसीआयने खेळाडूंसाठी सर्व ठिकाणी बायो बबल तयार केलं आहे. याचसोबत प्रादुर्भावाचा धोका वाढू नये याकरता प्रत्येक टीम लिग स्टेजदरम्यान तीन वेळा प्रवास करेल अशा पद्धतीने सामन्यांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. याचसोबत यंदाच्या हंगामातही प्रेक्षकांना सामना पाहण्याची परवानगी मिळणार नाहीये. भविष्यात परिस्थितीमध्ये सुधारणा झाली तर प्रेक्षकांना संधी द्यायची की नाही याचा निर्णय घेतला जाईल असं बीसीसीआयने जाहीर केलं.
ADVERTISEMENT
